आभाळाएवढी माया देणारी ‘माई’!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ

आभाळाएवढी माया देणारी ‘माई’!

शेवटचा दिवस गोड करून श्रीराम चरणी विलीन झाली!

संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे,

याचसाठी केला होता अट्टाहास|
शेवटचा दिस गोड व्हावा||

हे शेवटचे दिवस, अंतिम दिवस, अंतिम क्षण गोड होण्यासाठीच संपूर्ण जीवनात सत्याचा, प्रेमाचा, आनंदाचा मार्ग स्वीकारावा लागतो. तेव्हा आणि तेव्हाच ‘शेवटचा दिस गोड’ होतो! असाच शेवटचा दिवस गोड करण्याची किमया खूप कमी लोकांना जमते; नव्हे ते जमतही नाही. मात्र अगदी सहजपणे ‘शेवटचा दिवस गोड केला’ माझ्या- आमच्या माईने!

माई म्हणजेच सौ. सुगंधा दशरथ गावकर. माझी सासू! माझा विवाह झाल्यापासून गेल्या सतरा वर्षात मी तिला पाहतोय; पण ती जीवनभर कशासाठी जगली? हे अगदी शेवटच्या क्षणाला मला अगदी सहजरीत्या समजून आले!

माई ३० नोव्हेंबर २०२२ रोजी रात्रौ १:२० वाजता परमात्म्याच्या चरणी लीन आली. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी तिने आपली हालचाल बंद केली. फक्त श्वासोच्छ्वास सुरू होता. ती कोणाच्या हाकेला प्रतिसाद देत नव्हती. आम्ही उभयता रात्री १ वाजता मालवणला घरी पोहोचलो. माझी पत्नी सौ. सिद्धी (दिशा) ने आपल्या आईला हाक मारली; ‘‘आई, बघ मी आली!” माईने पूर्ण डोळे उघडून लेकीकडे बघितले आणि पुन्हा डोळे बंद केले पुन्हा कधी न उघडण्यासाठी! पण श्वासोच्छ्वास सुरू होता. सौ. सिद्धीने तिच्या कपाळावर हात ठेवून मनातल्या मनात श्रीरामरक्षा म्हटली. मी बाजूला उभा राहून महाप्राण हनुमंताचा जप करीत होतो. श्रीरामरक्षा पूर्ण होतात माईने अखेरचा श्वास सोडला पुन्हा श्वास न घेण्यासाठी! ती आम्हा कुटुंबियांच्या डोळ्यादेखत श्रीराम चरणी विलीन झाली. आमच्यावर आभाळा एवढी माया करणाऱ्या माईचा देह कोणत्याही हालचालीशिवाय स्तब्ध झाला होता.

माझे अश्रू जागच्या जागी थबकले. हुंदका यायचा; पण माझ्या डोळ्यात अश्रू येऊ नये म्हणून मी कसोशीने प्रयत्न करीत होतो. कारण मला माईवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि माई ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करायची; त्या सर्वांना धीर द्यायचा होता. मी मनातल्या मनात खूप रडत होतो. माईचा शेवटचा दिवस मात्र कसा गोड झाला? याची आम्हा उभयतांना अनुभूती आली होती. शेवटच्या २०-२५ दिवसात ज्या घटना घडल्या त्या आमच्यासाठी अद्भुत होत्या. माईच्या जीवनातील शेवटचा दिवस गोड होण्यासाठी परमात्म्याने प्रत्यक्षात आणलेली योजना आम्ही अनुभवली… म्हणूनच हा लेखन प्रपंच…

एक सामान्य ग्रामीण भागातील माई विवाह होऊन सासरी आली. सासरी आल्यावर तिने प्रत्येकाशी प्रत्येक नातं जपलं. प्रत्येक नात्याला न्याय दिला. कधीही कोणाशी भांडण नाही, कोणाला अपशब्द नाही. सगळं कसं; समोरच्या व्यक्तीला न दुखवता बोलायचं- काम करायचं. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांची लाडकी असणारी माई प्रत्येकाला आपुलकीने, प्रेमाने आपलंसं करायची आणि हा आपलेपणा शेवटच्या दिवसात प्रत्यक्ष पाहता आला- अनुभवता आला.

माई कधी स्वतःसाठी जगलीच नाही आणि त्या गोष्टीची तिला जाणीवच नसायची. ती फक्त आपल्या पतीकडे म्हणजे अण्णांकडे हट्ट करायची. जोपर्यंत सांगितलेली गोष्ट अण्णा करायचे नाहीत, तोपर्यंत माई त्यांचा पिच्छा पुरवायची आणि तिचा हट्ट तो कसला? तर स्वतःसाठी ०.१ टक्के आणि इतरांसाठी ९९.९९ टक्के!

शेवटच्या दिवसात तिला वेदना झाल्या; पण तिने कधीही असं म्हटलं नाही की, ‘‘मी आता मरते!’’ “मेलंय मेलंय!” मरण यातनाही तिने प्रेमाने स्वीकारल्या होत्या. ‘माझ्या पोटात दुखतं- माझं अंग दुखतं!’ एवढीच काय ती तिची तक्रार होती.

कुडाळ येथील राणे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन आम्ही चार दिवस घरी आणून ठेवले. नंतर पुढील उपचारासाठी सावर्डा येथे वालावलकर रुग्णालयात सात दिवस ऍडमिट करून पुन्हा घरी आणले. अगदी शेवटपर्यंत तिला ओळखणारी सगळी माणसं भेटून गेली. प्रत्येकाशी ती बोलली, प्रत्येकाची तिने विचारपूस केली. शेवटच्या दिवसातही तिने सर्वांना प्रेम देण्याचे व्रत सुरू ठेवले होते. शेवटी ती त्या प्रेमातच विलीन झाली.

माईचा देह अग्नीला समर्पित झाला खरा; पण माईची माया मात्र चिरंतर राहणार आहे. माईचं प्रेम नेहमीच आमच्या सोबत असणार आहे. माईचा तेजस्वी, कोमल देहच अध्यात्मिक-दैवीक अनुभूती देत होता.

‘मी हे केलं’, ‘मी ते केलं’, ‘माझ्यामुळेच सगळं काही…’ अशी वाक्य तिच्या तोंडी कधीच आली नाहीत. हा ‘मी’पणाच तिने इतरांना समर्पित केला होता, अगदी नकळतपणे! म्हणूनच तिचा शेवटचा दिवस गोड झाला.

तिला आपल्या प्रिय कन्येची नुसती भेट घ्यायची नव्हती; तर ‘श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्र’ म्हणत कपाळावर हात ठेवणाऱ्या कन्येची तिला भेट घ्यायची होती म्हणूनच ती शेवटची १४-१५ तास श्वासोच्छ्वास घेत होती.

जेवढं प्रेम तिने स्वतःच्या मुलांवर केलं; तेवढेच प्रेम तिने कुटुंबातील प्रत्येकावर केलं. त्यात तिने कधी दुजाभाव केला नाही. असे एक नव्हे तर अनेक सद्गुण तिने आपलेसे केले आणि अखंड आयुष्य सगळ्यांसाठी समर्पित केलं. अशा आमच्या माईला साष्टांग दंडवत!

माईचं कुटुंब ‘आपला पती- आपली मुलं’ इतकाच मर्यादित नव्हता, तर तिच्या कुटुंबाला मर्यादा नव्हती. ती शेवटच्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुतून दिसत होती.

गेल्या आठवड्यात माई मला म्हणाली, “हडकरानु मी कायम तुमच्या पाठीशी आहे!” जावई असल्याने कधीही माई माझ्याशी अधिक बोलली नाही. पण माईने मला दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी खूपच मोठा आहे. त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही. अशा माझ्या – आमच्या माईला ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असं म्हणावं असं मला वाटत नाही. कारण माईचा देह नसला तरी माईने मागे ठेवलेली आभाळाएवढी माया, प्रेम, जिव्हाळा अमर आहे म्हणूनच माईला पुन्हा साष्टांग दंडवत!

माईबद्दल लिहिण्यासारखं खूप आहे; पण माझ्या लेखणीत आता तरी ते सामर्थ्य नाही.
(भावूक होऊन लिहिले म्हणून चूक होऊ शकते; त्याबद्दल क्षमस्व!)

– नरेंद्र हडकर

नाथसंविध्

You cannot copy content of this page