महिलांसाठी उपयुक्त शिबिरात अ‍ॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभणार!

मुंबई (मोहन सावंत):- कौटुंबिक हिंसाचार कायदा, महिलांचे हक्क व कायदे आणि कौटुंबिक समुपदेशन जागृती शिबीर शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २ ते ४ ह्या वेळेत होणार असून त्यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, मुंबईच्या माजी महापौर अ‍ॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे सचिव अनंत किशोर देशमुख उपस्थित राहणार आहेत. महिलांसाठी उपयुक्त असणाऱ्या शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन व कौटुंबिक समुपदेशन विभाग सुरू झाला आहे. त्याबाबत जनजागृती होण्यासाठी कौटुंबिक समुपदेशन केंद्र, कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम मुंबई जिल्हा विधीसेवा प्राधिकरण त्यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कौटुंबिक हिंसाचार कायदा, महिलांचे हक्क व कायदे, कौटुंबिक समुपदेशन ह्या विषयावर उपस्थित तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे होणाऱ्या ह्या शिबिराचा लाभ घ्यावा; असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.