काय गोड गुरूची शाळा । सुटला जनक-जननींचा लळा।।

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

श्री साईसच्चरिताचा ३२ वा अध्याय सद्गुरू महिमेचा आहे. सद्गुरू प्रेम वर्णनाचा आहे. सद्गुरुंच्या अकारण कारूण्याचा आहे. त्यामुळे सतत वाचत रहावा असा मधुर आहे.

सुंदर प्रतिकं वापरून बाबांनी अतिशय रोचक पद्धतीने सद्गुरू महिमा समजावून सांगितला आहे.

या पृथ्वीतलावर मानवाला जन्म मिळाला. नाशवंत शरिर मिळाले आणि या देहाला चिटकून मोह, माया, राग, लोभ (षडरिपु) आलेच.

मोहापोटी मायेपोटी अनेक नाती तयार झाली. हा संसार वृक्ष वाढत गेला, फोफावत गेला.

जीव जन्माला येतो. दुःख, शोक आणि नाश हे जन्मलेल्या जीवाला बांधीलच आहे. जसा वृक्ष फोफावतो तसे मानवाचे आहे. या वृक्षाला ईषणा तृष्णेचे पाणी मिळते. मुलंबाळं, पतीपत्नी, धनधान्य ह्याच्या शाखा… लोभ वासनेच्या पारंब्या वाढतच जातात.

पण जर वेदग्रंथाच्या आधारे आचरण केले; यज्ञ, याग, भक्ती जर असेल तर हा संसारवृक्ष फुलेल.

संतांना शरण जाऊन, त्यांच्याविषयी अविश्वास, तर्क कुतर्क न करता बुद्धीने भक्तीचा किस न पाडता फक्त आणि फक्त गुरूचरणांवर दृढ विश्वास असावा.

साईनाथ सांगतात..,
आम्ही चौघे मित्र होतो. ज्ञानी, बुद्धिवान होतो. पोथ्या पुराणे वाचून ज्ञानाचा अहंकारही होता. चौघेही ब्रह्म ज्ञानावर मोठमोठ्या चर्चा करू लागलो. उद्धरेदात्मनात्मानं या गीतेतील वचनावर चर्चा करू लागलो.

पहिला- कुणा दुसर्‍यावर अवलंबून रहाणे चुकीचे आहे.
दुसरा- आपल्याशिवाय दुसरे जगात काही नाही. आपले मन आपल्या ताब्यात ठेवावे.
तिसरा- निर्विकार, निर्गुण हीच श्रेष्ठ भक्ती.
चौथा- पुस्तकी ज्ञान कशाला हवे? मनापासून काया वाचा, पंचप्राणाने त्याला अनन्य शरण जाणे हेच योग्य आहे.

सर्व चराचरात माझा गुरू व्यापून उरला आहे हा विश्वास असायला परमोच्च भक्तीची आवश्यकता असते. जे भक्तीसाठी वाद घालतात, चिकित्सक दृष्टीने भक्तीला तोलतात अशांपासून भक्ती लांब पळते. पण जो फक्त भक्तिभावाने साधा नमस्कार करतो त्याचा नमस्कार त्या इश्वरापर्यत निःशंक पोहोचतोच.

असे चौघे मित्र काही शोध लागावा म्हणून निघाले. आपण आपलाच स्वबुद्धीच्या जोरावरच शोध लावू हा हट्ट तिघांचा होता.

घनदाट अरण्यातून जिकडे काहीच माहिती नाही अशा रस्त्याने निघाले. रस्त्यात एक वनजारी भेटला.

वनजारी = कुठे निघालात? कुठे जायचे आहे? किती वेळ प्रवास करणार? काय शोधताय?
पण आम्हाला जे हवे आहे, ते असे सांगता येणार नाही म्हणून त्याला आम्ही टाळले.
त्यांची धावपळ बघून वनजाऱ्याला दया आली आणि तो म्हणाला की, असे एकटे फिरू नका. ज्याला हे वन माहिती आहे त्याला सोबत घ्या. किती ऊन आहे…. जरा बसा… भाकरतुकडा खा…. ऊपाशीपोटी नका फीरू. ऊपाशीपोटी डोकं काम करत नाही.

पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून सगळे पुढे गेले. काही वेळाने परत वनजारी भेटला. परत कळकळीने खाऊन घेण्याची विनंती केली. पण तिघांनी नाही ऐकले. मात्र त्याच्या प्रेमळ आणि निस्वार्थी कळकळीने चौथ्याचे हदय द्रवले. हा चौथा मित्र म्हणजे साईनाथ होते. असे कथेत बाबांना सांगायचे आहे.
मग बाबांनी चतकोर भाकरी खाल्ली आणि पाणी प्यायले.
तर काय आश्चर्य? गुरूमाऊली तिकडे आली; त्यांना सगळे सांगितले. गुरू म्हणाले माझ्यासोबत या तुम्हाला हवे ते मिळेल, पण माझे जो ऐकेल त्यालाच फळ मिळेल.

पण एवढे सांगूनही बाकीचे सगळे गेले. मात्र बाबा थांबले.
त्यांना गुरूंनी विहिरीजवळ नेले. पाय बांधले. खाली डोके वर पाय असे विहिरीत मधोमध सोडले. दोरीचे दुसरे टोक विहिरी काठच्या झाडाला बांधले. नाका तोंडात पाणी जाणार नाही असे बांधून निघून गेले.

काहीवेळाने गुरू परत आले. घाईघाईने बाबांना बाहेर काढले आणि प्रेमाने कसा आहे? विचारले.
बाबा म्हणाले की, खुप छान वाटले. अत्युच्च आनंद मिळाला.

ही प्रतिकात्मक डोळ्यात अंजन घालणारी कथा आहे.

ते झाड म्हणजे षडरिपु मोह मायेचे….. चौघे मित्र= एक ज्ञानी, दुसरा योगी, तिसरा कर्मठ, चौथा भाविक भक्ती मार्गात असणारा…

वनजारी गुरूच होते. वाट चुकलेल्यांना कळकळीने स्वत:बरोबर येण्यास सांगतात आणि अन्न हे पुर्णब्रह्म आहे. शरीराला ही आहुती दिल्याशिवाय हा यज्ञ चालू राहत नाही.

अंतरीच्या आत्म्याला शांत ठेवणे हेही आवश्यक आहे. रिकाम्या पोटी भक्ती करणे अवघड आहे. म्हणून अन्नाला डावलू नये.
तो वनजारी जसा भेटतो तसाच कित्येक वळणावर सद्गुरु वेष बदलून आम्हाला सावध करत असतात, मार्ग दाखवतात. पण आपण अहंकाराने माझेच खरे म्हणून असे संकेत ओळखु शकत नाही.

गुरू बाबांना झाडाला उलटे टांगतात.  संता घरची उलटि खूण…

षडरिपुंच्या, माया, लोभाच्या झाडापासून दुर उलट दिशेने मुळाकडे परमानंदाकडे प्रवास….
जल म्हणजे जीवन….
हेच जल तृप्त करणारेही आहे. पण ईषणा तृष्णा असेल तर त्यानेही जीव गुदमरेल.

म्हणूनच या संसारात राहूनही जेव्हा सद्गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून असे उलटे टांगून घेणे आहे. अलिप्तता, कर्तव्य करणे; पण लक्ष फक्त त्याच्याच चिंतनात असणे म्हणजे भक्ती… भाव भक्ती असेल तर तो देव विनासायास सापडेल. नाहीतर सगळे शब्दखेळ.

ज्ञानी लोकांना प्रयास करावे लागतात; तरीही देव मिळेलच ह्याची शाश्वती नाही. कारण अहंकार आहे.
तसेच योगी कष्टप्रद मार्ग आहे.
सगळ्यात सोपा साधा सरळ मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे.

ह्या कथेतून बाबा सद्गुरु का असावा? सगळ्यात भक्ती मार्ग कसा श्रेष्ठ? हे सांगतात.

सद्गुरू भेटल्यावर मी, माझे असा अहंकार लोप पावतो व नाथसंविध्, अंबज्ञ सुरू रहाते; तेही त्याच्याच अकारण कारूंण्याने…

हा अध्याय खुप छान आहे. मला थोडे फार जेवढे समजले ते लिहिण्याचा प्रयास केला.

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

सुनितावीरा बडवे
औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *