शहापूरमधील दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू; तीन जखमींवर उपचार सुरु
ठाणे:- शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावरील पुलावर गर्डर टाकण्याच्या वेळी सोमवारी (दि. 31 जुलै) रात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 20 जण मयत झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, याची काळजी घेण्याबाबत सूचना एमएसआरडीसीला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह भिवंडीचे प्रांताधिकारी अमित सानप, कामगार उपायुक्त प्रदीप पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, झालेली घटना दुर्देवी आणि दु:खद आहे. या ठिकाणी जवळपास 700 टनांचा लाँचर आणि 1 हजार 250 टनांचा गर्डर आहे. हे तांत्रिक काम सुरू असताना दुर्देवाने लाँचर आणि गर्डर पडल्याने ही घटना घडली आहे. यामध्ये काम करणारे अभियंते व मजूर असे मिळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी आहेत. पाच जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या ठिकाणी 28 जण काम करीत होते. या घटनेची चौकशी करण्यात येणार असून या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. व्हीएसएल ही कंपनी हे काम करीत असून या दुर्घटनेची चौकशी करण्याकरिता तज्ञांचे पथक घटनास्थळी येणार आहे. लाँचर आणि गर्डर कशामुळे पडला याचा तपास करण्यात येईल. या चौकशीमध्ये जे बाहेर येईल त्याप्रमाणे कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेची गांभिर्याने दखल घेतलेली आहे. त्यांनी देखील मृत व्यक्तीकरिता संवेदना व शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या परिवाराला केंद्र शासनाकडून 2 लाख रुपयांची आणि राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम करणाऱ्या व्हीएसएल कंपनीने देखील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
रात्री या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह (एनडीआरएफ), अग्निशमन दल, नागरी संरक्षण दलाचे अधिकारी व स्वयंसेवक , महसूल विभागाचे अधिकारी- कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. तसेच अपघाताची माहिती कळताच मध्यरात्री तातडीने सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचप्रमाणे ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनीही भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला.
दुर्घटनेतील जखमीपैकी एकावर शहापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात आणि दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे.
घटनेची माहिती मिळताच भिवंडीचे उपविभागीय अधिकारी श्री. सानप, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रेवती गायकर, शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर यांनी तातडीने बचावकार्यासाठी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकारी श्री. शिनगारे हेही रात्रीच घटनास्थळी पोहोचून बचावकार्यावर देखरेख ठेवत होते.