मालवाहतूक वाहनांना मुंबई-पुण्यात वाहतूकीसाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी!
लॉकडाऊनच्या काळात वाहतूक बंद राहिल्याने मालवाहतूक वाहन धारकांवर उपासमारीची वेळ!
मालवाहतूक वाहनांना मुंबई-पुण्यात वाहतूकीसाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी!
जनता दल (सेक्युलर) मुंबई पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबई:- लॉकडाऊनच्या काळात वाहतूक बंद राहिल्याने मालवाहतूक वाहन धारकांवर उपासमारीची वेळ आली असून मालवाहतूक वाहनांना मुंबई-पुण्यात वाहतूकीसाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची मागणी जनता दल (सेक्युलर) मुंबई पक्षाने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे. राज्यातील विशेषतः मुंबई-पुण्यातील माल वाहतूकदारांच्यावतीने हे निवेदन मुख्यमंत्र्यांना, परिवहन मंत्र्यांना जनता दल (सेक्युलर) मुंबई पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर तसेच पक्षाच्या ईशान्य मुंबई व दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष अनुक्रमे संजीवकुमार सदानंद आणि उल्हास फाटक यांनी दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, मार्च २०२० पासून संपूर्ण देशात कोरोनाची लाट पसरली व सर्व अर्थव्यवहार ठप्प झाले. याचा मोठा फटका विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना बसला. कर्ज घेऊन व्यवसाय करणारे व्यावसायिक तर मोठ्या अडचणीत सापडले. कारण एकीकडे व्यवसाय बंद तर घेतलेल्या कर्जावरील व्याज व हप्ते सुरू अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर आत्महत्येची वेळ आली. मालवाहतुकीचे काम करणाऱ्या व्यावसायिकांची स्थितीही वेगळी नाही. कर्ज काढून घेतलेली वाहने जाग्यावरच उभी राहिल्याने कर्जाचे हप्ते, व्याज, विमा अादी खर्च भागवणे त्यांना अशक्य झाले आहे. त्यातच मुंबई व पुणे या दोन शहरांमध्ये मालवाहतूक करणारी वाहने आठ वर्षांपेक्षा अधिक काळ वापरता येत नाहीत. त्यामुळे आठ वर्षे पूर्ण होताच ही वाहने अतिशय कमी किंमतीत विकण्याची वेळ दोन्ही शहरांमधील व्यावसायिकांवर येते.
मार्च २०२० पासून बहुसंख्य वाहने फारसा वापर न होता जाग्यावर उभी आहेत. त्यामुळे आठ वर्षांनी व्यावसायिक वाहने मोडीत काढण्याच्या वा ती महानगराबाहेर चालविण्याच्या अटीपासून सर्व व्यावसायिकांना दोन वर्ष सूट देणे तर्कसंगत आणि न्यायाचे होईल. आजही देशातील अर्थव्यवस्थेला फारसी चालना नाही. त्यामुळे सर्वच व्यावसायिक, उद्योजक अडचणीत आहेत. आधीचेच कर्ज थकित असल्याने नवे वाहन घेण्यासाठी वाहतुकदारांना बँकाही कर्ज द्यायला तयार होणार नाहीत. या पार्श्वभूमीवर आठ वर्षे होत आलेल्या व्यवसायिक वाहनांना महानगरांमध्ये वाहतूक करण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी!
दुसरीकडे मुळातच या धोरणाचा फेरविचार करण्याची गरज आहे. कारण व्ही. एम. लाल समितीच्या शिफारशीनुसार मुंबई-पुणे या शहरांमध्ये ट्रकसारखी मालवाहू वाहने आठ वर्षांच्या पुढे वापरण्यास मनाई करण्यात आली. मात्र, २० वर्षांत या क्षेत्रात मोठे बदल झाले असून बीएस- ४, बीएस- ६ या श्रेणीतील आधुनिक वाहने वापरात आली असून त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना मुंबई-पुणे या शहरात आठच वर्षे वापर करण्याची अट शिथिल करून तो कालावधी किमान १२ वर्षे करावा, अशी वाहतूकदारांची विनंती आहे. कारण आठ वर्षांत, वेतन, इंधन, विमा, देखभाल हे खर्च भागवून वाहनांची किंमत वसूल करणे अवघड नव्हे अशक्य झाले आहे. मात्र, आठ वर्षे होताच मिळेल त्या भावात वाहन विकण्याशिवाय पर्याय राहात नाही. त्यामुळे याचाही फेरविचार होणे आवश्यक आहे.