असलदे शिवाजीनगरमधील शाळेनजीक आणि भरवस्तीत असणारा मोबाईल टॉवर बंद करण्याची पालकांची मागणी

नांदगाव (प्रतिनिधी)- असलदे (ता. कणकवली, जिल्हा-सिंधुदुर्ग) गावातील शिवाजी नगरात प्राथमिक शाळेनजीक आणि भरवस्तीत स्थानिकांचा विरोध असूनही मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. हा मोबाईल टॉवर उभारण्यात येत असताना त्याचे काम त्वरित थांबवावे; अशा तक्रारी सदर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित यंत्रणेकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन कणकवली शिक्षण विस्तार अधिकारी राऊत यांनी शाळेच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून पालकांशी, शिक्षकांशी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्याचा अहवाल ते आपल्या वरिष्ठांना देणार आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, असलदे गावातील शिवाजीनगरात असलेल्या प्राथमिक शाळेनजीक आणि भरवस्तीत मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. स्थानिकांना कोणतीही कल्पना न देता असलदे ग्रामपंचायतीची तथाकथित परवानगी घेऊन हा मोबाईल टॉवर उभारण्यात आला. केंद्रसरकारच्या मार्गदर्शक नियमांनुसार भरवस्तीत मोबाईल टॉवर बसविण्याची परवानगी मिळत नाही. असे असतानाही असलदे ग्रामपंचायतीने सदर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी परवानगी कशी काय दिली? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ विचारात आहेत.

सदर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ह्या मोबाईल टॉवरचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात; म्हणून संबंधित यंत्रणेकडे आणि नांदगाव सरपंचांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार नांदगाव सरपंचांनी जिल्हाधिकारी, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. सदर शाळेनजीक आणि भरवस्तीत असणारा मोबाईल टॉवरचे काम स्थगित करण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी; अशी मागणी करण्यात आली होती. त्याची दखल प्रशासनाने घेतली आहे.

आता सदर मोबाईल टॉवर बंद झाला नाही तर तर उपोषणाला बसण्याचा इशाराही आता पालकांनी दिला आहे. त्यासंदर्भात कणकवली शिक्षण विस्तार अधिकारी राऊत यांनी शाळेच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून आणि पालकांशी, शिक्षकांशी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्याचा अहवाल ते आपल्या वरिष्ठांना देणार आहेत; असे उपस्थित पालकांनी सांगितले.

यावेळी पालक कमिटी अध्यक्ष अझरुद्दीन कुणकेरकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा मोरये तसेच पालक कमिटीचे सदस्य आणि शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page