शिक्षणातून माणसातला माणूस घडू शकतो! -आनंद वाचनालय आयोजित वाचक स्पर्धेत वाचकांनी व्यक्त केले विचार

(छायाचित्र- आनंद वाचनालय मिठमुंबरी सिद्धार्थ नगर आयोजित मला आवडलेले पुस्तक या वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी युवाई, बाजूला पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्पिता मुंबरकर, खजिनदार शांती बागवे परीक्षक सत्यन आणि मोहनीश.)

स्पर्धेत प्रिया संजय मुंबरकर हिने प्रथम क्रमांक

देवगड (प्रतिनिधी):- “शिक्षणातून माणसातला `माणूस’ घडू शकतो. या दृष्टीने युवाईने वाचनाची आवड जोपासणे गरजेचे आहे. यासाठी वाचनालयांची भूमिकाही महत्त्वाची असते!” असे विचार आनंद वाचनालय, मिठमुंबरी येथील बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात आयोजित ‘मला आवडलेले पुस्तक’ या वाचक स्पर्धेतील सहभागी युवाईने व्यक्त केले.

आनंद विकास मंडळ, मिठमुंबरी सिद्धार्थ नगर संयोजित आनंद वाचनालयामार्फत ‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वाचक स्पर्धेत विनिता मुंबरकर हिने विश्वास नागरे पाटील यांच्या ‘मन मे है विश्वास’ या आत्मचरित्रावर बोलताना विश्वास नागरे पाटील यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना कसा चिकाटीने अभ्यास केला, याची माहिती सांगितली. त्यांचे वडील तात्या यांची तीव्र इच्छा होती की `माझ्या मुलाला माझे डोळे मिटायच्या आत मला लाल दिव्याच्या गाडीत बसलेले पाहायचे आहे!’ ही त्यांची इच्छा त्यांनी अत्यंत चिकाटीने पूर्ण केली. युवाईने अशा स्वरूपाचा आदर्श जोपासायला हवा.

प्रिया मुंबरकर हिने श्री वामनराव पै यांच्या ‘अंधार अंधश्रद्धेचा’ या पुस्तकावर बोलताना अंधश्रद्धेमुळे समाजाचे कसे नुकसान होते; याविषयी सद्गुरु वामनराव पै यांनी समाजाला दिलेला अंधश्रद्धेच्या मुक्तीचा विचार सांगितला.

मोनिका मुंबरकर हिने शंकर तडाखे यांच्या ‘क्रांतीपिता लहुजी वस्ताद’ या लहुजी साळवे यांच्या चरित्राचे विवेचन केले. लहुजी साळवे यांचे स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान, महात्मा फुले यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक चळवळीसाठी दिलेले योगदान या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी आपली पुतणी मुक्ता साळवे हिला शिक्षणासाठी दिलेले प्रोत्साहन याविषयी उपस्थितांना माहिती सांगितली.

नेहा मुंबरकर हिने अब्दुल कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या चरित्रावर बोलताना अब्दुल कलाम यांच्या खडतर जीवन प्रवासाचा आढावा घेतला. युवकांनी अग्निपंख वाचून आपल्या जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा; असे आव्हानही तिने सहभागींना केले.

रिया मुंबरकर हिने साने गुरुजी यांच्या ‘इस्लामी संस्कृती’ या पुस्तकाचे विवेचन करताना सांगितले की साने गुरुजींनी या पुस्तकात इस्लामच्या मानवतेच्या शिकवणीवर प्रकाश टाकला आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या विचारातून माणसातला माणूस कसा जागृत होतो. इस्लामची बंधूत्वाची शिकवण सर्वच मानव समाजाने समजून घ्यायला हवी. आई-वडिलांचा प्रतिपाळ, अपंगांना मदत, स्त्री भ्रूणहत्येला विरोध, स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे ही महंमद पैगंबरांची शिकवण होती. सर्वच समाजाने या शिकवणीचा आदर्श घ्यायला हवा. याचबरोबर कौस्तुभ कांबळे यानेगुणसिरी यांच्या ‘धम्मक्रांतीची पाच सूत्रे’ आणि सृष्टी मुंबरकर हिने कल्पना कराडे यांच्या ‘आरसा’ या पुस्तकाचे विवेचन केले.

या स्पर्धेत प्रिया संजय मुंबरकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. नेहा विश्वास मुंबरकर तिने द्वितीय तर मोनिका दयानंद मुंबरकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. विनिता विलास मुंबरकर आणि रिया संजय मुंबरकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सत्यन मुंबरकर आणि मोहनीश मुंबरकर यांनी केले.यावेळी पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्पिता मुंबरकर यांनी स्पर्धकांना वाचन कसे करावे. त्यामध्ये सातत्य कसे राखावे. याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी पंचशील महिला मंडळाच्या खजिनदार शांती आणि आनंद विकास मंडळाचे सल्लागार प्रा. डॉ. आर. ए. मुंबरकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page