माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचं निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली:- भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे आज निधन झालं. प्रकृती अस्वस्थामुळे काही दिवसांपासून त्यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रणव मुखर्जी ८४ वर्षाचे होते.

१९६९ पासून प्रवण मुखर्जी यांनी आपला राष्ट्रीय राजकारणात ठसा उमठविला. विद्वान असूनही शांत आणि मुत्सद्दी स्वभाव, उत्कृष्ट संभाषण कौशल्य अशा सद्गुणांनी प्रवण मुखर्जी यांनी भारतीय राजकारणात अमूल्य असे योगदान दिले. त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने; तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

प्रवण मुखर्जी यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविले होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचे अर्थमंत्रीपद भूषविले. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष काढला व १९८९ नंतर त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.

प्रणव मुखर्जी यांनी योजना आयोगाचे अध्यक्ष, परराष्ट्र मंत्री म्हणूनही कार्य केले. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. उद्या शासकीय इतमामात मुखर्जी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

You cannot copy content of this page