जीवनात यशस्वी होण्यासाठी आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करुया!
गोपुरी आश्रमात वाचन संस्कृती विकास कार्यक्रमात `युवाई’ने केला संकल्प
कणकवली:- `भविष्यात स्वतःची उन्नती करायची असेल तर आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. भविष्यातील बदलत्या जगात आपले जीवन समृद्ध करायचे असेल तर आपण आव्हानांना सामोरे जाण्याचा संकल्प करूया व त्याप्रमाणे वाटचाल करण्याचा प्रयत्न करुया. याकरिता वाचनाची आवड जोपासणे गरजेचे आहे. वाचनातून आपल्याला समस्त जीवनाचा सुर सापडतो. आपण ‘माणूस’ म्हणून आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करुया!’ असा संकल्प गोपूरी आश्रमात आयोजित २०१९ या वर्षाच्या पहिल्या वाचन संस्कृती विकास कार्यक्रमात यूवाईने केला.
आजच्या कार्यक्रमात या संकल्पनेला साजेशा पुस्तकांवर युवाईने विवेचन केले. राष्ट्रसेवा दल शाखा, कणकवली व गोपुरी आश्रमाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेजश्री आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रथमेश लाड, संघटक सागर कदम, प्रज्ञा कदम, सल्लागार डॉ. राजेंद्र मुंबरकर, ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी आदी मान्यवर उपस्थितीत होते.
आजच्या कार्यक्रमात श्वेता ढवळ हिने आय. पी. एस. अधिकारी विश्वास नागरे पाटील यांच्या ‘मनमे है विश्वास’ या आत्मचरित्राचे विवेचन केले. विश्वास नागरे पाटील यांचा जीवन प्रवास उपस्थितांसमोर मांडला. त्यांच्या वडिलानी विश्वास नागरे पाटील यांच्याकडे “मला तुला लाल दिव्याच्या गाडीत बसलेले पाहायचे आहे!” अशी इच्छा व्यक्त केली. अपयश आले तरी वडिलांची इच्छा आपण पूर्ण करायची आहे. या ईर्षेने कसे यश मिळवले? याची स्फूर्तिदायी कथा उपस्थितांना ऐकवत या चरित्रामुळे स्वतःला स्वतः बद्दल विश्वास संपादन करता आल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात अनन्या देसाई या इयत्ता आठवी इयत्तेमधील चिमुरडीने तर डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या “कोल्हाट्याच पोर” या आत्मचरित्राचे विवेचन केले. किशोर काळे यांनी समाजाचे हेटाळणीचे जीने जगातानाही समाजातील उच्च दर्जाचे डॉक्टरकीचे स्वप्न कसे साकार करतात. समाजाला जगण्याचा संदेश देतात; याविषयी माहिती सांगितली.
सोनल भिसे हिने म. गांधी यांचे नातू अरुण गांधी यांच्या साधना साप्ताहिकाने अलीकडेच प्रकाशित केलेल्या “वारसा प्रेमाचा” या पुस्तकातील ‘सेवाग्राम आश्रमाला पहिली भेट ‘ या लेखाचे विवेचन केले. गांधीजींचा सत्याच्या तत्वाचे विवेचन अतिशय मार्मिकपणे अरुण गांधी यांनी या लेखात सांगितले आहे. अरुण गांधी लिहितात, ‘आजोबांचं सत्यापर्यंत जाण्यासाठी जगण्याचं तत्तवज्ञान त्यांच्या रोजच्या जगण्यात वारंवार तपासले जात असे आणि त्यात योग्य वाटेल त्याप्रमाणे दुरुस्त्या केल्या जात.’ गांधीजी म्हणत “प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक घटनेतून मला माझ्या श्रद्धेविषयी आणि विश्वासाविषयी नवे पैलू उलघडतात. सत्याबद्दलची आपली समज सुद्धा कायम एकसारखी राहत नाही. म्हणून जो परिश्रमपूर्वक आपली सत्याची समज वाढवण्यासाठी पिच्छा पुरविण्यास तयार असतो अशा माणसाला आपली मतं पुन्हा पुन्हा सातत्याने तपासावी लागतात!”
अंकिता सामंत हिने अण्णाभाऊ साठे यांच्या “आवडी” या कादंबरीचे विवेचन केले. तर पूजा खरात यांनी अण्णाभाऊंच्या इनामदार आणि इतर लोकनाट्य या पुस्तकांचे विवेचन केले.
सिद्धी वरवडेकर हिने साधना साप्ताहिक २०१८ च्या दिवाळी युवा अंकातील संकल्प गुर्जर यांचा “रग्बीचा खेळ आणि नेल्सन मंडेला” या लेखाचे विवेचन करताना नेल्सन मंडेला यांनी रग्बी या खेळाच्याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील वर्ण विद्वेशाची यादवी होण्याची निर्माण झालेली परिस्थिती रग्बीच्या खेळाच्या माध्यमातून या देशातील कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीयांमधील वर्णविद्वेशाची दुही कशी संपवली आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरीकांच्यात सामंजस्य निर्माण करून नागरिकांची ‘राष्ट्र’भावनेबाबत कशाप्रकारे मने सांधण्याचा प्रयत्न केला; हा विचार उपस्थितांना समजून दिला. भारतात राष्ट्रपेक्षा काही मंडळींना धर्म महत्त्वाचा वाटतो. नेल्सन मंडेला यांना मात्र आपल्या राष्ट्राचे एकसंघत्व महत्त्वाचे वाटले. त्यांनी ते रग्बीच्या खेळातून अबाधित ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. श्वेत आणि कृष्वर्णीय यांनी हा विचार मनापासून स्वीकारून नेल्सन मंडेला यांना साथ दिली.
पल्लवी कोकणी हिने हमीद दलवाई यांच्या “लाट” या लघुलेख संग्रहाचे विवेचन केले. तर नेहा घोने हिने महेश एलकुंचवार यांच्या “वाडा चिरेबंदी” या पुस्तकाचे विवेचन केले.
सागर कदम याने आपली स्वरचित कविता – ‘प्रिय कविता’ सादर केली. प्रज्ञा कदम हिनेही आपली स्वरचित कविता सादर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष तेजश्री आचरेकर यांनी कन्नड साहित्य लेखिका सुधा मूर्ती यांच्या “महाश्वेता” या कादंबरीचे विवेचन करताना कोड आलेल्या स्त्रीला तिचा डॉक्टर नवरा कसा नाकारतो. परंतु महाश्वेता अशा हेटाळणीच्या परिस्थितीतही स्वतःचे अस्तित्व कसे निर्माण करते? पारंपरिक आयुष्यातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचं यथोचित भान देऊन स्वतःच्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतके सक्षम केले आहे. या तरुणीच्या धाडसाची कहाणी उपस्थितांसमोर कथन करून जीवनात यशस्वी होण्यासाठी अव्हांनाना सामोरे जाण्याचा प्रयत्न करुया; असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पल्लवी कोकणी तर आभार रमेश पटकारे यांनी मानले. या वाचन संस्कृती कार्यक्रमात २५ जण सहभागी उपस्थित होते.