रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याची ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची मागणी

मालवण:- मालवण कसाल रस्ता तसेच कुंभारमाट जरीमरी उतार रस्ता आणि फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोटपर्यत रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे; अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, मालवण तालुका कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे उपअभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मालवण कसाल रस्ता तसेच कुंभारमाट जरीमरी उतार रस्ता आणि फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोटपर्यत रस्ता पूर्णपणे जागोजागी खड्डे पडून पूर्णपणे खराब झालेला आहे. त्यामुळे वाहन चालकांना तसेच प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहन चालकांच्या व प्रवाशांच्या या जीवघेण्या खेळाची वेळीच दखल घेऊन सदरच्या मार्गाचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे; अन्यथा सनदशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल; असा इशारा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.