कणकवलीत उड्डाण पुलाखालील रस्ते वाहतुकीस योग्य व अपघात मुक्त करा!

कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली शहरातून राष्ट्रीय महामार्गावर नव्याने उभ्या राहिलेल्या उड्डाण पुलामुळे गडनदी ते जानवली नदी दरम्यानचा प्रवास गतीमान झाला असला तरी ह्याच उड्डाण पुलाखालील अरुंद सर्व्हिस रस्त्यांमुळे आणि स्पीडब्रेकर नसल्यामुळे ठिकठिकाणी अपघात होत आहेत. जर त्याची दखल राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतली नाही तर भविष्यातही जीवघेणे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नुकतेच कणकवली आगार व्यवस्थापकांनी उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडी, मुख्याधिकारी नगरपंचायत कणकवली आणि कणकवली पोलीस निरीक्षक यांना दिले आणि वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या अवैध दुकाने हटविण्याची मागणी केली आहे.

तहसीलदार कार्यालयाजवळील रस्ता, कै. श्रीधर नाईक चौक (नरडवे नाका), कणकवली एस. टी. आगारासमोर, डीपी रोड समोर, अभ्युदय बॅंक समोर (परमपूज्य भालचंद्र महाराज मंदिरला जाणारा रस्ता ) हे सगळे उड्डाण पुलाखालील रस्ते त्वरित रूंद करणे गरजेचे आहे. याठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतात. एस् टी. आगारासमोर पुलाखालील अवैध कपड्याची दुकाने थाटली गेली असल्याने वाहन चालकांना समोरील वाहने दिसत नाहीत. त्यामुळे तिथेही अपघात होऊ शकतात. सर्व्हिस रोडवर बसणारे भाजीवाले, फळेवाले, फुलवाले, हातगाडीवाले विक्रेते मोठ्या प्रमाणात असल्याने वाहने चालवायची कशी आणि चालत जायचे कसे? असा वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना प्रश्न पडतो. रिक्षाचालकही रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग करतात.

ह्यासंदर्भात संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन वाहतुकीस अडथळा होणार नाही आणि अपघात होणार नाहीत ह्याची काळजी घेऊन उपाययोजना आखाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.