राष्ट्रीय लोक अदालतीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयात 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले असल्याचे माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए.बी. कुरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग ओरोस, दिवाणी न्यायालय (व. स्तर), मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, सिंधुदुर्ग या न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकन्यायालयात नेमुन घेण्याबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस.जे. भारुका यांनी याबाबत सांगितले की, दिवाणी तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी, कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे 9 सप्टेंबर 2023 रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये 2343 प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत, तर 248 वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. अजुनही तडजोड होऊ शकणारे प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये ठेवावयाची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे, असे संबंधित अधीक्षक अथवा लिपिक यांना कळवावे.

राष्ट्रीय लोक न्यायालयात तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, जीवन सुखमय होऊ शकेल, क्षुल्लक वादाचे पर्यवसान कायमस्वरुपी वादात होणार नाही. वैराने वैर वाढतच राहते, असे होऊ नये यासाठी सामंजस्य घडवावे हाच लोकन्यायालयाचा हेतू आहे. शिवाय या निकालाविरुध्द अपिल होत नाही. वेळ व पैशांची बचत होते, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी कळविले आहे.

You cannot copy content of this page