सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या देवदूतांचा गौरव

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या संघटनेने घेतली त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल

कुडाळ (प्रतिनिधी):- कोरोना काळात सर्व रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्याचे अतुलनीय कार्य करणाऱ्या कुडाळ येथील ओम साई ऑक्सिजन कंपनीचे मालक दिपक कुडाळकर व त्यांच्या टीमचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग ह्या संघटनेच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कोरोनासारख्या महामारीच्या काळात रुग्णांना ऑक्सिजनची मोठी समस्या भेडसावत होती. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागणार ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम कुडाळ येथील ओम साई ऑक्सिजन कंपनीने अविरतपणे केले. ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याभरातील सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा वेळीच पुरवठा करण्याचे उल्लेखनीय कार्य केले. कोरोना कालावधीत जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे लाखो रुग्णांचे प्राण वाचले.

अशा देवदूतांचा सत्कार ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांच्या हस्ते कुडाळ येथील कंपनीच्या स्थळी जाऊन करण्यात आला. यावेळी सत्कार मुर्ती ओमसाई ऑक्सिजन कंपनीचे संचालक दिपक कुडाळकर व त्यांच्या टीमचे सहकारी शंकर सावंत, हरीप्रसाद चव्हाण, महेश सावंत, भाऊ सरमळकर, ज्ञानेश पालव यांना संघटनेच्यावतीने प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page