असलदे गावातील विकासाच्या वटवृक्षाला सलाम!

गावाचे प्रथम सरपंच अंकुश डामरे यांना नव्वदाव्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

असलदे गावचे प्रथम सरपंच आणि नांदगांव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्ष श्री. अंकुश डामरे यांचा आज नव्वदावा वाढदिवस! त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लेख लिहिण्यास सुरुवात कुठून करावी? हा प्रश्न उभा राहिला! कारण त्यांच्याकडील असलेला दीर्घ अनुभव आम्ही नेहमी लक्षपूर्वक ऐकत असतो. संधी मिळताच आम्ही त्यांच्याशी सुसंवाद साधत असतो.

स्वतंत्र असलदे ग्रामपंचायतीची स्थापना झाली १९७४ साली! त्यापूर्वी असलदे आणि कोळोशी ह्या दोन गावांची मिळून संयुक्त ग्रामपंचायत होती. त्या ग्रामपंचायतीमध्ये अकरा सदस्यांपैकी सहा सदस्य असलदे गावचे असायचे; परंतु सरपंचपद कोळोशी गावाकडे असायचे. त्यामुळे असलदे गावातील विकासाची कामे ज्या वेगात व्हायला हवीत ती झाली नाहीत. ही बाब जुन्याजाणत्या बुजुर्ग लोकांनी जाणली आणि `असलदे गावचा सरपंच असावा’ हा विचार गावातून पुढे आला. मात्र हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आदरणीय स्वर्गीय नाना मास्तर ( भिवाजी सदाशिव लोके, असलदे – मधलीवाडी) यांनी यशस्वी नियोजन केले आणि अंकुश डामरे असलदे – कोळोशी संयुक्त ग्रामपंचायतीचे १९६३ साली सरपंच झाले.

ग्रामपंचायतीच्या कामाचा, प्रशासनाच्या कामकाजाचा कोणताही अनुभव नसताना मोठ्या हिम्मतीने आणि धैर्याने डामरे यांनी ग्रामपंचायतीचा कारभार केला. पाच वर्षे विकासाचे यशस्वीपणे कार्य केल्याने असलदे व कोळोशी ह्या दोन्ही गावांनी पुन्हा सरपंच पदाची संधी त्यांना दिली. १९७३ मध्ये असलदे आणि कोळोशी ग्रामपंचायतीचे विभाजन झाले अर्थात दोन गावच्या दोन ग्रामपंचायती स्थापित करण्यात आल्या. १९७३ मध्ये शासनाच्या प्रशासकाने कारभार करून १९७४ साली स्वतंत्र असलदे ग्रामपंचायतीमध्ये असलदे गावाचा सरपंच स्थानापन्न झाला.

१९६३ ते १९७२ ह्या नऊ वर्षाच्या काळात अंकुश डामरे यांनी असलदे आणि कोळोशी गावात केलेले काम अजूनही आपण पाहू शकतो. विशेषतः असलदे गावात दिवाणसानेवाडी आणि तावडेवाडी नदीच्या बाजूला असल्याने तेथील रहिवाशांना पाण्याची तेवढीशी अडचण नव्हती. मात्र गावातील इतर सर्व वाड्यांवर पावसाळ्याचे चार महिने आणि नंतरचे दोन-तीन महिने पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असायचे. मात्र पुढील पाच – सहा महिने दुष्काळी परिस्थिती असायची. पाणी नसल्याने होणाऱ्या हालअपेष्टा वेदनादायी असायच्या. बरीच मंडळी मार्च, एप्रिल, मे महिन्यात सकाळी मुलाबाळांसह गुराढोरांना नदीवर घेऊन जायचे व सायंकाळी पाणी घेऊन परतायचे. पाण्यासाठी हाणामारी व्हायच्या. दिवसरात्र चोवीस तास पाणी भरण्यासाठी नंबर लागायचे. ह्या वेळेचे वर्णन शब्दांकित करणेही कठीण आहे. अशावेळी सरपंच असणाऱ्या अंकुश डामरे यांनी पडक्या विहिरी, पाण्याचे स्त्रोत पक्या चिऱ्यांनी बांधून घेतले. गावातील पाण्याच्या दुष्काळाला थांबविण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न नेहमीच स्मरणात राहील. त्यावेळी ग्रामपंचायतीला आजच्यासारखा करोडो रुपयांचा फंड नसायचा. ग्रामपंचायतीचे उत्पन्न शेकडो रुपयांमध्येही नसायचे. कारण घरपट्टी सरासरी २०-२५ पैसे असायची. अशा प्रतिकूल परिस्थितीत विहीर बांधण्यासाठी आवश्यक असणारे चिरे, वाळू, सिमेंट अशा साहित्याची वाहतूक हे सरपंच महोदय स्वतःच्या बैलगाडीतून करायचे. आपल्या गावाच्या प्रश्नासाठी आपला वेळ, आपली मेहनत आणि आपली बुद्धी समर्पित करण्याची अंकुश डामरे यांची वृत्ती आदर्शवादी आहे; म्हणूनच गावात अनेक विहिरी सुस्थितीत आजही उभ्या आहेत.

अंकुश डामरे यांनी पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याचे स्त्रोत खुले करून दिले, ते पुन्हा स्थापित केले. पाण्याला जीवनाची उपमा दिली जाते. हे पाणीरूपी जीवन गावाला देण्याचे महत्त्वपूर्ण काम डामरे यांनी केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी कोळोशी-हडपीड येथे जाण्याशिवाय त्यावेळच्या विद्यार्थ्यांना पर्याय नसायचा. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहायचे. त्याचवेळी वायंगणकर मास्तरांनी पुढाकार घेऊन नांदगाव पंचक्रोशीसाठी हायस्कूल उभारणीचे ध्येय बाळगले. मात्र हे ध्येय पूर्ण करण्यासाठी सरपंच असलेल्या अंकुश डामरे यांनी सिंहाचा वाटा उचलला. तेव्हा गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती अगदी हलाखीची असायची. गिरणीत काम करणारा चाकरमानी तुटपुंज्या पगारावर मुंबईत राबराब राबायचा आणि उरलेली थोडीशी रक्कम मनीऑर्डरने गावात असलेल्या कुटुंबियांना पाठवायचा. अशा परिस्थितीत हायस्कूल बांधण्यासाठी निधी कसा उभारायचा? हा मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला आणि त्यातूनही सरपंच अंकुश डामरे यांनी राबविलेली संकल्पना यशस्वी झाली. त्यातून शैक्षणिक विकासाचा पाया रोवला गेला होता. गावातील विद्यार्थी हायस्कूलमध्ये सहजपणे जाणार होते. त्यांना माध्यमिक शिक्षण सोपे जाणार होते.

हायस्कूलची इमारत बांधण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध झाल्याशिवाय पुढे काही करता येत नव्हते. प्रत्येक बिऱ्हाडी किमान एक वासा द्यावा, चिरे- सिमेंट- वाळूसाठी पैसे द्यावेत म्हणून सरपंच अंकुश डामरे यांनी गावात सर्वांचे उंबरे झिजवले. एवढेच नाही तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कर्ज घेऊन ही रक्कम हायस्कूलची इमारत उभी करण्यासाठी वापरली. शैक्षणिक विकासासाठी अंकुश डामरे यांनी दिलेले योगदान असलदे गावालाच नाहीतर नांदगाव पंचक्रोशीला कधीही विसरता येणार नाही.

घरची शेती आणि बैलगाडीच्या माध्यमातून संसार करणाऱ्या अंकुश डामरे यांनी आपल्या सरपंच पदाच्या काळात गावाचाही संसार उत्तम प्रकारे ध्येयाने प्रेरित होऊन निष्टेने चालविला. तेव्हा मोटार गाड्यांची सोय नसायची. १९५२ च्या दरम्यान एसटी सुरू झाली तत्पूर्वी युनियनच्या दोन गाड्या देवगडला जायच्या आणि परत यायच्या. ह्या गाड्यांमध्ये लोक भुताटकी म्हणून बसायचे नाहीत. बैलाशिवाय-घोड्याशिवाय वाहन रस्त्यावरून धावू शकते ही कल्पनाच मुळी त्यांना पटेनाशी होती. कारण त्यांना आधुनिक यांत्रिकी प्रगतीची कल्पनाच नव्हती. असो! अंकुश डामरे हा इतिहास जगले. ते ह्या काळात उमेदीच्या वयात होते. आपल्या बैलगाडीतून अनेक रुग्णांना त्यांनी कणकवली, तरळे, फोंडा येथील डॉक्टरांकडे – वैद्यांकडे नेले. तेव्हा अनेकांना विषार व्हायचा, काही महिलांचे बाळंतपण जीवावर बेतणारे असायचे. अशांना बैलगाडीत घालून डॉक्टरकडे घेऊन जायचे किंवा डॉक्टरांना बैलगाडीतून घेऊन यायचे. हे काम अंकुश डामरे यांना अनेक वर्षे करावे लागले आणि त्यांनी ते प्रेमाने, आपुलकीने केले. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही गावातील असंख्य रुग्णांना त्यांनी त्यावेळेस डॉक्टरकडे-वैद्याकडे पोहोचविले आणि जीवदान दिले.

आयनल गावातील ग्रामस्थांना एसटीने प्रवास करायचा म्हटलं तर त्यांना चालत कोळोशीला देवगड-निपाणी रस्त्यावर यावं लागायचं. त्यामुळे तेथील ग्रामस्थांचे अतोनात हाल व्हायचे. आजारी माणसांना डॉक्टरकडे नेणं म्हणजे अग्निदिव्यच असायचं. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेत जाणं हेही अवघड होतं. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आयनल गावात जाणारा रस्ता पक्का करण्यासाठी आणि त्या रस्त्यावरून धावणारी एसटी म्हणजेच कणकवली आयनल एसटी सुरू करण्यासाठी आयनल गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवराम फाटक आणि अंकुश डामरे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आणि अगोदर रस्ता आणि नंतर एसटी सुरू करून घेतली. विकासाची कामं करत असताना सरपंचाची दृष्टी गावातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी असावी लागते; हे सरपंच अंकुश डामरे यांनी दाखवून दिले.

अंकुश डामरे यांना आम्ही आणि त्यांचे कुटुंबीय प्रेमाने-आदराने जीजी म्हणतो. जीजी आमच्यासाठी असणारा इतिहास जगले; तो इतिहास अनुभवाला आणि त्यांच्याकडून तो इतिहास ऐकताना अनेक जुन्या गोष्टी-प्रसंग डोळ्यासमोर उभ्या राहतात.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या असलदे गावातील तीन आणि आयनल मणेरवाडी व ओटववाडी ह्या पाच वाड्यांमध्ये समन्वय साधून एक संघटीत वातावरण निर्माण करण्यासाठी जीजींनी त्याकाळात केलेले प्रयत्न उल्लेखनिय आहेत.

१९९२ च्या दरम्यान कणकवली तालुक्यातील बारा-तेरा गावात कोकण विकास महामंडळामार्फत ताडतेल प्रकल्प राबविण्यात आला. त्यावेळी असलदे गावातही ताडतेलाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. ह्या प्रकल्पाच्या कुंपणात जाणाऱ्या गुरांना ठार मारण्यात आल्यावर आम्ही त्याची वृत्तपत्रातून बातमी प्रकाशित केली. त्यावेळी जीजींनी मला केलेले सहकार्य खूपच महत्वपूर्ण होते. कारण गावाच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना चव्हाट्यावर आणायचे; हे मी माझे कर्तव्य समजायचो आणि त्या माझ्या भूमिकेला त्यांनी पाठबळ दिले होते. त्यावेळी कोकण विकास महामंडळाने माझ्या बातमीवर अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला असता. पण जीजींनी आणि त्यावेळेचे पोलीस पाटील स्वर्गीय तुळशीराम तांबे यांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष पंचनाम्यासह इतर दस्तऐवज मला पुरविले.

मी माझ्या पत्रकारितेची सुरुवात गावातूनच म्हणजेच गावातील समस्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडून केली. तीस वर्षाच्या प्रवासामध्ये पत्रकारितेचा पाया अर्थात प्राथमिक तयारी ही गावाच्या समस्यांवर लिखाण करण्याच्या सवयीतून झाली आणि मला त्यावेळेला जीजींनी दिलेली साथ खूप मोलाची ठरली. गावामध्ये अनुभव संपन्न असलेली व्यक्ती जेव्हा आपल्या पाठीमागे समर्थपणे उभी राहते तेव्हा ते विचार पुढे नेणे एखाद्या तरुणाला शक्य होते.

जीजींनी नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. अन्यायाच्या विरोधात-भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी नेहमी संघर्षाची भूमिका घेतली. त्यांचा हा रोखठोकपणा मला नेहमीच आवडतो. २०१७ मध्ये झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत ह्या प्रथम सरपंचाने मला दिलेला आशीर्वाद कधीच विसरता येणार नाही. गावाच्या विकासाबाबत नव्वदाव्या वर्षीही त्यांचे रोखठोक विचार आमच्यासारख्यांना प्रेरणा देणारे असतात.

जीजींचा आज नव्वदावा वाढदिवस! त्यांना माझ्या, माझ्या कुटुंबियांच्या, पाक्षिक स्टार वृत्त परिवाराच्या आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटनच्या, असलदे विकास मंडळाच्या खूप खूप मन:पूर्वक शुभेच्छा! त्यांनी गावासाठी केलेल्या कार्याला माझ्या तीस वर्षाच्या व्रतस्थ पत्रकारितेचा मानाचा सलाम! त्यांना सदृढ आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो; ही साई चरणी प्रार्थना!

-नरेंद्र राजाराम हडकर
संपादक- पाक्षिक स्टार वृत्त

You cannot copy content of this page