रिफाईनरीच्या विरोधातील आंदोलनाची धार वाढवावी लागेल -भाई चव्हाण

रिफायनरीची गत एन्राँनसारखी होणार! २०३० नंतर ई-वाहने येणार…

कणकवली:- रत्नागिरी पेट्रोकेमिकल रिफायनरी होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. मात्र या रिफायनरीची गत समुद्रात वर काढलेल्या एन्रॉन कंपनीसारखीच होणार आहे. जगभरात प्रदुषण कमी करण्यासाठी ई-वाहने निर्मितीवर संशोधन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळेच या रिफायनरीमधून उत्पादित करण्यात येणाऱ्या शुद्ध प्रेट्रोलजन्य पदार्थांना भविष्यात मागणीच असणार नाही. त्यामुळे या प्रकल्पाला आता जमीनीतच गाडण्यासाठी कोकणवासियांनी कंबर कसून रिफायनरी विरोधातील आंदोलनाची धार वाढवायला हवी; असे आवाहन कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेश संंघटक, जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी पत्रकातून केले आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ७५० ई-बस काही राज्यांना देण्याचे घोषित केले आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपुर्वी २०३० पासूनचा जमाना हा ई-वाहनांचा असेल, असे जाहीर केले आहे. तर जगभर पेट्रोल आणि डिझेलच्या वापरामुळे होणाऱ्या प्रचंड प्रमाणातील प्रदुषणाला आळा घालण्यासाठी कमी वेळेत मुबलक प्रमाणात ई-वाहनांच्या बॅटऱ्या वीजेद्धारे चार्ज होण्यासाठी संशोधन आणि निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहिती देऊन श्री. चव्हाण यांनी या पार्श्वभूमीवर भविष्यात जगभरात आगामी कालखंडात रस्त्यावर फक्त ई-वाहनं फिरताना दिसणार आहेत. त्यामुळे जगभरातील खनिज कच्चे तेल उत्खनन करणाऱ्या देशांच्या पोटात भितीचे गोळे आले आहेत.

या सर्व घटनांचा अभ्यास केल्यास नाणार परिसरातील होऊ घातलेल्या या रिफायनरीच्या शुद्ध पेट्रोलजन्य उत्पादनाची क्षमता सहा कोटी मेट्रिक टन एवढी आहे. हा प्रकल्प प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत जगातील पेट्रोलजन्य पदार्थांची गरज कमालीची कमी होणार आहे. त्यामुळे मागणीच नसल्यामुळे हा प्रकल्प अल्पावधीतच बंद पडण्याची शक्यता सर्वांधिक आहे, अशी माहिती देऊन चव्हाण यांनी परप्रांतीय दलालांनी हा प्रकल्प जाहीर होताच करोडो रुपये जमीन खरेदीसाठी गुंतविले. त्यांना वाचवण्यासाठी राजकीय लांगेबांधे असलेली मंडळीच या प्रकल्पाचे समर्थन करीत आहेत. त्यांना कोकणच्या विकासाचे देणंघेणं नाही. उलट या प्रकल्पामुळे शेतकरी-बागायतदार देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात कोकणवासियांनी, संस्था-संघटनांनी एकत्र येऊन तीव्र लढा उभारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे; असे भाई चव्हाण यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *