सेवाग्राम आश्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट
बापूकुटीत केली प्रार्थना; गीताई मंदिर, एम गिरी, मगन संग्रहालय व पवनारला भेट
वर्धा:- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सेवाग्राम येथे बापू कुटी, बा कुटी, आणि चरखा विभागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बापू कुटीत प्रार्थनाही केली.
राज्यपाल आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सेवाग्राम, गीताई मंदिर, मगन संग्रहालय, एम गिरी आणि पवनार येथे विनोबा आश्रमाला भेट दिली. पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी शासकीय विश्राम गृह येथे सूत माळ, चरखा आणि पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले. येथे त्यांनी जिल्ह्याची कोरोना विषयक परिस्थिती बाबत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत चर्चा केली.
सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी.एन.प्रभू यांनी सूत माळ, हिंद स्वराज, इंडिया ऑफ माय ड्रीम्स, महात्मा गांधी यांची आत्मकथा ही पुस्तके भेट दिली.
खासदार रामदास तडस यांनी सुद्धा राज्यपालांचे सूत माळ देऊन स्वागत केले. राज्यपालांनी बापू कुटीची पाहणी केली. अध्यक्ष श्री.प्रभू यांनी आश्रमाची संपूर्ण माहिती दिली. तसेच त्यांनी येथील चरखा गृहात चालणारी सूत कताई, हातमाग, याबाबत माहिती जाणून घेतली आणि येथून 10 मीटर खादीचे कापडही खरेदी केले. गांधीजींच्या रसोडा मध्ये त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
गीताई मंदिर येथे भेट देऊन त्यांनी विनोबा भावे यांनी कोरलेल्या शिळेवरील गीताई च्या अध्यायाची पाहणी केली. तसेच जमनालाल बजाज यांचे संग्रहालय आणि विनोबा भावे यांनी भूदान चळवळी वेळी भारतभर केलेल्या भ्रमणाची येथे दर्शविण्यात आलेली माहिती जाणून घेतली. मगन संग्रहालयात चालत असलेले ग्रामद्योगाची आणि तेथील संग्रहालय याची माहिती घेतली. त्यांनी खादी विक्री केंद्राला भेट देत खादीचे मार्केटिंग कसे करता याबाबत विचारणा सुद्धा केली.
एम गिरी येथील बापू आणि बा यांच्या प्रतिमेस सूतमाळा अर्पण करून एमगिरीने विकसित केलेले ग्रामोपयोगी तंत्रज्ञान समजून घेतले. याचा प्रसार गावापर्यंत करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या
पवनार आश्रम येथे गौतम बजाज यांनी आश्रमाची माहिती आणि विनोबांचे तत्वज्ञानाबात त्यांना सांगितले. येथील भगिनींशी त्यांनी संवाद साधत राम मंदिराची आणि येथे उत्खननात सापडलेल्या मूर्तीची पाहणी केली. यावेळी आमदार पंकज भोयर,आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक बसवराज तेली, नगराध्यक्ष अतुल तराळे सरपंच सुजाता ताकसांडे, व्यंकट राव, विभा गुप्ता उपस्थित होत्या.