एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।।

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने –लेखांक अठरावा

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

जेथे भक्ती पूर्ण श्रद्धा व प्रेम। तेथे तेथे कर्ता मी त्रिविक्रम॥

त्रिविक्रमांचे शेवटचे आणि अद्भूत असे वचन!
जेव्हा आमच्या मनात पूर्ण भक्ती, पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण प्रेम निर्माण होईल; तेव्हा आमच्या आयुष्याचा कर्ता श्रीत्रिविक्रम होईल, असा वरवर पाहता अर्थ वाटतो. याचाच अर्थ श्रीत्रिविक्रमाने माझ्या आयुष्यात कर्ता व्हावे यासाठी माझी काय पात्रता असावी; हे सांगितले आहे का ? मला असे वाटते की, या वचनातून पात्रता निकष सांगितलेला नाही, तर पूर्तता निकष सांगितला आहे. म्हणजे काय?

कित्येक वेळा एखाद्या क्षणापुरते, एखाद्या तासापुरते, एखादा दिवस आम्हाला आमचे मन पूर्ण प्रेमाने, पूर्ण भक्तीने भरले आहे असे वाटते. ही अनुभूती एखादा अनुभव आल्यावर, एखादा अनुभव वाचून, एखादी कविता वाचून, बापूंचा फोटो पाहून – अशा कोणत्याही कारणाने किंवा विनाकारण अनुभवायला मिळते. त्यावेळी ओळखावे की त्या क्षणाचा, त्या तासाचा, त्या दिवसाचा कर्ता श्रीत्रिविक्रम आहे.

म्हणजेच, जिथे हे पूर्णत्व असेल तिथे मी कर्ता होईन असे नाही. तर जिथे हे पूर्णत्व आहे तिथे त्याचा कर्ता मीच आहे हे जाणा- असे त्रिविक्रम सांगत आहेत, असे मला वाटते.

आमच्या प्रेमात, श्रद्धेत पूर्णता असणे, परफेक्शन असणे हे आम्हाला शक्य आहे का?

परफेक्शन इज इम्पॉसिबल. हे लबाड बुद्धीवान लोकांनी सामान्य माणसांच्या न्यूनगंड देण्यासाठी केलेली कल्पना आहे. जो आदिमातेचा आहे तो आज आहे त्याच्यापेक्षा उद्या चांगला बनायला हवा, तो प्रत्येकजण प्रत्येक दिवशी अधिक प्रगत व्हायला पाहिजे अशाप्रकारे त्रिविक्रम प्रत्येकाच्या जीवनात मन-बुद्धी-प्राण म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि तरल देहात पाऊल टाकत असतो. (परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन -१८ जून २०१५ )

बिंदू स्वरूपात अदिती शून्यस्वरूपात गायत्री बनते. १ रूपात महिषासुरमर्दिनी बनते. त्यानंतर अनसूया बनते म्हणजे काय? (.,०,१) बिंदू शून्य व एक ही तिन्ही एकाच वेळेस असणारं स्वरूप म्हणजे अनसूया. ही अनसूया एकमात्र अशी आहे की जी बिंदूला सरकवू शकते. कुठलीही आकृती अपूर्णच आहे. पण अनसूयारूपाने, जो निर्गुण निराकार त्यालाच आपला पुत्र म्हणून जन्माला घातला. म्हणजे अपूर्णाला .०१ ला पूर्णांक १.० केला. दत्तगुरू = संपूर्ण पूर्णत्व. जो माणसाला कधी दिसूच शकणार नाही असा दत्तगुरू दाखवून दिला. हा खेळ दाखवून देणारी ती एकच. (परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन- २२ ऑगस्ट २०१३)

याचा अर्थ आम्ही पूर्ण झाल्यानंतर श्रीत्रिविक्रम कर्ता होणार, असे नाही. आम्ही जसे आहोत तसे त्यांना स्वीकारार्ह आहोत. फक्त आमचा प्रवास त्यांना हवा त्या दिशेने होत आहे ना; एवढेच महत्त्वाचे आहे. त्या प्रवासात आमच्या रथाचा सारथीही तेच बनतात. पूर्ण भक्ती वा प्रेम नसतानाही श्रीत्रिविक्रम आमच्या आयुष्यात कर्ता असल्याचा अनुभव आम्हाला देत असतात. तो पाहता यायला हवा.

एकाच वेळी मी ही कर्ता आणि तो ही कर्ता असे होऊ शकत नाही. मग मी कर्ता व्हायचे नाही म्हणजे कर्म करायचे सोडायचे का? या अवघड प्रश्नाचे उत्तर सोपे करून भगवंतांनी गीतेत सांगितले आहे ,

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌। (३/५)
कोणताही माणूस कुठल्याही वेळी क्षणमात्रही कर्म केल्यावाचून राहू शकत नाही. 

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ (३/३०)

( म्हणून हे अर्जुना ) तुझ्या सर्व प्रकारच्या कर्तव्य कर्मांना माझ्यात अर्पण करून पूर्ण आत्मज्ञानाने युक्त होऊन आशा, ममता आणि संताप यांचा पूर्णपणे त्याग करून युद्ध कर.

“मी भगवंताने नेमून दिलेले कर्म करीत आहे ” या कर्तव्य भावनेने सर्व कर्मे करायची आणि त्या भगवंताच्याच चरणी अर्पण करायची. मग त्या कर्मांचा कर्ता तोच आणि कर्मफलांचा मालकही तोच.

हा त्रिविक्रम माझ्या आयुष्यात कर्ता कशासाठी हवा ? असा प्रश्न पडू शकतो. गोंदवलेकर महाराजांनी त्याचेही उत्तर सुंदर प्रकारे दिले आहे ,

‘मी कर्ता नव्हे’ जाणून करी कर्म। त्याला बाधेना कलीचा मार्ग॥
दुष्ट अभिमानाला न पडावे बळी। त्याचा मालक होईल कलि॥

कलीला आणि वृत्रासुराला माझ्या आयुष्यापासून दूर ठेवायचे असेल तर हा त्रिविक्रम कर्ता हवा. त्याचे सर्वकाही बेस्टेस्ट असते. त्यामुळे माझ्याकडून होणारे कर्मही उत्तमच राहील आणि त्याचे फल म्हणून शांती आणि समाधानच मिळेल.

“मी कर्ता नाही” हा कर्तेपणाचा त्याग मला शक्य आहे का? तो इतका सोपा आहे का? या त्यागाच्या अहंकारापासून माझे रक्षण कसे होईल? हे सगळे कसे व्हावे? याचा सोपा उपाय सद्गुरू अनिरुद्धांच्या लाडक्या ओवीमध्ये आला आहे.

एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।। श्रीसाईसच्चरित १९/७४।।

माझ्या आयुष्यात कर्ता आणि हर्ता गुरु आहे हा एकमेव विश्वास असायला हवा. असा अर्थ दिसतो. पण कशाचा कर्ता आणि कशाचा हर्ता हे येथे लिहिलेले नाही. सुखाचा कर्ता आणि दुःखाचा हर्ता असे श्रीगणेशाच्या सुखकर्ता दुःखहर्ता या वर्णनावरून आम्हाला वाटते. या ओवीचा अर्थ पाहताना ‘ कर्ता आणि हर्ता ‘ असा द्वंद्व समास आम्ही लक्षात घेतो. पण त्याऐवजी षष्ठी तत्पुरुष समास घेतला तर ‘ कर्ता हर्ता ‘ या शब्दाचा अर्थ ” कर्त्याचा हर्ता ” असा होईल. म्हणजेच सद्गुरुचरणी अनन्य विश्वास ठेवणाऱ्या भक्ताच्या ‘ मी कर्ता ‘ या भावनेचा हर्ता सद्गुरु होतो. मी यावाचून अन्य काही करायचेच नाही आहे.

श्रीसाईसच्चरित हा अपौरुषेय ग्रंथ आहे. साईनाथांनी स्वतः हेमाडपंतांकडून तो लिहवून घेतला आहे. बापू सांगतात त्याप्रमाणे हे साईनाथांचे चरित्र आहे, तसेच भक्तांचे आचरितही आहे. यातील भक्तांकडून आपण काहीतरी शिकायचे आहे. ह्या भक्तांनी साईनाथांचे गुणसंकीर्तन ऐकून, दर्शनाने किंवा अनुभव घेऊन साईचरणी विश्वास ठेवला. त्यांच्या आयुष्याचा कर्ता श्रीसाईनाथ झाला. मग त्यांची भक्ती, श्रद्धा पूर्णत्वाला पोचली. आणि त्यांच्या कथा या अपौरूषेय ग्रंथात आल्या.

एकदा का हा त्रिविक्रम कर्ता झाला; की माझ्या जीवनात पूर्ण श्रद्धा, पूर्ण भक्ती, पूर्ण प्रेम प्रस्थापित होईल. या पूर्णत्वाचा दिव्यस्पर्श प्रत्येक श्रध्दावानाला पूर्णकाळ लाभू दे हीच त्या पूर्णपुरुष श्रीत्रिविक्रमांच्या चरणी प्रार्थना….

त्रिविक्रमांच्या अठरा वचनांविषयी बापूकृपेने

जे समजले ते
जे लिहीले गेले ते
जे लिहीले गेले नाही ते
जे समजले नाही ते
सगळे काही

आजच्या प्रपत्तीदिनी त्यांच्याच चरणी अर्पण!

हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

– डाॅ आनंदसिंह बर्वे

स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सतरावा वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

You cannot copy content of this page