सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना, विरार आयोजित संगीत भजन स्पर्धा संपन्न
मुंबई उपनगरातील २० भजन मंडळांचा सहभाग!
सुश्राव्य संगीत भजनाचा भजन रसिकांनी घेतला आनंद!
डलबारी भजनापेक्षा संगीत भजन स्पर्धेत दर्जेदार बुवांची भजन श्रवण करण्याची संधी!
विरारच्या सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटनेने यशस्वीपणे घेतलेल्या संगीत भजन स्पर्धेचे रसिक श्रोत्यांकडून कौतुक!
विरार (प्रतिनिधी):- सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना, विरार आयोजित नुकत्याच झालेल्या संगीत भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्रीदेव लिंगरवळनाथ प्रासादिक भजन मंडळ (दिवा) यांनी, द्वितीय पारितोषिक श्री ओंकारेश्वर प्रासादिक भजन मंडळ (बोरिवली) यांनी तर तृतीय पारितोषिक श्री रखुमाई संगीत भजन संस्था (वांद्रे) यांनी मिळविले. या स्पर्धेत मुंबई उपनगरातील २० भजन मंडळांनी सहभाग घेतला. सुश्राव्य संगीत भजनाचा हजारो भजन रसिकांनी लाभ घेतला. डलबारी भजनापेक्षा संगीत भजन स्पर्धेत दर्जेदार बुवांची भजन श्रवण करण्याची संधी त्यानिमित्ताने मिळाली. विरारच्या सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटनेने यशस्वीपणे घेतलेल्या संगीत भजन स्पर्धेचे रसिक श्रोत्यांकडून कौतुक करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघटना, विरार आयोजित संगीत भजन स्पर्धा – २०२२ रविवार दि. १७ एप्रिल २०२२ रोजी श्रीमंगलमूर्ती मंदिर, विरार (प.) येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबई उपनगरातील २० भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण भजन गायक श्री. ज्ञानेश्वर पाटील व तबला वादक श्री. रूपक वझे यांनी केले. सकाळी ९ ते रात्री ९ अशी संपूर्ण दिवस ही स्पर्धा सुरु होती व असंख्य भजनप्रेमी भक्तिरसात न्हाऊन गेले. स्पर्धाप्रसंगी उद्योजक व समाजसेवक श्री. किरण ठाकूर, उद्योजक-समाजसेवक व क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन ह्या संकेतस्थळाचे संचालक श्री. सुरेश डामरे, श्री साई चैतन्यधाम संस्थेचे श्री. शांताराम वाळींजकर, सुप्रसिद्ध संवादिनी वादक श्री. मिलिंद जोशी, स्पर्धेचे सर्व प्रायोजक इ. मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे प्रथम पारितोषिक श्रीदेव लिंगरवळनाथ प्रासादिक भजन मंडळ (दिवा) यांनी, द्वितीय पारितोषिक श्री ओंकारेश्वर प्रासादिक भजन मंडळ (बोरिवली) यांनी तर तृतीय पारितोषिक श्री रखुमाई संगीत भजन संस्था (वांद्रे) यांनी मिळविले. तसेच सौ. सुजाता पाटणकर (आई एकविरा महिला प्रा. भजन मंडळ, डोंबिवली) यांनी उत्कृष्ट गायक, श्री. विकास बेद्रुक (श्री. नागेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नालासोपारा) यांनी उत्कृष्ट वादक व कु. ऋषिकेश पांचाळ (ॐ दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ, सांताक्रुझ) यांनी उत्कृष्ट तालरक्षक हा सन्मान मिळविला.
कार्यक्रमाची सांगता श्री ओमप्रकाश नेरुरकर यांच्या अभंग गायनाने व श्री ज्ञानेश्वर पाटील यांच्या भैरवी गायनाने करण्यात आली. दरवर्षी ही संगीत भजन स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याचे संस्थेच्या आयोजक समितीने जाहीर केले.