जेष्ठ अभिनेत्री श्रद्धावान आशालताविरा वाबगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

शंभरहून अधिक चित्रपटात काम करून आपला ठसा उमटविणाऱ्या, मराठी चित्रपट सृष्टीत ‘आशालता’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुणी ज्येष्ठ अभिनेत्री आशालताविरा वाबगावकर यांचे निधन झाले आणि त्यांच्या चाहत्यांना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला खूप मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागलं. अतिशय दुःखद घटना! श्रद्धावान आशालताविरा वाबगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

त्यांचे सातारा येथील खासगी रुग्णालयात वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साताऱ्याला आल्या होत्या. याचठिकाणी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

सातारा जिल्ह्यात सध्या `आई माझी काळूबाई’ मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. एका मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या अलका कुबल यांच्या मालिकेत आशालता यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेचे चित्रीकरण जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाई या परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. या मालिकेतील सेटवरील सुमारे २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते बाधित आढळल्यानंतर मालिकेचे चित्रीकरण थांबविण्यात आले. मात्र, आशालता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्या मुळच्या गोव्याच्या! तरीही त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी मराठी आणि हिंदी अशा सुमारे १०० हून अधिक चित्रपटांमधून काम केले.

‘गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, चिन्ना आणि महानंदा’ यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.
संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली.
तर बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.
मराठी चित्रपट सृष्टीत ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नव-याला, वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.
संगीतावर आधारित ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.
पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवताना, आशालताबाईंना गळ्यातून उतरविण्यापूर्वी प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्यामागील भाव टिपण्याची सवय लागली होती.
राज्य नाट्यस्पर्धेत संशयकल्लोळ नाटकातील नायिका रेवतीची प्रमुख भूमिका साकारणा-या ज्येष्ठ अभिनेत्री गायिकेला गोपीनाथ सावकार यांच्यासारख्या सिद्धहस्त दिग्दर्शकाने अभिनयासाठी निरीक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपटअभिनेत्री म्हणून त्यांचे काम निरंतर स्मरणात राहील. त्यांचा जन्म मुंबई येथे ३१मे रोजी झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईत झाले. त्या मानसशास्त्रात एम.ए. होत्या. त्यांनी काम केलेला पहिला चित्रपट ‘अपने पराये’ (हिंदी) होय. या चित्रपटातील कामाबद्दल आशालतांना बेंगाल क्रिटिक्सचे पारितोषिक मिळाले. त्यांचे पहिले नाटक `रायगडाला जेव्हा जाग येते!’ हे होय.

त्यांच्या भूमिका असलेली नाटके अशी:- आश्चर्य नंबर १० (१९७१), गरुड झेप (१९७३), गुड बाय डॉक्टर (१९७६), गुंतता हृदय हे (१९७४), गोष्ट जन्मांतरीची (१९७८), छिन्न (१९७९), देखणी बायको दुसऱ्याची (१९९२), मत्स्यगंधा (१९६४), रायगडाला जेव्हा जाग येते (१९६२), विदूषक (१९७३)
त्यांच्या भूमिका असलेले चित्रपट:- आत्मविश्वास (१९८९), तिन्ही सांजा(२००९), पकडापकडी (२०११), मणी मंगळसूत्र (२०१०), लेक लाडकी (२०१०), वन रूम किचन (२०११)

त्यांनी गायलेली नाट्यगीते (नाटकाचे नाव):- अर्थशून्य भासे मज हा कलह प्रीतीचा (मत्स्यगंधा), गर्द सभोतीं रानपाखरे, तू तर चाफेकळी (मत्स्यगंधा), जन्म दिला मज त्यांनी (मत्स्यगंधा), तव भास अंतरा झाला (मत्स्यगंधा), स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या (विदूषक)

प्रेमळ स्वभावाच्या अष्टपैलू ज्येष्ठ कलावंत आशालता वाबगावंकर ताईंच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्या परमात्म्या चरणी विलीन झाल्या. आदिमाता महिषासुरमर्दिनी आशालता ताईंच्या आत्म्यास सुशांती देवो!

You cannot copy content of this page