वाहनधारकांनो नवीन नियम समजून घ्या!
१ ऑक्टोबरपासून गाडीचे आरसी बुक आणि ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवण्याची गरज नाही
नवीदिल्ली:- १ ऑक्टोबरपासून अनेक नियम बदलणार असून यापुढे गाडीचे आरसी बुक आणि ड्रायव्हींग लायसन्स सोबत ठेवण्याची भासणार नाही; कारण त्याचे विवरण शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणीकृत होणार आहे आणि ते वेळोवेळी अद्ययावत केले जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चलन यासह वाहनांशी संबंधित सर्व कागदपत्रांची माहिती १ ऑक्टोबर २०२० रोजी माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे ठेवली जाईल असे सरकारने म्हटले आहे.
१) वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करताना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वैध आढळलेल्या वाहनांच्या कागदपत्रांच्या ऐवजी भौतिक कागदपत्रांची मागणी केली जाणार नाही.
२) परवानाधारक प्राधिकरणाने रद्द केलेला वाहन चालविण्याचा परवान्याचा तपशील पोर्टलमध्ये नोंदविला जाईल आणि वेळोवेळी तो अद्ययावत केला जाईल.
३) नवीन नियमांनुसार हातात असलेला मोबाईल फोन ड्राईव्हिंग करताना फक्त मार्गाच्या नेव्हिगेशनसाठी वापरला जाईल आणि त्यामुळे ड्रायव्हिंग करताना वाहनचालक विचलित होणार नाहीत.
४) वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास १ हजार ते ५ हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
५) ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी अधिक कागदपत्रांची गरज भासणार नाही. केंद्र सरकारने नियम सुलभ केले आहेत. आता आधार कार्डचा वापर ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी, परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी, वाहन नोंदणी करण्यासाठी आणि त्याशी संबंधित कागदपत्रांमध्ये पत्ता बदलण्यासाठी केला जाईल.