राज्य कामगार विमा योजना, मुंबई येथील कार्यालयातील निवृत्त सहकाऱ्यांचे अनोखे स्नेहसंमेलमन…

जुन्या मैत्रीचं नातं फुलविणारं आणि चिरंतर स्मरणात राहणारं स्नेहसंमेलमन संपन्न!

राज्य कामगार विमा योजना, मुंबई येथील कार्यालयातील आम्ही निवृत्त सहकारी; आमचा एक ग्रुप आहे, वरचेवर भेटणारा! भेटण्यासाठी आम्हाला काहीही निमित्त चालतं. एखादा मिसळ महोत्सवही आमच्या भेटीचं कारण ठरतं. भेटल्यावर फक्त गप्पांची मैफिल जमायची, ऑफिसमधील आठवणी निघायच्या, गंमतीजंमती-किस्से व्हायचे, यातून अनेक सहकाऱ्यांची आठवण यायची. आम्ही एकमेकांची चौकशी करायचो. काहींना भेटावेसे वाटायचे. यातूनच `सर्व सहकाऱ्यांच्या भेटीचं एक स्नेहसंमेलन व्हावे’ असे ठरले. आमचे आणखी एक सहकारी मित्र डॉ. राजेश स्वामी यांना ही कल्पना सांगितली व त्यांनी त्या संकल्पनेस लगेच होकार दिला; तसेच अनेक सहकार्‍यांशी संपर्क साधण्याची जबाबदारीही घेतली व आम्ही सर्व तयारीला लागलो.

दिनांक २६ फेब्रुवारी २०२० रोजी वांद्र्याच्या एमआयजी क्लब येथे हे स्नेहसंमेलन घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी मोहन सावंत यांनी पुढाकार घेऊन हा हॉल प्रथम बुक केला. लगेच डॉ. राजेश स्वामी, विश्वनाथ सावंत, किशोर पांडे, रवी चव्हाण, संतोष देसाई, मोहन सावंत व मी आमच्या संपर्कात असलेल्या सहकाऱ्यांशी फोन व व्हाट्सअ‍ॅपवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यास भरभरून प्रतिसाद मिळत गेला व सहभागी सदस्य संख्या भरपूर वाढू लागली. यामुळे एक वेगळीच समस्या आमच्यापुढे उद्भवली. हॉलची क्षमता १०० आहे व इच्छुक संख्या १४० पर्यंत पोहचली. शेवटी आम्हास चाळीसएक सहकाऱ्यांची नाराजी पत्करावी लागली. त्यास आमचा नाइलाज होता. या सगळ्यांना सहभागी करून घेता आले नाही; याची आम्हास मनापासून खंत आहे.

आमचे अनेक सहकारी रिटायर होऊन वीस पंचवीस वर्षाहून जास्त काळ लोटला. या सर्वांना भेटण्याची एक वेगळीच ओढ अनेक वर्षांपासून होती. ज्या सहकाऱ्यांसह आम्ही तीस-पस्तीस वर्षे एकत्र घालवली ते आमचे सहकारी काही आम्हास गुरुस्थानी असलेले, आमच्या सुखदुःखाचे सोबती, आमचे आदर्श यांच्या भेटीची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर तो दिवस उजाडला.

ठरलेल्या दिवशी-ठरलेल्या वेळी एकेक सहकाऱ्यांचे आगमन होऊ लागले. माधुरी परेरा, शुभदा राऊत, अर्पणा पवार यांनी पुष्प देऊन प्रत्येकाचे स्वागत केले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता व आनंद होता. बघता बघता केवळ आणि केवळ भेटीचा उत्सव सुरू झाला.

स्नेहसंमेलनाचे कोणीही प्रमुख पाहुणे वा अध्यक्ष नव्हते. भाषणबाजीही नव्हती. विश्वनाथ सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले व लगेच दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आमच्या सर्व दिवंगत सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. राजेश स्वामी यांनी स्नेहसंमेलन संकल्पनेविषयी थोडक्यात प्रास्ताविक केले. नंतर जी. बी. जुवळे (वय वर्षे ८५), डी. एच. चौहान (वय वर्षे ८३), डॉ. एस. एम. हुलसुरे (वय वर्षे ८० ), सीमा कर्वे (वय वर्षे ७५) व त्याच दिवशी वाढदिवस असणारे डॉ. हेमंत भारती; ह्या पाच सहकाऱ्यांच्या हस्ते केक कापून ७५ वर्षांच्या पुढील उपस्थित सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

ज्या मुख्य उद्देशाने हे संमेलन आयोजित केले होते, तो भेटीचा सोहळा सुरू झाला. एकमेकांची गळाभेट, विचारपूस, गप्पागोष्टी, हास्यविनोद याची मैफल रंगली. सर्वजण जुन्या आठवणीत रमले, हळवे झाले. आमचे काही निवृत्त डायरेक्टर काही वैद्यकीय अधीक्षक अनेक डॉक्टर वर्ग-१ च्या अधिकाऱ्यांपासून वर्ग-४ पर्यंतचे १०३ सहकारी ह्या आनंद सोहळ्यात सामील झाले होते. त्या दिवशीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वजण आपले पद, वर्ग, आपले वय विसरून गेले आणि एकच वर्ग होता. आम्ही सर्व निवृत्त सहकारी म्हणून प्रत्येकजण आनंद घेत होतो. सगळा रंग एकची झाला होता.

कुछ लम्हे गुजारे है
मैने भी अपने खास दोस्तों संग
लोग उन्हे वक्त कहते है
और हम उन्हे जिंदगी कहते है

असा मस्त माहोल होता. गप्पागोष्टीत सगळे इतके तल्लीन झाले होते की जेवणाची वेळ झाल्याचेही कळले नाही. सगळ्यांनी स्नेहभोजनाचाही मस्त आनंद घेतला. स्नेहभोजन झाल्याझाल्या किशोर पांडे व मोहन सावंत यांनी एक मिश्कील व गंमतीदार गप्पाष्टकांचा विनोदी कार्यक्रम पेश केला. सर्वांनी त्यास भरभरून दाद दिली. मोहन सावंत यांनी आमच्या काही सहकाऱ्यांच्या आवाजात त्यांचेच काही किस्से सांगून खळखळून हसविले.

७३ वर्षाच्या शालिनी पाटील यांनी ती फुलराणी या नाटकातील `तुला शिकवीन चांगला धडा’ ह्या प्रसिद्ध स्वगताचा प्रवेश सभिनय सादर केला. ज्यांना आनंदी जगणे जमते ती माणसे कायम तरुण आणि निरोगी राहतात; हे शालिनी पाटील यांच्या अदाकारीमधून दिसले.

सीमा कर्वे यांनी स्वतःची छान कविता सादर केली. त्यासही सगळ्यांनी दाद दिली.

मी राज्य कामगार विमायोजनेवर एक प्रश्नमंजुषा घेतली व सर्वांना जुन्या आठवणीत नेण्याचा प्रयत्न केला.

डॉ. हुलसुरे, डॉ. भारती, डॉ. माया वानखेडे यांनी अशा संमेलनाची गरज व उपयुक्तता यावर मनोगत व्यक्त केले.

आम्हा सर्वांची रंगलेली मैफिल, त्यात सर्वांचा उत्साह, हास्यविनोद पाहता हे लोक मनाने कधीच वृद्धत्वाकडे झुकणार नाहीत. असा एकंदरीत माहोल होता. डॉ. उत्तम कुरे हे पुण्याहून आले. डॉ. दीपक जाडकर हे हॉस्पिटलमध्ये भरती होते. त्यांना डिस्चार्ज मिळून एखादा दिवस झाला होता. रवी पाटील त्याच दिवशी रात्री रत्नागिरीला जाणार होते. तरीही हे सर्व सहकारी सर्वांच्या भेटीच्या ओढीने संमेलनाचा आवर्जून उपस्थित राहिले.

आम्हा निवृत्त सहकार्‍यांच्या प्रेमापोटी व सर्वांना एकत्र भेटण्यासाठी व आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी अद्याप कार्यरत असणारी सहकारी प्राजक्ता पाटकर या स्नेहसंमेलनात सहभागी झाल्या. तसेच त्यांनी जुवळेसह काही सहकाऱ्यांना संमेलनास आणले व नेण्याची जबाबदारी घेतली.

ज्यांना मनापासून भेटावं, बघावं, व ज्यांच्याशी बोलावेसे वाटत होते ते सर्व उपस्थित राहिले. याचा आम्हास खूप आनंद झाला. डॉ. के. एन. जोशी व डॉ. एम. जी. सावंत यांना अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे त्यांना स्नेहसंमेलनास उपस्थित राहता आले नाही. त्यांनी स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या.

हा आनंद सोहळा सुरू असताना संध्याकाळ कधी झाली हे आम्हाला कळलेच नाही. सर्वजण ग्रुप फोटो काढण्यास गुंग झाले. तसेच या स्नेहसंमेलनाची आठवण म्हणून प्रत्येकास एक भेटवस्तू देण्यात आली. रवी चव्हाण व संतोष देसाई यांनी ही सुंदर भेट वस्तू उत्तम प्रकारे तयार करून घेतली.

प्रत्येक वयाची एक गरज असते; सर्वांना वेळेत घरी पोहोचले पाहिजे; तसेच हॉलही वेळेत सोडणे आवश्यक होते; हे लक्षात घेता इच्छा नसताना आम्हाला आटोपते घ्यावे लागले. `पुन्हा लवकरच भेटूया’ `नक्की भेटूया’ असं आश्वासन देत-घेत सगळे एकमेकांना निरोप देऊ लागले.

आम्ही सारे सहकारी, मित्र-मैत्रिणी निवृत्त झाल्यावर बर्‍याच वर्षात एकत्र आलो नव्हतो. सगळ्यांना एकत्र आणण्याची कल्पना मनात आली आणि ती सत्यात उतरली. याचा आम्हाला विशेष आनंद झाला. स्नेहसंमेलन उत्तम प्रकारे आयोजित करून सर्वांना भेटण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांनी आमचे आभार मानले. पण या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे हे स्नेहसंमेलन खूप ग्रँड झाले. याचे सारे श्रेय आमच्या या सहकार्यांचेच आहे. त्यामुळे या सहकाऱ्यांचे मनापासून आभार!

हे स्नेहसंमेलन यशस्वी करताना डॉ. आर. व्ही. देशपांडे, डॉ. श्रीकृष्ण पवार, ए. पी. मालेकर, एम. ए. पांगारकर आमचे मित्र विजय गांगुर्डे, अण्णा हडकर, रवी पाटील, प्रमोद मिठबांवकर, सुभाष घाटे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. विश्वनाथ सावंत यांनी या स्नेहसंमेलनात उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केले. आमची उत्तम टीम, उत्तम टीमवर्क शिवाय हा इतका उत्तम कार्यक्रम झाला नसता. या स्नेहसंमेलनाच्या सगळ्या सुंदर आठवणी घेऊन आम्ही घरी निघालो, ते पुढच्यावेळी नक्की भेटायचे या निर्धाराने…

-मायकेल परेरा

You cannot copy content of this page