समाजक्रांतीचा अग्रदूत – महात्मा बसवेश्वर

करू नको चोरी, करू नको हत्या;
करू नको क्रोध, बोलू नको मिथ्या;
करू नको तिरस्कार, मारू नको बढाई;
करू नको मत्सर, हीच अंतरंग – बहिरंग शुद्धी;
हीच आमच्या कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रीती.
– महात्मा बसवेश्वर

आजपासून जवळ जवळ नऊशे वर्षांपूर्वी म्हणजेच बाराव्या शतकात एकमेकांबद्दलचा द्वेष, मत्सर, लढाया, अंधश्रद्धा, विषमता इत्यादी गोष्टींनी समाज ग्रासलेला होता. काम करणारे काम करायचे आणि त्यांच्या जीवावर मोठे होणारे मोठेच होत होते. त्यांच्या आवाजाला न्याय नव्हता की कुणी आवाज उठवत नव्हता. परिणामी समाज पूर्णपणे गलितगात्र झाला होता. तत्कालीन समाज हा एकवटून खऱ्या मानव धर्माला विसरत चालला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक परिवर्तन करण्यासाठीच इ. स. ११०५ मध्ये कर्नाटकातील बसवन बागेवाडी येथे मादिराज व मादलंबिका यांच्या पोटी महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला.

बसवेश्वर हे लहानपणापासूनच अत्यंत चिकित्सक, वैचारिक बैठक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे होते. कोणत्याही गोष्टीचा विचार करून ते निर्णय घेत. एवढेच नव्हे तर परंपरेने चालत आले आहे ते आपण स्वीकारले पाहिजे; याला त्यांचा प्रचंड विरोध होता. ते सतत म्हणत की, यामागील भूमिका प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे जेणेकरून विषयांचे मूळ समजेल. त्यांच्या लहानपणी त्यांच्या घरात बहूदेवोपासना चालू असायची. बसवेश्वर यांनी या गोष्टीला विरोध करत त्यातील फोलपणा सर्वांच्या लक्षात आणून देत एकाच देवाची पूजा करण्यास भाग पाडले. येथूनच त्यांच्यातील वैचारिक दृष्टीकोन जागृत होत तो त्यांच्या आचारशील वर्तुणुकीतुन जगासमोर आला.

निसर्गामध्ये सर्वांना समान अधिकार आहेत. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा, मांडण्याचा, म्हणण्याचा, प्रकटीकरणाचा, लढण्याचा इत्यादी गोष्टी मध्ये समान व बरोबरीचा अधिकार असल्याचे ते नेहमी मानत; नुसतेच मानत नव्हते तर त्यांनी आपल्या लहानपणीपासूनच विविध ठिकाणी आपली भूमिका मांडली. समाजात चालणाऱ्या अनिष्ट प्रथा, परंपरा यावर ते सतत प्रश्न उपस्थित करत आपल्या मनातील भावना व्यक्त करत असत. प्राण्याचा बळी दिला तर देव पावतो काय? यज्ञात दूध तूप घातल्यास देव प्राप्त होतो काय वा भरभराट होते काय? माणसा – माणसा मध्ये भेदभाव का केला जातो? सर्वजण सारखेच असताना एकमेकांबद्दल तिरस्कार का केला जातो? प्रत्येकास जगण्याचा अधिकार सारख्याच पातळीवर का मिळत नाही? असे अनेक प्रश्न ते उपस्थित करत आपल्या कुटुंबियांना या भ्रामक कल्पनापासून दूर नेत होते. गरीब – श्रीमंत यांच्यातील भेदभाव, सवर्ण – दलित, स्पृश्य – अस्पृश्य, भेदाभेद, वर्णभेद, जातीभेदाचे अंतर, अस्पृश्य व कनिष्ठ वर्गातील मुलांबरोबर खेळण्यावर बंदी, देवधर्माच्या नावे चालत आलेले कर्मकांड, नवससायास, अनावश्यक देहदंडन, संन्यासवादाचे स्तोम, व्रत वैकल्ये, सोवळे – ओवळे, व नानाविध देवीदेवतांची पूजन इत्यादी सर्व अनिष्ठ प्रथा – परंपरा पाहून महात्मा बसवेश्वर यांचे मन खिन्न झाले. यावर ते आपली मते मांडत राहिले. आपले विचार प्रकट करत राहिले. तरीही त्यांना समर्पक उत्तरे मिळाली नसल्यामुळे त्यांनी आपला नवीन मार्ग निवडला, मानव उद्धाराचा, मानवजातीच्या भल्याचा, समतेचा, बंधुतेचा, स्वातंत्र्याचा. हा नवीन मार्ग निवडणे सहजासहजी झाले नाही तर यासाठी त्यांना आपले पहिले बंड हे आपल्या आई वडिलांच्या व समाजाच्या विरोधात करावे लागले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

जेव्हा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत वा त्यांचे योग्य ते समाधान झाले नाही. तेव्हा पुढील शिक्षणासाठी ते आपल्या मोठ्या भगिणीसोबत कुडलसंगम येथे आले. त्याठिकाणी त्यांनी जवळपास बारा वर्षे वेद, श्रुती, आगमे, पुराणे, उपनिषदे, यांच्यासह विविध पंथाच्या, परंपराच्या विचारांचा त्यांनी अभ्यास केला. या अभ्यासामुळे व विचारचिंतनामुळे त्यांची वैचारिक उंची खूपच वाढली व ते स्वतंत्र विचार करू लागले. आपल्या मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाजासाठी, समाजपरिवर्तनासाठी, समाजसुधारणेसाठी झाला पाहिजे यावर ते ठाम राहिले व त्यातूनच जगाला मार्गदर्शन करणारी नवीन पद्धत त्यांनी निर्माण केली. ते पुढे मंगळवेढ्याला आले. तेथे त्यांचा विवाह आपले मामा बलदेव यांची कन्या गंगाबिका यांच्याशी झाला. संन्याशी राहून खूप मोठे तत्वज्ञान देण्यापेक्षा त्यांनी संसारात राहून जगाला आत्मज्ञान देण्याचे कार्य केले जे अलौकिक होते. स्पृश्य – अस्पृश्य, लहान – थोर, गरीब – श्रीमंत यातील विषमतेची, भेदाभेदाची दरी दूर करतानाच समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातीभेद, बहुदेवोपासना या प्रथा परंपरा बाबत सतत समाजात जाऊन ते प्रबोधन करू लागले. परिणामी त्यांना मानणारा व त्यांच्या विचाराशी प्रामाणिक राहणारा एक खुप मोठा वर्ग राज्यात तयार झाला आणि त्यातूनच जगातील पहिल्या लोकशाहीचे केंद्र म्हणून त्यांनी अनुभव मंटप ही संकल्पना अस्तित्वात आणली. ज्याठिकाणी ज्ञान हे अनुभवाच्या कसोटीवर उतरायचे आणि ते सर्वमान्य व्हायचे. याच अनुभव मंटपाच्या द्वारे लोकनिर्णय व्हायचे. थोडक्यात काय तर अनुभव मंटप म्हणजे आजची संसद. अनुभव मंटप हे स्वतंत्र, समता, बंधुता, सामाजिक न्याय प्रस्थापित करणारे समतापीठ होते. त्यावेळेस या अनुभव मंटपाच्या माध्यमातून बसवेश्वरांनी शरणाचे संघटन केले. तेथे हे सर्व शरण आपला नित्य कायक करून एकत्र जमत असत आणि चर्चा व संवाद यांच्या माध्यमातून वचने लिहिली जात होती. त्या वचनाचा आधार घेत महात्मा बसवेश्वर यांच्या मार्गदशनखाली समाजप्रबोधनाचे कार्य जोरात सुरू झाले. यामुळे समाजात माणसे पेरली, उगवली, घडली आणि माणसे उभी राहीली. शरणांच्या चळवळीला दिशा व मार्ग दाखविण्याचे कार्य यामुळे सुकर झाले.

आज आपण म्हणतो की, स्त्रियांना राज्यकारभारात व इतर ठिकाणी समान संधी मिळाली पाहिजे. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात अनुभव मंटपाच्या माध्यमातून स्त्रियांना शिक्षण, सामाजिक कार्य, व इतर ठिकाणी प्रवेश मिळवून दिला. स्त्री ही मोह – माया नव्हे तर ती सहचारिणी व साथीदार आहे. आई देव आहेच यात वाद असायचं कारण नाही़; पण स्त्री म्हणून बायको, बहीण, मुलगी वा नात्याबाहेरील स्त्रीमध्ये देखील देवत्व आहे ही शिकवण अनुभव मंटपाने जगाला दिली. एकट्या आईला देवत्व देताना इतर स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याच्या प्रवृत्तीवर महात्मा बसवेश्वर यांनी हल्ला चढवला. परिणामी स्त्री गौरव हा शरण संप्रदायाचा मानबिंदू आहे. जन्मदात्री आईच्या रूपातील स्त्री ही शूद्र वा वाईट किंवा कमी असूच शकत नाही. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यातूनच त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत आणि विचारांच्या माध्यमातून देवदासी पद्धत बंद केली. बालविवाह बंद करतानाच विधवांचे, वेश्यांचे पुनर्वसन केले. त्यांना अधिकार दिले. त्यामुळे अनुभव मंटप व महात्मा बसवेश्वर यांच्यामुळे अनेक स्त्रिया ह्या वचनकार झल्या. वचनकार म्हणजे आजच्या काळातील प्रसिद्ध विचारवंत असे म्हणूया. म्हणजे ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती, मोठ्याने बोलायला बंदी, सार्वजनिक ठिकाणी यायला बंदी होती त्याकाळात बसवेश्वरांनी स्त्रियांना नवा मार्ग दाखविला.

लोकशाही, स्त्रीमुक्ती यासोबतच समाजातील अंधश्रद्धा यावरही बसवेश्वरांनी लोकांच्या मनात द्वंद्व निर्माण करणाऱ्या विचारात खूप मोठे परिवर्तन केले. कारण ते स्वतः विवेकवादाचे पुरस्कर्ते होते. बाराच्या शतकात प्रथा, परंपरा यांचे समूळ उच्चाटन करणे खूपच अवघड काम होते; पण महात्मा बसवेश्वरांनी ते आपल्या शरणांच्या माध्यमातून सहज केले. भुताटकी, कर्मकांड, पशुबली, स्तोम, दैववाद, शिवाशिव, जप तप इत्यादी रूढी त्यांनी मोडीत काढल्या. वचनाच्या माध्यमातून त्यांनी व्यापक चळवळ उभारली जी त्याकाळात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. आज जेंव्हा आपल्या आधुनिक काळात अंधश्रद्धा निर्मूलन करणे जिकिरीचे बनले आहे असे मानतो; पण बसवेश्वरांनी मात्र आपल्या शरणांच्या, वचनाच्या द्वारे हे लोकोपयोगी कार्य यशस्वीपणे केले.
हे सर्व करत असताना त्यांनी सर्वानाच एक जगण्याचा मार्ग आखून दिला, ज्याचा पाया हा सदाचार होता. चोरी, हत्या, क्रोध, खोटे बोलणे, तिरस्कार करणे, मत्सर करणे, बढाई मारणे हे आपल्या विकासाच्या मार्गातील गतिरोधके आहेत. त्यामुळे प्रत्येकाने या मार्गावरून बाजूला होता स्वतःसह समाजाच्या भवितव्यासाठी सदाचारी बनल्यास समाजातील वाईट शक्ती कमी होईल व राष्ट्र हे सुजलाम सुफलाम होईल. एवढेच नव्हे तर ज्या व्यक्ती सदाचारी आहेत त्यांना बाकी काही कर्मकांड करण्याची आवश्यकता भासत नाही म्हणून प्रत्येकाने सदाचारी बनले पाहिजे असा त्यांचा ठाम आग्रह असायचा.

महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीनेयुक्त मूल्याधिष्ठित समाजरचना या विचाराचा सदैव पुरस्कार केला. यासाठी त्यांना अनेकवेळा अडचणींना तोंड द्यावे लागले; पण जी माणसे विचारांनी परिपूर्ण असतात ती माणसे कधीही आपल्या ध्येयायापासून परावृत्त होत नाहीत किंवा त्यापासून आपला मार्ग बदलत नाहीत. महात्मा बसवेश्वरांनी आयुष्यभर ह्याच तत्वाचा स्वीकार केला. सामाजिक समता प्रत्येकाच्या मनात कायम राहावी, वृद्धिंगत व्हावी यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. सामाजिक समता प्रस्थापित करायची असेल तर त्यासाठी सर्वांना एक पातळीवर आणणे गरजेचे आहे. जो विचार कार्ल मार्क्स वा तत्कालीन विचारवंतानी कष्ट आणि त्याच्या मोबदल्याची बाबतीत मांडला तोच विचार किंबहुना त्याहूनही सोप्या भाषेत बसवनांनी मांडला. हा विचार करून बसवेश्वरांनी “कायक ही कैलास” हा जगन्मान्य सिद्धांत लोकांच्या समोर मांडला. कोणत्याही  प्रकारचे  शारीरिक  श्रम  हे हीन दर्जाचे नाहीत, असे  सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढवली. यात भेदभाव नसायचा. महामंत्री बसवेश्वरांचा कायक आणि कष्टकरी हरळयाचा कायक हे समान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारण दोघांच्याही कायकांच्या माध्यमातून समाजाची गरज भागणार आहे. मग भेदभाव कसला आणि यातच देव आहे हे बसवेश्वरांनी त्यावेळी लोकांच्या मनावर बिंबवले. याच कायकामुळे समाधान, सुख, समृद्धी मिळते. त्यामुळॆ प्रत्येकाने कायक केलेच पाहिजे, असा दण्डक त्यावेळी राज्यात होता. एवढेच नव्हे तर कायक न करणाऱ्यांना त्या राज्यामध्ये तसेंच अनुभव मंटपामध्ये प्रवेश नव्हता. त्यामुळे ऐतखाऊ वा बसून खाणाऱ्यांची वाणवा त्याकाळी असायची. कारण महात्मा बसवेश्वरांच्या विचारांनी प्रभावित होऊन रिकामा माणूसच दिसतच नव्हता. एवढा मोठा विचार आणि त्याचे महत्व त्यांनी आपल्या कार्यातून लोकांच्या समोर मांडले. आजच्या काळात जर त्यांचा हाच विचार सर्वच समाजातील सर्व लोकांनी स्वीकारला, तर नक्कीच एक दिवस भारत जगाच्या पाठीवर नवी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आलेला दिसेल.

अनुभव मंटपाच्या माध्यमातून अनेक बदल समाज व्यवस्थेमध्ये बसवेश्वरांनी केले. अजून एक महत्वाचे कार्य त्यानी या माध्यमातून केले ते म्हणजे “माझ्यापेक्षा लहान कुणीच नाही आणि मी सगळ्यात मोठा नाही”, हा विचार करणे व तो समाजाच्या मनावर बिंबवणे ही खूप कठीण बाब त्याकाळात होती. तरीही त्यांनी विचारपुर्वक हा बदल घडवून आणला त्यामुळेच आंतरजातीय विवाह, रोटी – बेटी व्यवहार, सहभोजन, घडवून आणले. यामुळे मुठभर लोकांची मक्तेदारी आपोआपच संपुष्टात आली. समाजातील प्रत्येकासाठी त्यांच्याकडे एकच शब्द, एकच वर्ण होता तो म्हणजे शरण. त्यामुळे या व्यवस्थेत काम करायला ना धर्माची जातीची वा अन्य बाबींची आवश्यकता नव्हती. तर फक्त त्याने सदाचारी असले पाहीजे, कायक करत असला पाहिजे. यामुळे समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यास मदत झाली.

महात्मा बसवेश्वरांच्या चळवळीचा प्रमुख घटक हा उपेक्षित माणुस होता. त्याच्या उद्धारासाठी त्यांच्याकडून अनेक अपेक्षित बदल झाले. म्हणूनच अतिशय खडतर प्रसंगी बिज्जल राज्यात वरील सर्व बाबीमुळे एकही भिकारी झाला नाही, एकही अत्याचार वा विनयभंग झाला नाही. आज सगळीकडे बेफाम वाढलेला भ्रष्टाचार या काळात वाढलेला दिसत नाही वा आढळतच नाही. त्यासोबतच महत्वाचे म्हणजे त्या काळातील प्रस्थापित बनलेल्या विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तिंनी त्यांना सतत नाउमेद केले. राजाच्या कानावर त्यांच्याविरोधात आगळीकी केल्या; पण विचारच एवढा घट्ट मनावर बिंबला गेला की उघड विरोध करणे कुणालाही जमले नाही. तरीही अनेक वेळा मंत्रिमंडळ बैठकीत बसवेश्वरांच्या पदरी एकाकीपणा येई; पण अशा एकाकीपणावर त्यांनी आपल्या लोकोपयोगी विचारांच्या जोरावर मात केली.

बसव काळात सर्वाना समान अधिकार होते. त्यामुळेच वेगवेगळ्या जातीतील लोकांना अनुभव मंटपामध्ये मोठ्या मोठ्या पदावर कार्य करण्याची संधी मिळाली.  ते आयुष्यभर लोकांच्या भल्यासाठी त्यांच्या उद्धारासाठी सतत काम करत राहिले. त्यांनी कधीही त्याचे अवडंबर मांडले नाही. त्यासोबतच त्याचा गैरवापरही केला नाही. त्यामुळेच त्यांच्याबद्दल प्रचंड आदर समाजात कायम राहीला. म्हणूनच जेव्हा जातीयवादी लोकांतील काहीजणांनी कान भरल्यामुळे राजा बिज्जलाने कल्याण येथे कलावती व शिलवंत यांना हत्तीच्या पायी देऊन मारले. अनुभव मंटपास आग लावली. शरण लोकांवर हल्ले केले. त्याचा शरणांनी प्रतिकार केला. जे साहित्य हाती लागेल ते घेऊन शरणांनी कल्याण भूमी सोडली. तसेच महात्मा बसवेश्वरांनीही कल्याण सोडले. ते पुढे कुडलसंगम येथे गेले व तेथेच ते लिंगैक्य झाले.

अतिशय कमी कालावधीत त्यांनी व त्यांच्या ७७० शरणांनी खुप मोठा प्रबोधनात्मक परिवर्तनवादी विचार जगाच्या समोर मांडला. हजारो वर्षाच्या मुक आक्रोषाला वाट मिळवून देतानाच त्यांच्या जातीयतेच्या आघातांनी जखमी झालेल्या मनाला उभारी मिळवून देण्याचे उत्तुंग कार्य केले. जेव्हा माणूस माणसाला माणूस म्हणून मान्यता देत नव्हता, त्या काळात महात्मा बसवेश्वरांच्या मार्गदशनाखाली त्याच माणसाला जगविण्याचे धोरण सुरू होते. अतिशय साध्या, सोप्या, सुलभ भाषेचा वापर करत लोकांच्या दैनंदिन जीवनातील व्यवहारातील उदाहरणांचा आधार घेत महात्मा बसवेश्वरांनी वचने रचली व त्याच वचनाच्या माध्यमातून मानवी जीवन सुंदर कसे करता येईल याकडे लक्ष वेधले. यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय यावर आधारभूत असणारी आणि अंधश्रद्धा, अज्ञान, बहुदेवोपासना, स्त्री दास्य, विषमता, जातीयता इत्यादीवर आघात करणारी त्यांची वचने आजही सर्वांसाठी दिशादर्शक आहेत. त्यामुळे आज ९०० वर्षानंतरही त्यांच्या विचारांचे गारुड भारतीयांसह संपूर्ण जगभर असणाऱ्या बसवप्रेमी लोकांच्या मनावर आजही कायम आहे. म्हणूनच त्यांची जयंती सगळीकडेच उत्साहाच्या वातावरणात साजरी होत असते. त्यांच्या याच समाजप्रवर्तक विचाराने प्रेरित होऊन लंडन येथील थेम्स नदीच्या किनाऱ्यावर त्यांचा भव्य पुतळा उभारून लंडन महापालिकेने त्यांना मानवंदना दिली आहे. भारताच्या संसदेत त्यांचे तैलचित्र उभारून भारत सरकारने त्यांच्या विचारांना अभिवादन केले तर कर्नाटक सरकारने त्यांचे चित्र असले नाणे प्रसिद्ध करून त्यांच्या विचारांचे महत्व अधोरेखीत केले.

थोडक्यात सांगायचे झाले तर, महात्मा बसवेश्वर हे लोकोत्तर समाजसुधारक, श्रेष्ठ तत्वचिंतक, समतेचे पुरस्कर्ते, थोर अर्थतज्ञ, शिक्षणतज्ञ, साहित्यिक, जबाबदार राज्यकर्ते, लोकशाहीचे समर्थक आणि मानवतेचे प्रसारक होते. आज भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली आहेत. तरीही भारतात बेरोजगारी, बेकारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवर वा सर्वसामान्य लोकावर अन्याय – अत्याचार होताना दिसून येत आहेत. मात्र बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यकाळात अशा प्रकारच्या कोणत्याही अनाचाराला थारा नव्हता. कारण त्यांच्या अनुभव मंटपाची रचना हीच मुळी समानतेवर आणि प्रत्येकाच्या कौशल्यावर आधारित होती. भारत वा भारतीयांचे दुर्दैव म्हणा आजपर्यंत जेवढे लोकोत्तर राष्ट्रपुरुष झाले, ज्यांनी आपल्या विचारातून राष्ट्रीय एकतेच्या वा राष्ट्रविकासाच्या गोष्टी किंवा मार्ग सांगितला. त्या कधीच त्यांच्या काळात अवलंबिल्या गेल्या नाहीत. पण ज्या – ज्या वेळी संकटे व अडचणी आल्या तेंव्हा मात्र याचा विचारांनी देशाला विकासाचा मार्ग दाखावला. एवढेच नव्हे तर ..

हा कोणाचा हा कोणाचा,
कोणाचा हा ऐसें नच वदवा,
हा अमुचा हा आमुचा,

आपुलाची हा ऐसेची हो वदवा असा जातपातविरहीत, बंधुत्व – समता – समानता अशा मानवतेच्या प्रचारास पूरक असे विचार त्यांनी मांडले. हेच विचार जगाने आत्मसात करणे काळाची गरज आहे. कारण याच विचारांनी मेंदूला चढलेला अज्ञानाचा गंज दूर होऊ शकतो, याच विचारांनी प्रेरणेची नवी दिशा प्राप्त होते. म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना मनःपूर्वक अभिवादन.

 

©® श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. वाटद खंडाळा ता. जि. रत्नागिरी.
संपर्क – ९७६४८८६३३० / ९०२१७८५८७४