अद्वितीय योद्धा – छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासोबत मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आपलेच हितशत्रू, परकीय शत्रू वा परंपरागत शत्रू या सर्वांवर आपले निष्ठावान सहकारी, राजमाता जिजाऊ – छत्रपती शहाजी महाराज यांची शिकवण आणि अलौकिक बौद्धिक सामर्थ्य यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पताका सर्वदूर पसरवली. याकामी त्यांच्यावर अनेक प्रसंग आले. ज्यातून ते सहीसलामत बाहेर पडून लोककल्याणकारी राज्याचा विस्तार केला. तर कधी – कधी त्यांना स्वतःला अमान्य असणारे निर्णय स्वराज्याच्या भल्यासाठी त्यांना घ्यावे लागले. असाच एक अत्यंत दुर्दैवी प्रसंग म्हणजे पुरंदरचा तह. या तहात त्यांना बरेच किल्ले आणि खंडणी मुघलांना देण्याचे मान्य करावे लागले. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांना या तहाच्या अटी शिवराय पूर्ण करणार नाहीत असे वाटायचे. म्हणून त्यांनी या तहाच्या अटी पूर्ण होईपर्यत छत्रपती संभाजी महाराज यांना ओलीस म्हणून ठेवण्याची अट घातली. त्याप्रमाणे जेमतेम आठ वर्षे वय असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांना वज्रगडावर ओलीस म्हणून राहावे लागले. त्यानंतर काहीच दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी तहाच्या अटी पूर्ण केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज परत यायला निघाले. तोपर्यंत संभाजी महाराज यांची कुशाग्र बुद्धी आणि वागण्यातील सहजसुलभता यामुळे सरदार दिलेरखान आणि संभाजी राजे यांच्यात मैत्री निर्माण झाली. याच मैत्रीखातर मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांनी त्यांना देण्यासाठी एक भलामोठा हत्ती आणला. त्या हत्तीकडे संभाजी महाराज पाहत असताना दिलेरखान सहज म्हणला की, हा एवढा मोठा हत्ती दक्षिणेत कसा न्यायचा असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? त्यावर तल्लख आणि हजरजबाबी असणाऱ्या संभाजी महाराजांनी उत्तर दिले की, हा हत्ती आम्ही कसाही नेणारच; पण आमच्या आबासाहेबांनी तुमच्याशी तहात दिलेले किल्ले कसे परत घ्यायचे हा विचार आम्ही करतोय. हे त्यांचे उत्तर ऐकून मिर्झाराजे जयसिंग अवाक होऊन त्यांच्याकडे बघतच राहिला. याच हजरजबाबीपणा, धाडसीपणा यांच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजानी स्वराज्याची सीमाच वाढवतानाच आपल्या अभ्यासपूर्ण राज्यकारभाराच्या माध्यमातून प्रत्यक्षात पातशहा औरंगजेब बादशहाला जवळपास पाच लाख फौज आणि कोटयवधी रुपयांचा खजिना घेऊन महाराष्ट्रात यायला भाग पाडले. त्यातील अभिमानाची बाब म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या धारेवर आणि चौकस राज्यकारभाराच्या जोरावर दिल्लीच्या बादशहाला आपली भांडीदेखील विकण्यासाठी काढायला लावली. असा पराक्रम छत्रपती संभाजी महाराजानी आपल्या राज्यकारभाराच्या उण्यापुऱ्या आठ ते नऊ वर्षात केला.

अशा या लोकप्रिय तथा पराक्रमी राजाचा जन्म १४ मे १६५७ साली झाला. अवघ्या दोन वर्षाचे संभाजीराजे असताना त्यांच्या आईचे म्हणजेच सईबाई महाराणीसाहेबांचे दुर्दैवी निधन झाले. तेव्हापासून राजमाता जिजाऊसाहेब आणि पुण्याजवळील एका खेड्यातील धाराऊआई यांनी संभाजी राजे यांचे पालन पोषण केले. हे पालन करताना राजमाता जिजाऊसाहेब यांनी संभाजी राजे यांच्यावर अत्यंत चांगले संस्कार करताना त्यांच्यात स्वराज्य रक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचे बीजारोपण केले. ज्या – ज्या वेळी संधी मिळाली त्या – त्या वेळी जिजाऊ साहेबांनी, शंभुबाळ लक्षात राहू द्या की, तुमच्या आबासाहेबांनी स्थापन केलेल्या या स्वराज्याचा विस्तार करताना तुमच्याकडून त्यात भरच पडली पाहिजे. जेव्हा – जेव्हा कधी तुम्ही वैचारिक संकटात असाल, तेव्हा – तेव्हा तुम्ही आमचा हाच सल्ला आठवा म्हणजे तुमचे पाय कधीही वाईट मार्गाला किंवा स्वराज्याच्या विरोधात जाणार नाहीत. महत्वाचे म्हणजे आपल्या ३२ वर्षाच्या आयुष्यात संभाजीराजानी बालपणीचा कार्यकाळ सोडला तर सतत स्वराज्याच्या आणि रयतेच्या कल्याणाची कास धरली. त्यामागे नक्कीच राजमाता जिजाऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिक्षणाचा आणि त्यातील संस्काराचा परिणाम दिसून येतो. त्यामुळेच यातून मिळालेल्या दृढनिश्चयाने संभाजी राजांनी अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखविल्या.

ज्या वयात लहान मुलांना संस्काराची आवश्यकता असते त्या काळात ते मिळाले तर त्यातून संभाजीराजासारखे पराक्रमी छत्रपती निर्माण होतात. आज तसे होताना दिसत नाही, कारण आज बाळाच्या पगारदार आईबाबांच्या आयुष्यात बाळाच्या आजी – आजोबांना स्थानच नाही. म्हणूनच संस्कारहीन आणि पदभ्रष्ट पिढी घडतेय की काय ही भीती निर्माण होत आहे. असो.

राजमाता जिजाऊ यांचे शिक्षणातून दिलेले संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रत्यक्ष अनुभव यातून संभाजीराजे घडत गेले. याचेच उदाहरण म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी सर्वांसाठी मार्गदर्शन ठरणारा बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. त्यासोबतच सातसतक, नायिकाभेद यासारखे ग्रंथ लिहिले. त्यातून त्यांनी राज्यकारभार कसा करावा यासह विविध विषयांवर मार्गदर्शक ठरणारे लेखन केले आहे.

संभाजीमहाराजांच्या आयुष्याचा बारकाईने अभ्यास केला असता आपल्या लक्षात येईल की, त्यांचे आयुष्य हे प्रत्येक टप्प्यावर आकर्षक आणि प्रेरणादायी वाटते. वयाच्या आठव्या वर्षी वज्रगडावर ओलीस राहणे, आग्रा मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जाणे आणि सगळ्यांना सोडून एकटेच मागे राहत अनेक महिन्यांनी परत येणे, अनेक लढायांत वा मोहिमांत तुकडीचे नेतृत्व करणे, शिवाजी महाराजांच्या सूचनेनुसार राज्यकारभारात लक्ष घातल्यानंतर स्वराज्याच्या कामात भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभार सर्वांसमोर आणणे, त्यासाठी अनेक गैरमतलबी आरोपांचे धनी होणे यासह अनेक घटना व त्यावर मात करण्याची त्यांची तडफ त्यांच्याबाबतीतील आदर वाढवणारी ठरते. त्यासोबत अजून त्यांचा एक गुण मुद्दाम सांगावासा वाटतो की, त्यांना खोटेपणा वा खरेपणाचा आव आणणे सहन व्हायचे नाही. त्यामुळे त्यांच्यातील या चांगल्या गुणामुळे अनेक स्वार्थी आणि मतलबी मंडळीनी त्यांच्या बदनामीचे सत्रच सुरू ठेवले. मात्र या बदनामीच्या कारस्थानाला ना संभाजी महाराजांनी किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही भीक घातली नाही.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांनी राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे फिरून न पाहता स्वराज्याचा विस्तार आणि स्वराज्याचे संरक्षण करण्यावर भर दिला. अगदी मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर पासून त्यांनी भारताच्या अगदी दक्षिनेकडे त्रिचनापल्ली ते गोवा आणि जंजिरा ते कोकणातील प्रत्येक बंदरावर इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्याविरोधात पेटवलेला संघर्षातून उभारलेले आरमार असा स्वराज्याचा विस्तार केला. त्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून स्वराज्यासाठी डोकेदुखी बनलेल्या जंजीऱ्याची मोहीम त्यांनी अगदी नियोजनपूर्वक बनवली; पण त्यातच दिल्लीचा शहजादा दक्षिणेत आल्यामुळे त्यांना ती मोहीम अर्धवट सोडावी लागली. मात्र राजांचा दणका आणि त्यांची गतीच एवढी आक्रमक होती की, त्यातून  जंजिऱ्याचा सिद्दी आयुष्यात प्रथमच घाबरला आणि स्वराज्याच्या विरोधात मुघलांची वा इंग्रजांची बाजू न घेण्याच्या भूमिकेवर ठाम झाला. हे सर्वच करत असताना मध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य संपले या अविचारातून पोर्तुगीजांनी रयतेचा छळ करायला सुरुवात केली, त्याबरोबरच लोकांचे धर्मांतर करून घेण्यावर भर दिला. त्याचा राग मनात धरून आणि उद्या चालून औरंगजेब दक्षिणेत आल्यास पोर्तुगीजांसारखा शत्रू हा मुघलांना न मिळणे आणि तो शांत राहणे हे चांगले, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पोर्तुगीजांची नांगी ठेचण्याच्या हेतूनेच त्यांनी गोव्यावर धडक मारली. ही धडक इतकी खोलवर होती की, गोव्याचा पोर्तुगीज व्हॉईसराय घाबरुन प्रार्थनागृहात जाऊन आकाशातील देवाचा धावा करत होता. यातच संभाजी राजांच्या आक्रमण आणि त्याच्यातील गतीची दाहकता दिसून येते. गोव्याच्या पोर्तुगीजांना शांत करतानाच त्यांनी त्या वेळातच मुंबईच्या इंग्रजांनाही आपल्या रणकौशल्याचे पाणी दाखवत त्यांनाही मराठे – मुघल लढ्यात न पडण्याचे वदवून घेतानाच, त्या काळातील आरमाराचे महत्व आणि त्यातही व्यापारासाठी मुंबईचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी मुंबईच विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. तो काही कारणास्तव फसला, मात्र औरंगजेबाला हुसकावून लावल्यानंतर इंग्रजांच्या विरोधात रणशिंग फुंकण्याची त्यांची ईच्छा त्यांनी अनेकवेळा आपल्या सहकाऱ्यांच्या समोर व्यक्त केली.

थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्याप्रमाणे आरमाराचे जनक हे छत्रपती शिवाजी महाराज हे होते. त्याचप्रमाणे आरमाराचे महत्व आणि व्यापारातील श्रेष्ठत्व लक्षात घेऊन एखादे बंदरच विकत घेऊन आरमाराला महत्व देणारे छत्रपती संभाजी महाराज हे जागतिक पातळीवरील दुरदृष्टीचे नेतृत्व होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

ज्याप्रमाणे त्यांनी मुघलांचे होणारे आक्रमण लक्षात घेऊन दक्षिणेत सर्व राजेशाह्यांना एकत्र करण्याची भूमिका घेतली त्यामध्ये ते यशस्वीदेखील झाले. विजापूरचा आदिलशहा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा यांना त्यांनी आपल्यातील राजकीय धुरंधरपणांच्या माध्यमातून आपल्या समर्थनार्थ उभे केले. त्यामुळे औरंगजेब कितीही दिवस तळ ठोकून राहिला तरीही त्याला यश येणार नाही याची पुरेपूर पूर्वतयारी संभाजी महाराजानी केली. आपल्या प्रत्येक किल्यावरील रसद आणि तयारी त्यांनी पूर्ण पाहून घेतल्यानंतरच औरंगजेब बादशहाशी दोन हात करायला सुरुवात केली. आवश्यक तेथे आक्रमण आणि शक्य तेवढी यशस्वी माघार हे त्यांच्या मुघलांच्या विरोधातील लढाईचे धोरण ठरले. प्रत्येक किल्ला जास्तीत जास्त लढला पाहिजे यासाठी ते स्वतः रणसंग्रामाच्या आघाडीवर राहून सूचना देत होते. औरंगजेब दक्षिणेत आल्यानंतर सलग आठ वर्षे संभाजी महाराज हे पाठीला ढाल आणि हाती समशेर घेऊन स्वराज्यात आणि दक्षिणेत अक्षरश: आपल्या पराक्रमाचा धुरळा उडवत होते. जवळपास २०० च्या वर लढाया त्यांनी यशस्वीरीत्या लढल्या. त्यामुळे भारतीय उपखंडात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या औरंगजेब बादशहाला देखील संभाजीसारखा एखादा पुत्र माझ्या पोटी का जन्माला आला नाही असा प्रश्न पडत होता.

एवढेच नव्हे तर, जोपर्यंत संभाजीला जिवंत पकडत नाही व लढाईत ठार मारणार नाही तोपर्यंत डोक्यावरील मुकुट परत घालणार नाही. ही शपथ घेतली. छत्रपती संभाजी महाराजांच्या आक्रमणामुळे आणि त्यांच्यातील तडफेमुळे भुंड्या डोक्याने औरंगजेब बादशहाला फिरावे लागत होते, यातच संभाजी महाराजांचे यशस्वीपणे दिसून येते. औरंगजेब बादशहाला ना लढाईत यश मिळत होते ना एखाद्या चढाईत. अशावेळी त्यांनी भारतीय भूमीला असणाऱ्या वाळविचा म्हणजेच घरभेदीपणाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि मराठा सरदारांना वतने आणि जहागिऱ्या देण्याचे आश्वासन दिले. त्या लालसेपोटी संभाजी महाराजांच्या अत्यंत विश्वासू नातेवाईकांनीच आपल्या लालसेपोटी मुघल सरदार मुकर्रबखान याला सोबत घेऊन संभाजी महाराज संगमेश्वर मुक्कामी असतानाच त्यांना कपटाने पकडले. पन्हाळा मार्गे म्हणजेच आंबा घाटातून उतरुन जाण्यापेक्षा प्रवासासाठी अत्यंत धोकादायक असणाऱ्या अणुस्कुरा घाटातून त्यांनी प्रवास करत संगमेश्वर मुक्कामी मुघलांच्या विरोधात लढाईचे धोरण ठरवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्रमण केले. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पराक्रमाची शर्थ केली; पण दुर्दैव स्वराज्याचे, त्याच ठिकाणी संभाजी महाराजांना कैद झाली. त्यांचे व स्वराज्याचे दुर्दैव येथेच थांबले नाही, तर स्वराज्यातील अनेक ठाण्यावरून मुकर्रबखान ज्यावेळी त्यांना घेऊन जात होता त्या – त्या वेळी काही घरभेदी मुकर्रबखान याच्यासोबत असल्याने प्रत्येक ठाण्यावर त्यांना प्रवेश मिळत गेला आणि दुर्दैवाने जसे – जसे अंतर पुढे जात होते तसे तसे स्वराज्याचा छत्रपती काळाच्या अंधाऱ्या प्रवाहात लोटला जात होता.

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एवढी भीती आणि तिरस्कार औरंगजेब बादशहाच्या मनात होता की आपल्या शत्रूंना तीन ते चार दिवसात मारणाऱ्या औरंगजेब बादशहाने संभाजी महाराज यांचे जवळपास ३८ ते ४० दिवस हाल केले. हाल या शब्दलाही मर्यादा पाडाव्यात एवढे क्रूर अत्याचार औरंगजेब बादशहाने त्यांच्यावर केले. तरीही त्या धर्मांध, मस्तवाल आणि क्रूर औरंगजेबाच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता संभाजी महाराजानी वीरमरण पत्करले.  त्या खुनशी पातशहासमोर स्वत:सह स्वराज्याला कधीही झुकण्याची वेळ येईल अशी परिस्थिती येऊ दिली नाही. अवघ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात संभाजी महाराजानी सह्याद्री पर्वताची उंचीदेखील कमी पडेल इतका मोठा पराक्रम करून जगासमोर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यासाठी व देश रक्षणासाठी कार्य करणाऱ्या सर्वासाठीच खूप मोठा आदर्श निर्माण केला.

हा विस्तार करताना हे त्यांना सहज शक्य  झाले नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अनेक अंतर्गत आणि बाहेरील शत्रूंनी एकदमच उचल खाल्ली. त्यामुळे त्यांना सुरुवातीचा काळ हा अत्यंत संघर्षमय गेला. स्वराज्याची विस्कटलेली घडी त्यांनी अल्पावधीतच सुरळीत करत सर्व सैन्यात चैतन्य फुलविले व त्यांना नवी दिशा दिली. त्यामुळे दिल्लीच्या बादशहाची शिवाजीच्या मृत्यूनंतर आपण संपूर्ण भारताचे अधिपती होणार हा त्याचा समज खोटा ठरवतानाच औरंगजेब बादशहाच्या मुलीला लिहिलेल्या पत्रातीळ उल्लेखाप्रमाणेच बादशहाची कबर खोदण्यास छत्रपती संभाजी महाराज यांनी सुरुवात केली.

म्हणूनच शायर म्हणतात,

देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था।।
महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।।

आपल्या वयाच्या आठव्या वर्षांपासून प्रत्येक पावलावर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याच्या भल्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावले. पुढच्या क्षणी आयुष्याचे काय होईल याचा कसलाही विचार न करता फक्त आणि फक्त स्वराज्याच्या विस्ताराची आणि संरक्षणाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे स्वीकारली. राजमाता जिजाऊ साहेब यांनी दिलेल्या शिकवणुकीमुळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला घडवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांनी कधीही त्या शिकवणुकीला वा मार्गदर्शनाला गालबोट लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. म्हणूनच आजही ३३१ वर्षानंतरही छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव घेतले की, अंगावर रोमांच उभे राहतात आणि आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडतात की, असा राजा होणे नाही.

एवढे उत्तुंग कार्य असतानाही त्यांचे कौतुक, ना त्यांच्या काळात हितशत्रूमुळे कधी झाले नाही किंवा त्यांच्या बलिदानंतरही झाले नाही हे मात्र वास्तव आहे.

त्यानंतरच्या काळात तर छञपती संभाजी महाराजांच्या बदनामीचा विडाच उचलल्यासारखे लेखन काही खुप मोठ्या (असे स्वतःला समजणाऱ्या) इतिहासकारांनी केले. त्यात भर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या आक्रमक राजकारणापुढे स्वार्थी आणि मतलबी कारभाऱ्यांना दिलेल्या शिक्षा कायम लक्षात ठेऊन पुढील काळात दुखावलेल्या मतलबी मंडळींच्या पुढील पिढीने संभाजी महाराजांना कायम बदफैली, तामसी, उग्र, व्यसनी, वामामार्गावरील वाटसरू हीच ओळख कायम ठेवण्यात धन्यता मांडली. त्याहूनही आजच्या व मागच्या पिढीचे दुर्दैव असे की, अनेक चित्रपट व पन्नासच्यावर नाटके, अनेक कादंबऱ्या, कथा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आल्या; परंतु त्यात एकाही ठिकाणी संभाजी महाराजांच्या शत्रूवर चालणाऱ्या तलवारीला, संस्कृत मधून विविध विषयांवर व्यक्त होणाऱ्या लेखणीला, सौन्दर्य आणि पराक्रम जोपासणाऱ्या कविमनाला, त्यांच्यातील भर कावेरी नदीच्या तुडुंब वाहणाऱ्या पात्रात घोडा फेकणाऱ्या धाडसीपणाला, असंख्य वेळा चूका करूनही कारभारी मंडळींच्या चूका पोटात घालणाऱ्या त्यांच्यातील निर्मळपणाला, व्यापार आणि आरमाराचे महत्व लक्षत घेऊन मुंबई सारखे बंदरच विकत घेण्याचा मानस बाळगणाऱ्या त्यांच्यातील व्यापारी दुरदृष्टीला, एकाचवेळी इंग्रज – पोर्तुगीज – सिद्दी आणि मुघल यांच्याशी लढा देतानाच त्या – त्या ठिकाणी त्यांच्यावर जरब बसवणाऱ्या त्यांच्यातील आक्रमकतेला वा त्यांच्यातील खरेपणाला कधीही कुणीच संधी दिली नाही वा तसा प्रयत्नही केल्याचे कुठे दिसत नाही.

पण सत्याचा सूर्य कधी तरी उगवतोच. त्याप्रमाणे मागील काही वर्षांमध्ये अनेज नामवंत इतिहास संशोधकांनी संभाजी महाराज यांचा खरा इतिहास लोकांच्यासमोर मांडला. त्यामुळे उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या पोटी जन्माला आलेल्या संभाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख जगाला झाली.
मराठी भाषेत एक विचार आहे की, जसे जसे तुम्ही अनंत अडचणी, संकटे यावर मात करत स्वकर्तृत्वाने नव्या वादळवाऱ्याना तोंड देत नवी वाट निर्माण करत असता, त्याच वेळी तुमची बदनामी त्याच पाउलवाटेवरून तुमचा पाठलाग करत असते आणि संधी साधून तुमच्यावर आघात करत असते. अगदी असेच संभाजी महाराजांच्या बाबतीत सतत होत राहिले. त्यांचे कर्तृत्व समोर आणण्यापेक्षा त्यांचे कपोकल्पित वर्तन मात्र चवीने लोक चघळत राहिले. त्यात एक आरोप नेहमीच केला जायचा की, ते स्त्री लंपट होते. यातही अनेक स्त्रियांची नावे समोर येतात. उदा. गोदावरी, हंसा, मंजुळा, कमळा यासारख्या अनेकांची नावे समोर येतात. पण इतिहासाचा धांडोळा घेतला असता असे लक्षात येते की, यापैकी गोदावरीने अनेक कारभाऱ्याच्या कटकरस्थानचा भांडाफोड संभाजी महाराजांसमोर केला. म्हणून तिच्यासोबतच संभाजीराजे यांनाही बदनाम करण्याचा डाव गोदावरीनेच शिवाजी महराज यांच्यासमोर सत्य सांगितल्याने फसला. तर हंसा ही स्वतःच संभाजीराजांच्या सौंदर्यावर आशक झाली होती, त्या भ्रमातच तिने आत्महत्या केली. बाकीच्या कुणाचीही नावे संभाजी महाराजांच्या समकालीन पुराव्यात कुठेच आढळत नाहीत. त्यासोबतच काही नाटकात तर संभाजी महाराजांना अक्षरशः व्यसनात बुडालेला युवराज दाखविले आहे. जर असे खरेच असते तर एकाचवेळी सात सत्ताना अंगावर घेण्याचा प्रयत्न खोटा होता की काय?

जवळजवळ सात वर्षे भुंड्या डोक्याने फिरणारा औरंगजेब व्यसनी संभाजीला घाबरला होता की काय? जर संभाजी बदफैली असते तर त्यांच्या एका शब्दांवर सत्तर हजर फौज आपला जीव ओवाळून टाकायला तयार असती काय? जर संभाजी महाराज व्यसनी वा बिघडलेला युवराज असते ते राज्याभिषेकाच्या वेळी आपल्या प्रत्येक मंत्रातील शब्दाच्या वजनापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात देणगी घेणाऱ्या गागाभट्टांना मंत्रोच्चारातील त्यांचीच चूक लक्षात आणून देण्याइतके शुद्धीवर कसे असते? एवढेच कशाला त्यांची हीच बुद्दीमत्ता पाहून पंडित गागाभट्टांनी समयनयन नावाचा ग्रंथ त्यांना अर्पण केला असता का? त्यांच्यावर अजून एक बिनबुडाचा ठपका ठेवा जातो की, संभाजी महाराज हे आपल्या स्वार्थासाठी दिलेखानाला अर्थातच मुघलांना जाऊन मिळाले.; पण छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि राजकारणाचा बारकाईने व पूर्वग्रहदूषित न ठेवता अभ्यास केला तर लक्षात येईल की, संभाजी महाराजांचे दिलेरखानाला जाऊन मिळणे यामागील पिता – पुत्रांचे नियोजन होते. दिलेरखान हा लाखाची फौज घेऊन दुसऱ्यांदा स्वराज्यावर आला होता. त्याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांनी दक्षिण मोहीम काढली होती. या दरम्यान दिलेरखानाला मोकळे ठेवणे म्हणजे स्वराज्याचा आयता घास त्याच्या तोंडी देण्यासारखे होते. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा जास्तीत जास्त काळ नुसत्या चर्चेत वाया घालवावा आणि स्वराज्याचे संकट टळेल अशी कृती करावी. आणि झालेही तसेच संभाजी महाराजांच्या मधाळ वाणीने दिलेरखान घायाळ झाला आणि पिता – पुत्रांच्या नियोजनपूर्वक केलेल्या फासकीत दिलेरखान अडकला. परिणामी स्वराज्यावरील एक – दोन चढाया वगळता फारसे नुकसान करणे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून येईपर्यंत दिलेरखानास जमले नाही.

थोडक्यात सांगायचे झाल्यास संभाजी महाराजांची दिलेरखान भेट ही ठरवून केलेली घटना होती. त्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक कपोकल्पित आख्यायिका सांगितली जाते की, औरंगजेब बादशहाने ज्यावेळी संभाजी महाराजांना कैद केली. त्यावेळी मुस्लीम धर्म स्वीकारल्यास तुझी सुटका करू. त्यावेळी संभाजीराजांनी सांगितली की, मला तुझी मुलगी दे, मग मी मुस्लिम धर्म स्वीकारणार, अशी मागणी केली. त्यामुळे औरंगजेब बादशहाने रागाच्या भरात संभाजीराजांची हत्या केली; पण वास्तव हे अत्यंत वेगळे आहे. कारण औरंगजेबाच्या ज्या मुलींवरून हे प्रकरण समोर आले, ती मुलगी म्हणजे झिनतउनीसा. जीचे वय हे संभाजी महाराजाच्या वयापेक्षा १४ वर्षांनी जास्त होते. मग अशा मुलींची मागणी संभाजीमहाराज कशी करतील?

यातील महत्वाचा भाग असा आहे की, संभाजी महाराजांना औरंगजेब बादशहाने पकडले त्यावेळी औरंगजेबाने विचारले की, तुझी सुटका करून तुला उत्तरेतील सुभेदारी देतो. त्या बदल्यात मला तुझ्या सर्व किल्ल्यांची चावी दे? माझे कोणकोणते सरदार तुला फितूर आहेत त्यांची नावे सांग? आणि तुझा खजिना कुठे आहे त्याची माहिती दे? तेंव्हा सह्याद्रिचा छावा असणारे छत्रपती संभाजी महाराज बोलले की, माझी संपत्ती ही माझी रयत आहे, किल्ल्यांच्या चाव्या ह्या किल्ल्यावरच असतात आणि तुझे कोणते सरदार मला फितूर आहेत हे माहीत नाही. या अशा अविश्वसनीय तथा गुढ उत्तराने औरंगजेब बादशहाने चिडून संभाजी महाराजांची हत्या अत्यंत क्रूरपणे केली.

अजून एक किल्मिश संभाजी महाराजांच्या नावासमोर कायम लावले जाते, ते म्हणजे संभाजी महाराजांना वाया घालविण्यात कवी कलश यांचा वाट खूप मोठा आहे. एकच उदाहरण यासाठी पुरेसे आहे ते म्हणजे संभाजी महाराजांना बिघडविण्यात जर कवी कलश यांचा वाटा असेल तर त्यांच्याकडे स्वराज्यातील दुसरे पद होते. त्यानी मनात आणले असते तर फितूर होऊन मुघलांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेऊ शकले असते; पण त्यांनी तसे न करता औरंगजेबाच्या अनन्वित अत्याचाराला सामोरे जात वीरमरण पत्करत आयुष्याच्या शेवटपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांना साथ दिली.

शेवटी असे वाटते की, फक्त आणि फक्त संभाजी महाराजांचा द्वेष म्हणून आजपर्यंत त्यांची खूप बदनामी इतिहासात झाली. जयंतीच्या निमित्ताने वयाच्या आठव्या वर्षांपासून स्वराज्याच्या कल्याणासाठी झटणारे, चौदाव्या वर्षी अखंड लेखन करणारे, सैन्याची गरज ओळखून पहिले बुलेटप्रुफ जॅकेट बनवणारे, भर समुद्रात जवळपास शेकडो मीटरचा पूल बांधणारे, पहिला तरंगता तोफखाना उभारणारे, केरळ – कर्नाटक – तामिळनाडू जिंकणारे, शत्रूच्या विरोधात आरमाराचे नेतृत्व करणारे, बाल मजुरी आणि वेठबिगारी यांच्याविरोधात कायदे करणारे, नव्या बाजारपेठा वसवणारे, महिलांना राज्यकारभारात स्थान देणारे, रयतेची गरज ओळखून अनेक बंधारे बांधून दुष्काळाच्या प्रश्नावर मात करणारे आणि २७ वर्षे तळ ठोकून बसलेल्या औरंगजेब बादशहाची कबर खोदण्यास सुरुवात करणारे अद्वितीय योद्धा असणारे  छत्रपती संभाजी महाराज आजच्या भरकटलेल्या समाजाच्या समोर येणे गरजेचे आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांचं त्याग आणि पराक्रमाच समाजातील प्रत्येकाला लढण्याचे बळ देईल.

त्यांनी स्वराज्य केवळ सांभाळले नाही तर कैक पटीने वाढवत अखंड भारतामध्ये त्याची गौरवपताका फडकावली. संभाजी राजांच्या काळात स्वराज्य अधिक सुरक्षित राहील असा विश्वास छत्रपती शिवाजी महाराज नेहमी बोलून दाखवायचे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा तो शब्दन शब्द खरा करून दाखवला.

अशा या लोकोत्तर धुरंधर राजकारणी आणि महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या राष्ट्रप्रेमी कार्याला त्यांच्याच जयंतीच्या निमित्ताने मनःपूर्वक अभिवादनासाह त्रिवार मुजरा!!!

©® श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३.
संपर्क – ९७६४८८६३३०/ ९०२१७८५८७४.

You cannot copy content of this page