विशेष लेख – सिंधुदुर्गातील खिळखिळी आरोग्यसेवा: “वाचवा… माझा बाबा गोव्याला जाताना वाटेतच गेला!”

सुसज्ज रुग्णालय नाही म्हणून प्रत्येक श्वासासाठी परराज्याची वाट; आईच्या डोळ्यातले पाणी पुसणार कोण?

जिल्हा रुग्णालय आहे की केवळ रेफर सेंटर? इथे मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या, उद्घाटनाचे नारळ फुटले, पण त्या इमारतीत जीव वाचवणारी यंत्रणा उभी राहिली नाही!

“डॉक्टर, काहीतरी करा… माझा नवरा वाचवा!” हा आक्रोश आंबोली घाटातल्या त्या ॲम्ब्युलन्समधून बाहेर पडतो, पण तो ऐकायला सिंधुदुर्गात एकही सुसज्ज अतिदक्षता विभाग नाही. नाडी मंदावते, श्वास जड होतो आणि गाडी गोव्याच्या दिशेने सुसाट धावते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. अर्ध्या रस्त्यातच त्या माऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसलं जातं. कारण सिंधुदुर्गात त्याला वाचवणारं एक हॉस्पिटल नव्हतं.

ही एका घराची गोष्ट नाही. हा प्रत्येक सिंधुदुर्गवासीयाच्या काळजाला घरं पाडणारा रोजचा अनुभव आहे. इथे जन्माला येणं म्हणजे मृत्यूशी जुगार खेळणं आहे. किरकोळ ताप आला तर ठीक, पण जर हृदयविकाराचा झटका आला, अपघात झाला, मेंदूत रक्तस्त्राव झाला तर थेट मृत्यूचाच दाखला हातात पडतो. कारण पाटी असते “गोव्याला घेऊन जा”, “कोल्हापूरला रेफर करा”, “मुंबईला हलवा”.

एका बापाला आपल्या चार वर्षांच्या चिमुरडीला खेळताना पडलेली बघून काळजाचा थरकाप होतो. डोक्याला जखम होते. तो तिला उचलून सावंतवाडीच्या सरकारी दवाखान्यात पळतो. तिथे डॉक्टर सांगतात, “सिटी स्कॅनची सोय नाही. ताबडतोब गोव्यात घेऊन जा.” बापाच्या डोळ्यासमोर अंधारी येते. खिशात फक्त पाचशे रुपये आणि समोर शंभर किलोमीटरचा प्रवास. तो लेकराला कवटाळून रडतो. “दार उघड बये, दार उघड.” पण दार उघडणारं कोणीच नसतं!

इथल्या माता भगिनींची प्रसूतीची कळ रात्री आली तर घरातले देव पाण्यात ठेवावे लागतात. “नॉर्मल होईल ना?” या एकाच प्रश्नाने अख्खं कुटुंब रात्रभर जागं राहतं. कारण जर सिझेरियनची वेळ आली, जर बाळाची नाडी गळ्याभोवती अडकली, तर इथे “तज्ञ डॉक्टर नाहीत.” हे ऐकावं लागतं. मग भर पावसात, खड्ड्यांच्या रस्त्याने ती कळवळणारी माता ॲम्ब्युलन्समध्ये जीव मुठीत धरून पडून राहते. अनेकदा बाळ रस्त्यातच जन्म घेतं आणि कधी कधी आई किंवा बाळ, किंवा दोघेही वाटेतच देवाघरी जातात.

विचार करा, त्या म्हाताऱ्या आईची काय अवस्था होत असेल जिचा एकुलता एक मुलगा कणकवलीत अपघातात सापडतो. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं जातं. तिथे सांगितलं जातं, “न्यूरोसर्जन नाहीत. ताबडतोब कोल्हापूरला न्या.” आई आपल्या मंगळसूत्र आणि कानातले गहाण ठेवून पैसे जमवते. तोपर्यंत दोन तास होऊन जातात. कोल्हापूर गाठेपर्यंत मुलाने प्राण सोडलेला असतो. त्या आईच्या तोंडून निघालेली किंकाळी या सुसज्ज नसलेल्या भिंतींना ऐकू येत नाही का?

हे जिल्हा रुग्णालय आहे की केवळ रेफर सेंटर? इथे मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या, उद्घाटनाचे नारळ फुटले, पण त्या इमारतीत जीव वाचवणारी यंत्रणा उभी राहिली नाही. एमआरआय नाही, सिटी स्कॅन बंद, कार्डिओलॉजिस्ट नाही, न्यूरोसर्जन नाही. फक्त पाट्या आहेत आणि रुग्णवाहिकांचे सायरन आहेत. हे सायरन रोज कोणाच्या तरी घराची राखरांगोळी करून जातात.

परराज्यात जाणं म्हणजे केवळ प्रवास नाही. ती एक शिक्षेची यात्रा आहे. पैसा नसलेल्याला कर्ज काढावे लागते, जमीन विकावी लागते. गोव्याला किंवा कोल्हापूरला जाऊन तिथे कोण ओळखीचं नसतं. भाषा समजत नाही, डॉक्टर काय सांगतात कळत नाही. पेशंट तडफडत असतो आणि नातेवाईक हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये हताशपणे उभे राहतात. उपचाराचा खर्च लाखात जातो. घरी परत येताना खांद्यावर एकतर कर्जाचा डोंगर असतो किंवा आपल्या माणसाचा निष्प्राण देह.

सिंधुदुर्गाने देशाला मोठमोठे नेते दिले, मंत्री दिले. पण सिंधुदुर्गवासीयाला साधा जीव वाचवणारा दवाखाना मिळू नये? आमच्या वाट्याला फक्त आश्वासनं, भूमिपूजनं आणि उद्घाटनं का? इथल्या माणसाच्या जीवाची किंमत फक्त मतदानापुरतीच आहे का?

आज प्रत्येक सिंधुदुर्गवासीयाच्या मनात एकच प्रश्न काळीज कुरतडतोय. “उद्या माझ्या बाबतीत असं झालं तर?” “माझ्या आईला, बायकोला, लेकराला असं काही झालं तर मी त्यांना कुठे नेऊ?” या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. कारण आमच्या जिल्ह्यात एकही असं हॉस्पिटल नाही जिथे आम्ही विश्वासाने आमच्या माणसाला दाखल करू शकू.

ही केवळ आरोग्यसेवेची खिळखिळी अवस्था नाही. हा आमच्या स्वाभिमानाचा झालेला अपमान आहे. हा आमच्या जगण्याचा रोज होणारा अपमान आहे. रस्त्यात जीव गमावलेल्या त्या प्रत्येक सिंधुदुर्गवासीयाच्या टाहोने आता तरी या व्यवस्थेला जाग येईल का? की अजूनही आम्ही आमची माणसं अशीच वाटेवर गमावत राहायची?

-अभिमन्यू वेंगुर्लकर

error: Content is protected !!