विशेष लेख- एसआरए योजनेत समाविष्ट होताना विचार करा! अन्यथा घात ठरलेलाच!!

विशेष लेख- सावधान! सावधान!! सावधान!!!
एसआरए योजनेत समाविष्ट होताना विचार करा! अन्यथा घात ठरलेलाच!!

सावधान!!!
नेहमी जो सावध असतो, तो सुखी असतो! प्रत्येकाने किमान स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दल सावध राहिले पाहिजे. नाहीतर आपला आत्मघात ठरलेलाच! आपले कुटुंब कधी भिकेला लागेल ते सांगता येणार नाही. कारण आपल्या आजूबाजूला फिरणारी सुटाबुटातील श्वापदं आपल्या स्वार्थासाठी, फक्त आणि फक्त कष्ट-मेहनत न करता लाखो- करोडो रुपये कमविण्यासाठी आपल्याला अनेक मार्गांनी फसविण्यासाठी सज्ज असतात. वेगवेगळ्या टप्प्यावर- वेगवेगळ्या ठिकाणी आमची शुद्ध फसवणूक होऊ शकते. त्यातील एका ठिकाणी निश्चितपणे गरीब कष्टकरी माणसांचे नुकसान होऊ शकते; नव्हेतर मुंबईत लाखो लोक आज बेघर झालेले आहेत. त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यांची कुटुंब देशोधडीला लागलेली आहेत. हे ठिकाण – ही गोष्ट म्हणजे मुंबई शहर व उपनगरामधील एसआरए स्कीम अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजना होय!

म्हणूनच आज जे छोट्याश्या जागेत झोपडीवजा घरात राहतात, अशांनी ह्या योजनेत जाण्यापूर्वी हजार वेळा नव्हे लाखो वेळा विचार करावा. संघटित होऊन निर्णय घ्यावा. कारण मुंबईतील ८० ते ९० टक्के एसआरए योजनेत झोपडी मालक रस्त्यावर आले आहेत. एकदा का बिल्डरच्या संमती पत्रावर सही झाली की तुम्ही त्या बिल्डरच्या, तथाकथित सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या (तथाकथित का म्हटलंय? कारण हे पदाधिकारी बिल्डरचीच माणसं नव्हेतर आम्हाला आयुष्यातून उठविणारी श्वापदं असतात. टिप- काही सोसायटीच्या संचालक मंडळात अपवादाने चांगली प्रामाणिक माणसं आहेत, जी नि:स्वार्थी वृत्तीने नेतृत्व करतात. त्यांचा सुद्धा ह्या लेखात पुढे उल्लेख होईल. पण अपवादाने नियम ठरत नाहीत म्हणून ८० टक्के ठिकाणी जे घडलंय त्यावरून `तथाकथित’ हा शब्द वापरण्यात आला आहे.)

एसआरए स्कीममध्ये समाविष्ट करण्यासाठी संमतीपत्रावर सही केल्यानंतर तुम्हाला ‘संमतीपत्रावर सही करा’ म्हणून विनवणी करणारे, फायद्याच्या गोष्टी सांगणारे तथाकथित गल्लीपासून अगदी राज्याच्या राजकारणात प्रभावी असणारे नेते-लोकप्रतिनिधी, संचालक मंडळातील पदाधिकारी, प्रशासकीय यंत्रणा (पोलीस, म्हाडा, महानगरपालिका, राज्य आणि केंद्र सरकार) कोणीही तुमच्या मदतीला धावून येणार नाही. तुमची कसलीही तक्रार कोणीही ऐकून घेणार नाही. एकदा का संमती करारावर सही झाली की तो बिल्डरच तुमचा खरा मायबाप! (जो मायबाप हजारो कोटी रुपये कमविण्यासाठी पुढे सरसावलेला असतो!) तो म्हणेल तेच पुढे घडणार आणि बिल्डर स्वतःच्या फायद्यासाठी तुमचा- तुमच्या कुटुंबियांचा बळी घेणार! मुंबईसारख्या शहरात डोक्यावरचं हक्काचं छप्पर गेलं की त्या कुटुंबाची काय हालत होते? हे तुम्ही आम्ही पाहतोय म्हणून झोपडी मालकांनो तुम्ही बिल्डरबरोबर करार करताना, एसआरए योजनेत सामील होण्यासाठी सही करताना सावध राहिलं पाहिजे!

ह्या प्रदीर्घ लेखात आम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलेल्या, अनुभवलेल्या आणि अभ्यासलेल्या सत्य घटना मांडणार आहोत. कारण लाखो लोकांनी स्वतःची फसवणूक करून घेतली आहे. असे असताना तुम्ही स्वतःच्या मालकीच्या झोपडीत राहत असाल तर यावर पुन्हा पुन्हा विचार करा!

तुम्ही म्हणाल, मुंबई एसआरए योजनेमार्फतच झोपडी मालक चांगल्या सुसज्ज बिल्डिंगमध्ये जाऊ शकतो, त्याचे राहणीमान सुधारू शकते. जर बिल्डरबरोबर संमती करारपत्रावर किंवा अन्य दस्तऐवजावर सही केली नाही तर आम्ही बिल्डिंगमध्ये जाणार कसे? ह्या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देता येणार नाही म्हणून हा प्रदीर्घ लेख आम्ही लिहिणार आहोत. तो किती भागांमध्ये असेल ते आत्ताच सांगता येणार नाही; पण या लेखांमधून आम्ही मांडणार आहोत; बिल्डरच्या, स्थानिक पुढाऱ्यांच्या फसवणुकीला बळी पडलेल्या सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे अनुभव!

‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा!’ ह्या म्हणीनुसार लाखो लोकांचा साक्षात भयंकर मृत्यू झालेला असताना आम्ही जर शहाणे होणार नसू तर आम्हाला वाचवण्यासाठी साक्षात परमात्मा, अल्ला, येशू, गौतम बुद्ध (कोणत्याही धर्माचा देव) येणार नाही. आम्हाला ह्या पृथ्वीवरच्या नरकातच खितपत पडावे लागेल. म्हणून पै पै साठवून त्यातून झोपडीचे मालक झालेल्या बांधवांनो तुम्ही त्या झोपडीत सुखाचा संसार करीत आहात, मुलांना शिकवत आहात, काबाडकष्ट करून तुम्ही तुमच्या वृद्ध आई-वडिलांना सांभाळत आहात! जर एकदा का डोक्यावरचं छप्पर गेले ही तुमच्या संसाराची-स्वप्नांची माती व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून बिल्डरशी करार करताना सावधान!!!

(क्रमशः)
-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page