८२ वर्षीय वृद्धाला भूमिहीन आणि निराधार करणारे बेकायदेशीर खरेदीखत रद्द करण्याची मागणी!
नांदगाव (विशेष प्रतिनिधी):- असलदे गावात ८२ वर्षीय वृद्धाची फसवणूक करून ठरलेली रक्कम न देता त्याच्यात जवळच्या नातेवाईकाने महसूल प्रशासनाला हाताशी धरून जमिनीचे बेकायदेशीर खरेदीखत तयार केले. सदर खरेदीखत रद्द करण्यात यावे; अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.
यासंदर्भात मिळालेले सविस्तर वृत्त असे की, असलदे गावातील एका वाडीत ८२ वर्षाचा वृद्ध एकटाच राहत होता. त्याच्या पत्नीचे आणि जवळच्या गावात असलेल्या एकमेव मुलीचे निधन पूर्वीच झाले आहे. त्या मुलीच्या मुलग्याने म्हणजेच त्या वृद्धाच्या नातवाने आपल्या आजोबांच्या बँक खात्यात थोडीशी रक्कम टाकून तिसर्या व्यक्तीला आजोबांची जमीन विकली आणि सर्व रक्कम हडप केली. त्यामुळे ती वृद्ध व्यक्ती सद्या नांदगाव तिठ्ठ्यावर बेवारस स्थितीत दुकानाच्या आडोशाला राहत आहे. जर त्या वृद्धाला जमिनीची सर्व रक्कम मिळाली असती तर ती वृद्ध व्यक्ती आपले शेवटचे आयुष्य सुखाने जगली असती. पण त्या वृद्ध व्यक्तीचा फसवणुकीमुळे पूर्णपणे आधारच निघून गेला आहे.
सदर वृद्ध व्यक्तीने गेल्या महिन्यात खरेदी खतावर कणकवली येथे जाऊन सह्या केल्या. त्या वृद्ध व्यक्तीची गावात फक्त सात गुंठे जमीन होती, त्या सर्व जमिनीचे खरेदीखत करण्यात आले व ती वृद्ध व्यक्ती पूर्णतः भुमीहीन झाली. कुठल्याही व्यक्तीची जमिनीचे खरेदीखत करण्यापूर्वी जमीन विकणारी व्यक्ती भूमिहीन होणार नाही ना? याची महसूल प्रशासनाला खात्री करावी लागते. पण ‘अर्थपूर्ण’ तडजोड करून महसूल प्रशासन एजंटांच्या नादी लागून अशाप्रकारे बेकायदेशीर खरेदीखत तयार करीत असतात. त्यातून हा गैर प्रकार घडला असून त्या वृद्धाला भूमिहीन करण्यात आलेले आहे. महसूल प्रशासनाने सदर खरेदीखत रद्द करावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली.
भूमिहीन झालेला हा ८२ वर्षीय वृद्ध व्यक्ती आज जमिनीची पूर्ण रक्कम न मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने निराधार झालेली असून त्याला कसलाच आसरा राहिलेला नाही. त्यामुळे नांदगाव तिठ्ठ्यावर ती आजारी वृद्ध व्यक्ती शेवटचे दिवस मोजत आहे. महसूल प्रशासनातील तलाठी, मंडल अधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी याची नोंद घ्यावी आणि खरेदीखत रद्दबातल करावे. तरच फसवणूक करणाऱ्या नातवाची बुद्धी ठिकाणावर येईल व बेकायदेशीर खरेदीखत तयार करणाऱ्या प्रशासनाला जाग येईल! अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.