गणेशोत्सवात कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणात अधिक सतर्क राहावे

प्रशासनालाही वैद्यकीय सुविधा वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई:- कोकणातल्या गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळे यांच्याकडून आपापल्या गावातला गणेशोत्सव सुरक्षितरित्या आणि आरोग्याचे कुठलेही विघ्न येऊ न देता पार पडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य अपेक्षित आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते आज रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेत होते.

गणेशोत्सवात मुंबई भागातून काही लाख नागरिक विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात आपापल्या परंपरागत घरी जाऊन उत्सव साजरा करतात.सध्या कोरोनाचा संसर्ग शहरी भागात जास्त दिसत असला तरी ग्रामीण भागातही तो दिसू लागला आहे. मुंबईजवळच्या रायगड जिल्ह्यात तो वाढतोय. त्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे अजूनही त्याचा प्रादुर्भाव नसला तरी गणेशोत्सव काळात नागरिकांची होणारी ये-जा पाहता प्रशासनाने पुरेपूर काळजी घ्यावी आणि दक्ष राहावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्या.

एकूणच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यांचे कटाक्षाने पालन सर्वांकडून झाले पाहिजे. मुंबईत आपण मोठ्या गणेश मंडळांशी बोलून त्यांच्या एकमताने यंदाचा उत्सव साजरा करण्याबाबत काही नियम ठरविले आहेत. कोकणातही त्याचे पालन होणे खूप गरजेचे आहे. प्रशासनाने या काळात चेक पोस्ट अधिक सतर्क करावेत. त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, आरोग्य कर्मचारी राहतील याची काळजी घ्यावी. गणेश मंडळांनीसुद्धा आपापल्या गावांत आरोग्य शिबिरे घ्यावीत, उत्सवाचे स्वरूप खूप साधे ठेवावे, गर्दी होणार नाही तसेच मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे तुमच्या भागात हा संसर्ग पसरणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

बेड्स, रुग्णवाहिका तयार ठेवा

रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी चाचणी प्रयोगशाळा सुरु झाली आहे. रायगडाची लवकरच कार्यान्वित होईल. त्यांच्या क्षमता वाढवता येतात का ते पाहण्याच्या तसेच या जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन बेड्स तसेच इतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढवाव्यात रुग्णवाहिका पुरेशा राहतील हे पाहावे जेणे करून गणेशोत्सवापर्यंत वैद्यकीय तयारी राहील असे ही मुख्यमंत्री म्हणाले.

गावोगावच्या दक्षता समित्यांनी या काळात सर्व गावकरी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे, स्वच्छतेचे पालन करताहेत का ते नियमित पाहावे तसेच जनजागृतीही करावी असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वपक्षीय नेत्यांनी देखील या उत्सवाच्या निमित्ताने शासनास सहकार्य करावे व सुरक्षितता राखण्याविषयी कोकण वासियांना आवाहन करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

१५ ऑगस्ट रोजी प्रयोगशाळा सुरु होणार

रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी सांगितले की, सध्या ३५०० रुग्ण उपचार घेत असून १९०० नागरिक घरीच विलगीकरणात आहेत. मागील काही दिवसांत दक्षिण रायगड भागात कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण औद्योगिक कामगारांमध्ये आढळले आहेत. पनवेल, महाड मध्ये अशीच परिस्थिती आहे. १० बिल्डींग विलगीकरण करण्यासाठी अधिग्रहित केली असून ५५०० आयसोलेशन बेड्स उपलब्ध करीत आहोत. प्रत्येक तहसीलमध्ये २०० बेड्सची कोविड सेंटरची सुविधा केली असून खासगी कंपन्यांना देखील विनंती केली आहे. ३५० बेड्ससाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालय तसेच १५० बेड्ससाठी डीवायपाटील रुग्णालय यांच्याशी करार केले आहेत. जिल्ह्याला अजून १५ व्हेंटीलेटर्स मिळाले आहेत.

१५ ऑगस्टपूर्वी एक प्रयोगशाळा रायगड जिल्ह्यासाठी उभी करणार असून सध्या १ हजार ते १२०० चाचण्या दिवसाला होतात ते ३ हजार पर्यंत नेणार आहोत.

रत्नागिरीत प्रत्येक गावात ग्राम कृती दल

रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, १०४९ पैकी ६६५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. एकूण ३६ मृत्यू आजवर झाले आहेत. १४९६ बेड्सची सुविधा केली आहे. २०० रुग्ण सध्या याठिकाणी दाखल आहेत.

१०० बेड्सचे महिला रुग्णालय लवकरच सुरु होणार आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी प्रयोगशाळेत २०० चाचण्या होतात अशी माहितीही त्यांनी दिली.

रत्नागिरीत प्रत्येक गावांत ग्राम कृती दल, नागरी कृती दल स्थापन केले आहेत तसेच जिल्ह्याच्या टास्क फोर्सच्या तीन बैठका झाल्या आहेत असेही ते म्हणाले

सिंधुदुर्गात चेक पोस्ट सज्ज

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी सांगितले की जिल्ह्यात सध्या २७० रुग्ण असून २७ जणांवर उपचार सुरु आहेत तर ५ मृत्यू झाले आहेत

जिल्ह्यात टास्क फोर्स काम करीत असून ३२ सार्वजनिक गणेश मंडळांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. शांतता कमिटीच्या बैठका झाल्या असून मुंबई सीमेलगत व इतर ठिकाणीही चेक पोस्ट तयार झाले आहेत. दीड लाख लोक जिल्ह्यात येण्याची अपेक्षा आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page