श्री रामेश्वर-श्री पावणाई देवीच्या असलदे गावात गैरधंदे नकोच!

१९९२ पासून मी माझ्या असलदे गावात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना विरोध करतोय. अगदी माझ्या पत्रकारितेची सुरुवात गावातील विकासाच्या बातम्यांपासून झाली. असलदे गावाच्या हितास बाधा आणणाऱ्या कृतींना विरोध करताना मला कोणाची साथ मिळेल किंवा नाही; ह्याचा मी कधीही विचार करीत नाही. माझ्या ह्या सततच्या रोखठोक भूमिकेमुळे चुकीच्या कामांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साथ देणारे माझी व माझ्याबरोबर असणाऱ्यांची नेहमीच बदनामी करतात; पण समोर येण्याची हिंमत दाखवीत नाहीत. चुकीला चूक म्हणण्याचे धाडस दाखविल्याशिवाय कुठल्याही गावाचा- समाजाचा खराखुरा विकास होणार नाही. मात्र गैरगोष्टी करणाऱ्या लोकांची संख्या बोटावर मोजण्याएवढी असली तरी त्यांचा प्रभाव गावातील निवडणुकीत किंवा फालतू राजकारणात दिसतो. गैरधंदे करणारे व मोठ्या प्रमाणात जमिनी विकून कमिशन खाणारे दलाल गेल्या १५-२० वर्षात गावाचे मुखिया बनले आणि माझ्यासारख्या गाव हितासाठी नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या व्यक्तींना संपविण्याचे कपटकारस्थान केले गेले. शेवटी उशीर झाला तरी सत्याचाच विजय निश्चित असतो. मी माझी भूमिका अगदी परमात्म्याला स्मरून प्रामाणिकपणे व निःस्वार्थीपणे मांडली. त्यामुळे मी मांडलेले मुद्दे, विचार कालांतराने सर्वांना समजतात; तोपर्यंत उशीर होतो आणि गावाचे नुकसानही होते.

दोन दिवसापूर्वी असलदे गावात अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी नेहमीप्रमाणे छापा मारला आणि गुन्हा दाखल केला. असलदे गावाच्या वेशीवर आणि असलदे गावात अवैध दारू व्यवसाय केला जातो. त्याचप्रमाणे असलदे गावात क्रेशर सुरु करण्यासाठी २०१६ मध्ये जमीन विकून दलाली खाल्ली गेली व क्रेशर सुरु करण्यासाठीही लाखो रुपये खाल्ले गेले. ह्या काळ्या पैशातूनच माझा तथाकथित पुढाऱ्यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव केला. त्या निवडणुकीत मी हरलो नाही तर गावाचा विकास हरला, गावातील आदर्श प्रामाणिक व्यक्ती-गावाचं भलं करण्यासाठी मला सहकार्य करणाऱ्या व्यक्ती निराश झाल्या! तरीही मी माझे काम सुरूच ठेवले. मात्र मला साथ देणाऱ्या लोकांना आजही कुठल्या ना कुठल्या कारणांनी त्रास दिला जातो. त्यांना त्यांच्या भावकीत, वाडीत हेतुपुरस्करपणे डावलण्यात येते; हे संतापजनक आहे. म्हणूनच मला पुन्हा पुन्हा कठोर भूमिका मांडावी लागते व मी स्वार्थी लांडग्यांच्या कळपाला न घाबरता गावाच्या हिताच्या गोष्टी मांडणारच!

असलदे गावात अवैध दारू व्यवसाय आणि क्रेशर होऊ नये; ही माझी ठाम भूमिका आहे. क्रेशरच्या बाबतीत गावाने ठोस भूमिका घेतली आणि गावात क्रेशर झाली नाही. मात्र प्रदूषण करणारा आरएमसी प्लांट मात्र उभा राहिला. कारण गावच्या पुढाऱ्यांनी अर्थपूर्ण तडजोड करून मी मांडलेल्या भूमिकेकडे दुर्लक्ष केले. आज त्याचे दुष्परिणाम गावातील ग्रामस्थ भोगताहेत. बाहेरच्या लोकांना जमिनी विकू नका; हा माझा आग्रह नेहमीच होता. जेव्हा त्याचे घातक दुष्परिणाम दिसू लागले तेव्हा बाहेरच्या लोकांना जमिनी न विकण्याचा योग्य निर्णय गावाने एकमुखाने घेतला. तोपर्यंत गावातील ८० टक्के मोक्याच्या जागांवर उपरे कधी आले ते समजलेच नाही. दलालांनी आपला `अर्थ’स्वार्थ साधला. अवैध दारू धंद्याबाबत अनेकदा लिखाण करूनही गावातून ठोस भूमिका घेतली जात नाही; ह्याचेच दुःख वाटते.

आतातरी आपण शहाणे होऊयात! संघटितपणे निर्णय घेऊयात! गावात अवैध दारू व्यवसायाबाबत ग्रामस्थांनी आता ठोस भूमिका घ्यायला हवी! नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आमचे गावातील तरुण मुंबई पुणे सारख्या शहरात जातात. तिथे राबराब राबतात. गावात राहणारे मेहनत -परिश्रम करून काजूचे उत्पन्न घेतात, मोलमजुरी-नोकरी व्यवसाय करतात. पण काहीजण ह्याच गावात अवैध दारू धंदे करून, दलाली करून करोडपती होत आहेत. हा गावाशी द्रोह आहे. अशा गावाशी बेईमानी करणाऱ्यांचा आणि त्यांना साथ देणाऱ्यांना माझे आवाहन आहे की त्यांनी कष्ट करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा. अन्यथा श्री रामेश्वर, श्री पावणाई देवीचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या काठीला आवाज नसतो; हे लक्षात ठेवावे.

गावात जी गैरकामं होतात त्यांना गावकऱ्यांनी संघटितपणे विरोध करायला पाहिजे. नाहीतर गावाची बदनामी होणारच आहे; शिवाय त्याचे दुष्परिणाम आमच्या पुढच्या पिढीवरही होणार आहेत. असलदे गावात दारू विक्री होऊ नये, क्रेशर होऊ नये, सरकारी कामात टक्केवारी घेतली जाऊ नये, गावातील जमिनी गावाबाहेरील लोकांना विकल्या जाऊ नयेत, गावात राजकीय पक्षीय राजकारण असू नये, गावात सर्वसामान्य लोकांवर अन्याय होऊ नये, गाव हितासाठी कार्य करणाऱ्या लोकांना विरोध होऊ नये, गावातील शासकीय कर्मचारी- शिक्षक आणि रेशन दुकानदाराने गैर वागू नये, `आमचा ठरला’ असं सांगून चार- पाच टकल्यांनी दादागिरी करू नये; असं मला नेहमी वाटतं आणि असे कामकाज गावातील सर्व चांगल्या व्यक्तींना अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी गावकऱ्यांनी ठोस भूमिका घ्यावी; अशी माझी इच्छा आहे! श्री रामेश्वर – श्री पावणादेवी माझी इच्छा पूर्ण करतील; ह्यावर माझा दृढविश्वास आहे; कारण माझी गावातील सर्व देवदेवतांवर श्रद्धा आहे!

असलदे गावात काही ठराविक व्यक्ती गैरधंदे व गैरव्यवहार विरोधी भूमिका घेतात. (त्यांची नावे मी मुद्दामहून इथे घेत नाही; कारण त्यांना गाव द्रोह्यांकडून उगाचचा त्रास नको!) त्यांचे मी मनापासून कौतुक करतो. त्यांच्या पाठीशी संपूर्ण गावाने राहिले पाहिजे; असं मला वाटतं. अशा व्यक्तींना जर ग्रामस्थांचे पाठबळ मिळाले तर गावाचा सर्वांगिण विकासाला चालना मिळेल!

माझ्या सर्व प्रिय ग्रामस्थांनो आपली प्रतिक्रिया मला नक्कीच कळवा!

-नरेंद्र राजाराम हडकर

ह्या संदर्भातील खालील लेख अवश्य वाचा!

`आरएमसी प्लान्ट’ म्हणजे काय रे भाऊ?

एकजुटीने असलदे गावावरील संकटाचा राक्षस मारा!

पोलीस आणि राजकीय वरदहस्तामुळेच नांदगावातील अनधिकृत दारूधंदा बंद होत नाही!

 

 

 

error: Content is protected !!