दिवंगत आमदार विठ्ठल (भाई) चव्हाण यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांच्या तत्व विचारांनी प्रेरित झालेला, भारावून गेलेला एक तरुण शिवसेना परळ शाखेच्या कार्यात रुजू झाला आणि अल्पावधीतच एक धडपडणारा, मेहनती कार्यकर्ता म्हणून नावारूपाला आला. आपले सहकारी, कार्यकर्ते यांचा विश्वास जिंकून सर्वांचा लाडका ‘ विठ्ठल `भाई’ झाला. कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली ते दिवंगत आमदार विठ्ठल (भाई) चव्हाण यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

शिवसेनेच्या परळ शाखेच्या कार्याबरोबरच स्टेट बँक ऑफ इंडियाची कामगार संघटना व स्थानीय लोकाधिकार समितीची जबाबदारी त्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा विठ्ठल `भाई’ साहेबांचा अत्यंत विश्वासू व लाडका होता. त्याच विश्वासाच्या बळावर भाईंनी १९८५ साली महापालिकेची निवडणूक जिंकून परळ शाखेच्या वैभवशाली परंपरेचा शुभारंभ केला. एक निष्ठावंत, प्रामाणिक, अभ्यासू व उत्कृष्ठ वक्ता अशी स्वतःची ओळख भाईंनी महापालिकेत निर्माण केली. नगरसेवक म्हणून भाई यश, प्रगती आणि लोकप्रियतेच्या शिखरावर होते; असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारकिर्दीच्या या सुवर्णकाळात भाईंनी परळ आणि आसपासच्या हजारो सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना स्टेट बँक, स्टेट बँक पतसंस्था, महापालिका, बेस्ट, टाटा हॉस्पिटल, कृषी बाजार समिती अशा विविध ठिकाणी नोकऱ्या मिळवून दिल्या. त्यांना जीवनात स्थिरता मिळवून दिली. त्यामुळे कोकणातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारली.

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजात जन्माला आलेले दिवंगत आमदार विठ्ठल (भाई) चव्हाण यांचा मूळ गाव देऊळवाडा मालवण! त्यामुळे क्षा. म. समाजातील अनेक बंधू भगिनींना त्यांनी नोकरीला ठेवताना विशेष प्राधान्य दिले. तर दुसरीकडे समाजातील अनेक तरुणांना शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात समर्थपणे पाठबळ दिले. क्षा. म. समाजाचे सुपुत्र राजकारणात यशस्वी नेतृत्व करून आदर्श निर्माण करू शकतो; हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.

१९९० साली विधानसभेची निवडणूक जिंकून भाईंनी आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आणि यश, प्रगती, लोकप्रियता यांच दुसरं नाव म्हणजेच विठ्ठल चव्हाण असं समीकरण परळ विधानसभेत निर्माण केलं. पण नशिबाची साथ लाभलेल्या भाईंचं यश काळाला रुचलं नाही. आजच्याच दिवशी क्रूर काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि आपल्यावर मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते, सहकारी व खुप मोठया मित्रपरिवारासाठी दुःख, वेदना, आठवणी मागे ठेवून विठ्ठल भाईंनी जगाचा निरोप घेतला.

भाईंबरोबर व्यतीत केलेल्या सुवर्णाक्षणांना उजाळा देत त्यांनी मिळविलेल्या यशाला, त्यांच्या वैभवशाली कारकिर्दीला आजच्या स्मृतिदिनी त्रिवार मानाचा मुजरा!

-राजकुमार नामदेव लोके