त्याग-समर्पणाचा `धर्म’ जपणाऱ्या वास्तुला शुभेच्छा!

आमचे मित्र सन्मानिय अनिल तांबे-असलदेकर यांनी बांधलेल्या नवीन वास्तुचा उदघाट्न व नामकरण सोहळा आज आहे. त्यासाठी आमच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! प्रत्यक्ष हजर राहून सन्मानिय अनिल तांबे-असलदेकर यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देण्याची इच्छा होती; पण शक्य झाले नाही. तरीही समाजसेवक आणि असलदे विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश डामरे, माझे वडील श्री. राजाराम हडकर व माझे जेष्ठ बंधू श्री. विजय ह्या कार्यक्रमास हजर राहणार आहेत आणि असलदे विकास मंडळातर्फे तसेच आम्हा कुटुंबियांच्यावतीने खूप खूप शुभेच्छा देणार आहेत.

अनिल तांबे-असलदेकर यांनी जुन्या वास्तुवरच नवीन वास्तु उभारली आहे. त्यामुळे त्या वास्तुचा `आत्मा’ तोच आहे, फक्त वरील आच्छादन बदललं! मी असं का म्हणतोय? कारण ह्या वास्तुत राहणाऱ्या व्यक्तींनी केलेले कार्य ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्याची इतिहासामध्ये नोंद आहे. हे आम्हा गाववाल्यांना माहित असेल-नसेल. पण आज त्याचा ओझरता उल्लेख मला करावासा वाटतो.

संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वातंत्र्यानंतर लगेचच मुंबई शहरात एक प्रचंड मोठी सभा झाली होती. त्या सभेचे नियोजन अनिल तांबे यांचे आजोबा धर्माजी तांबे यांनी केले होते. ही सभा प्रचंड यशस्वी झाली होती. त्या सभेसाठी झालेला खर्च – करण्यात आलेले नियोजन; याचे टिपण आजही अनिल तांबे यांच्याकडे आहे. त्यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माजी यांचे जाहीर कौतुक केले होते. त्याची नोंद आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या `मूकनायक’ ह्या वृत्तपत्रात सापडते. असलदे गावाच्या धर्मशाळेला (सध्याची शिवाजीनगर मधील प्राथमिक शाळा) सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली होती व जमलेल्या लोकांना मार्गदर्शनही केले होते. त्याचीही नोंद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या `मूकनायक’ ह्या वृत्तपत्रात आहे. त्यावेळीही धर्माजी तांबे यांनी पुढाकार घेऊन तो कार्यक्रम यशस्वी केला होता.

साठ-सत्तर वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये शेतकरी-शेतमजूर यांची खूप हलाखीची परिस्थिती होती. घरात सात-आठ किंवा त्यापेक्षा जास्त मुले असायची आणि अन्नधान्याचे उत्पन्नही खूपच कमी मिळायचे. पिकविलेले अन्नधान्य संपूर्ण वर्षभर पुरायचे नाही. एकवेळचे पोटभर अन्न मिळविण्याची कष्टकरी शेतकऱ्याची ओढाताण व्हायची. अशावेळी शेतकरी गावातील एखाद्या व्यक्तीकडून `सवायकी’ने भात उसनं घ्यायचा. भात पिकल्यानंतर ते परत द्यायचं. तशी व्यवस्था असल्याने किमान एक वेळचे अन्न तरी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पोटभर जेवायला मिळायचे. त्याकाळी धर्माजी तांबे यांच्या घरी खूप भात असायचे. धर्माजी तांबे आणि त्यांच्या धर्मपत्नी ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना भात द्यायचे. जे आठवणीने आणून देतील ते घ्यायचे; परंतु दिलेले भात आणून द्या; असं कोणालाही सांगायचे नाहीत. केवढी मोठी ही उदारता! धर्माजी तांबे हे शिस्तप्रिय होते. त्यामुळे ते सगळ्या नोंदी डायरीत करून ठेवायचे. त्यामुळे ह्या नोंदी आजही आपणास पाहावयास मिळतात.

समाजासाठी जगणारी माणसं ह्या वास्तुने जन्माला घातली म्हणूनच ह्या वास्तुचे मला खूप कौतुक वाटते. गरजूंना आपल्यापरीने मदत-सहकार्य करण्याची मानसिकता ह्या वास्तुमधील व्यक्तींमध्ये आहे आणि म्हणूनच ही वास्तु ऐतिहासिक आणि महत्त्वाची ठरते. त्याग आणि समर्पणाचा मजबूत पाया असलेल्या ह्या वास्तुचे आज उदघाटन व नामकरण सोहळा होत आहे. खऱ्या अर्थाने त्याग आणि समर्पणाचा `धर्म’ जपणाऱ्या वास्तुला समाजहिताचा विचार करणाऱ्या भिंती अनिल तांबे यांनी आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या आदर्शातून उभारल्या आहेत.

नुसत्या चार भिंती म्हणजे वास्तु नव्हे; त्या चार भिंती त्यागावर उभाराव्या लागतात आणि हा त्याग धर्माजी तांबे, त्यांचे सुपुत्र शामराव तांबे, नातू अनिल तांबे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला. शामराव तांबे असलदे गावचे सरपंच होते. या संपूर्ण ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या घटना ज्या वास्तूमध्ये घडल्या ती वास्तु आज नव्याने आपल्या समोर येत आहे. आजोबांच्या आणि वडिलांच्या विचारांचा आदर्श घेत अनिल तांबे सुद्धा आज पन्नास वर्षे समाज कार्य करीत आहेत. ते उत्तम वक्ते आहेत. प्रत्येकाने खूप खूप शिकावे अशी त्यांची विचारधारा असते आणि ज्यांना ज्यांना शिक्षणामध्ये आर्थिक अडचण उभी राहते तिथे तिथे अनिल तांबे समर्थपणे उभे राहतात. त्या विद्यार्थ्याला संपूर्ण सहकार्य करतात. आजपर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत, जे आज डॉक्टर झाले आहेत, इंजिनिअर झाले आहेत. काहींनी पीएचडीच्या डिग्र्या घेतल्या आहेत. ह्या वास्तुची हीच कमाल आहे. ह्या वास्तुने वैचारिक वारसा जपला आणि सामाजिक बांधिलकी जोपासली म्हणून ह्या वास्तुला आमच्यातरी दृष्टीने महत्त्व आहे.

आमचे मित्र अनिल तांबे-असलदेकर यांनी बांधलेल्या नवीन वास्तुच्या उदघाट्न व नामकरण सोहळ्यास पुन्हा एकदा शुभेच्छा!

-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page