संपादकीय- `प्रबोधन’च्या `वसंतश्री’चा जय महाराष्ट्र!

`वसंतश्री’चे संपादक वसंत तावडे यांना पाक्षिक `स्टार वृत्त’कडून भावपूर्ण श्रद्धांजली!

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक, निःस्वार्थी प्रकाशक, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक क्रियाशील सदस्य स्वर्गीय वसंत तावडे यांना विनम्र अभिवादन!

आमच्यावर हृदयस्थ प्रेम करणारे, नेहमीच आपुलकीने विचारपूस करणारे, पत्रकारितेच्या प्रवासात नेहमी साथ देणारे, आमचे मार्गदर्शक वसंत तावडे स्वर्गीय झाले. खूपच दुःखद बातमी! पण काळाच्या अधीन असलेल्या मानवाला हे सत्य स्वीकारावे लागते आणि पुढे जावे लागते. पुढे जाताना तावडे काकांसारख्या व्यक्तिमत्त्वाची छाप आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या आदर्शाची शिदोरी कधीच न संपणारी असते.

मी प्रेमाने त्यांना तावडे काका म्हणायचो. काकांशी माझी ओळख तशी खूप जुनी नाही; पण त्यांच्याशी झालेल्या पहिल्याच भेटीमध्ये त्यांचे आणि माझे ऋणानुबंध सहजपणे जुळले.

२१- २२ वर्षांपूर्वी एक दिवस सकाळी मला त्यांचा फोन आला. “मी वसंत तावडे `वसंतश्री’ चा संपादक बोलतोय! माझी तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. तुम्ही परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या प्रवचनाचे शब्दांकन अतिशय सुंदररित्या करता. तुमचे कौतुक करायचे आहे. तुम्हाला मी निश्चितच सर्व सहकार्य करीन!” मी पाक्षिक `स्टार वृत्त’मध्ये परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या प्रवचनाचे शब्दांकन प्रसिद्ध करायचो. त्यामुळे अनेकजण प्रभावीत व्हायचे. `स्टार वृत्त’ वर भरभरून प्रेम करायचे; त्यामध्ये तावडे काका होतेच. त्यांची माझी पहिली भेट प्रबोधन गोरेगाव येथे झाली. त्यानंतर ते मला अनेकवेळा घरी बोलवायचे, मी जायचो. गोरेगाव प्रबोधनमध्येही अनेकदा भेटायचो. ते मनापासून माझ्याशी बोलायचे. विचारांची देवाणघेवाण व्हायची. त्यांच्या बोलण्यातून- विचारांतून त्यांचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांवरील प्रेम व्यक्त व्हायचे. शिवसेनेवर त्यांची प्रचंड निष्ठा! `प्रबोधन’चे कार्य आणि कार्यरत असणारे सर्व सहकारी आणि विशेषतः सुभाष देसाई साहेबांवर त्यांचे विशेष प्रेम! हे मला नेहमीच जाणवायचे!

गिरगाव ते गोरेगाव असा प्रवास झाल्यानंतर समाजवादी विचारांचे त्यावेळचे हे सगळे तरुण बाळासाहेबांच्या भाषणांनी प्रेरित झाले आणि निष्ठेने शिवसेनेचे कार्य केले. त्यामध्ये तावडे काकांचा सहभाग निश्चितच उल्लेखनीय होता. बेळगाव महाराष्ट्र सीमावादावर शिवसेनेची भूमिका मांडणारे लेख एकत्रित करून ते पुस्तक रूपाने प्रकाशित करणारे तावडे काका प्रकाशक होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शुभहस्ते अनेक पुस्तकांचे प्रकाशनं त्यांनी संपन्न केली. त्यांना साहित्यिकाची उत्तम जाण होती. अनेक वर्षे `वसंतश्री’च्या माध्यमातून त्यांचे संपादकीय कर्तृत्व बहरले होते.

आवडीच्या आणि महत्त्वाच्या विषयांवर ते नेहमीच नोट्स काढायचे. वर्तमानपत्रातील कात्रणांची फाईल तयार करायचे. पुस्तकांमधील संदर्भ शोधायचे. त्यात त्यांचा अभ्यास फार दांडगा होता. एका जाणत्या संपादकांकडून हे मला शिकता आलं; हे माझं मी भाग्य समजतो. मी त्यांच्या घरी गेलो की ते नेहमीच म्हणायचे की, तुला आवश्यक व महत्त्वाची असणारी पुस्तके – ग्रंथ घेऊन जा! तुझ्या संग्रहात ठेव! हा त्यांचा आग्रह मला नेहमीच उत्साहित करायचा! `वसंतश्री’ असो की कोणतेही पुस्तक प्रकाशन असो की प्रबोधनचे कोणतीही कार्य असो; त्यासाठी त्यांची अपार कष्ट – मेहनत करण्याची सवय कौतुकास्पद होती.

एक आठवण म्हणून सांगतो; सिंधुदुर्गातून नारायण राणे शिवसेनेशी फारकत घेऊन काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर लगेचच मालवण विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. त्यावेळी माझ्या पाक्षिक `स्टार वृत्त’मध्ये एक लेख आला होता. `नारायण राणे यांना बिनविरोध निवडून द्या!’ अशा आशयाचा तो लेख होता. तो लेख वाचल्यानंतर त्यांनी मला फोन केला; म्हणाले, “तुम्ही त्यांच्या बाजूचा लेख छापला. आता आमची बाजूही प्रसिद्ध करा!” मी “हो!” म्हटलं. “पुढील अंकात चार पाने मी तुम्हाला देतो!” तावडे काकांनी लेख आणून दिले. ते आम्ही पुढील अंकात प्रसिद्ध केले. आम्ही पाक्षिक `स्टार वृत्त’मध्ये आर्थिक व्यवहारासाठी किंवा जाहिरातीसाठी लिखाण करीत नाही; हे त्यांना समजले. तावडे काकांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरलो. त्यामुळे ते पाक्षिक `स्टार वृत्त’च्या आणखी प्रेमात पडले. त्यानंतर गोरेगाव `प्रबोधन’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम झाला होता. तेव्हाही त्यांच्या आग्रहाखातर पाक्षिक `स्टार वृत्त’ने विशेषांक प्रसिद्ध केला होता. तावडे काकांनी आम्हाला अशापद्धतीने नेहमीच साथ दिली. ती विस्मरणात जाणार नाही.

त्यांना आवडलेलं पुस्तक प्रकाशित करणं असो की `वसंतश्री’ प्रकाशित करणं असो; हा काही त्यांचा व्यवसाय नव्हता. फक्त आणि फक्त त्यांना ते आवडत होतं. आणि आवडत असलेलं काम ते मनापासून करायचे. अगदी प्रेमाने करायचे. त्यामुळे ते नेहमीच बिझी राहायचे. त्यातून मला त्यांच्याकडे नेहमीच प्रामाणिकपणा दिसायचा.

तावडे काका आज आमच्यात देहरूपाने नाहीत; पण त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके असतील, ग्रंथ असतील, `वसंतश्री’चे अंक असतील; त्या रूपाने आमच्याबरोबर ते सदैव राहतील. म्हणूनच प्रबोधनच्या `वसंतश्री’चा जय महाराष्ट्र आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल!

-नरेंद्र हडकर
संपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’

You cannot copy content of this page