२५ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख… सावधान! कोकणवासीयच कोकण विकतोय!

भविष्यात कोकणचा विकास होणार आहे. पण आज कोकणवासीय कोकणातल्या जमिनी पैशाच्या आशेसाठी विकत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून त्यासाठी योग्य प्रचार होणे आवश्यक आहे. कोकणवासियांनी यासाठी आजच विचार करून भविष्य उज्वल करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

कोकणच्या विकासावर अनेक प्रकारे चर्चा करण्यात येत असते; पण आवश्यक असणाऱ्या गोष्टी करण्यात मात्र वेळ जातो. निवडणुकांपुरते कोकणच्या विकासाचे डमरू वाजविले जाते; असा आजपर्यंत कोकण विकासाच्या बाबतीत कोकणवासियांना अनुभव आहे. परंतु कोकणच्या विकासासाठी कोकणी माणूसही धडपड किती प्रमाणात करतो? हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. मात्र आज कोकणवासियच आपल्या हाताने कोकणच विकू लागला आहे. ही अतिशय गंभीर समस्या असून त्याची दखल प्रत्येक कोकणवासियांनी घेतली पाहिजे. अन्यथा कोकण हा कोकणी माणसांचा न रहाता भांडवलदार हे मालक होणार आहेत.

कोकण रेल्वे ही मुंबईपासून धावणार असून महाराष्ट्रासहीत अन्य तीन राज्यात समुद्र किनारपट्टीच्या समांतर जाणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या कोकणवासियांपेक्षा अन्य राज्यांना व देशालाही अतिशय फायदा होणार आहे. कोकण रेल्वेमुळे आज कोकणाला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. कोकणात जगप्रसिध्द हापूस आंबा होतो. ह्या हापूस आंब्याला जगभरातून प्रचंड मागणी आहे. त्याचप्रमाणे कोकणात किनारपट्टीवर मत्स्यपालन व्यवसाय जोर धरत असून या मत्स्यपालन व्यवसायातूनही लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. कोकणात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यास कोणतेही पीक येऊ शकते व कोकण कधीही कॅलिफोर्निया होऊ शकतो. कोकण आज विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावर येऊन उभा आहे; ही दूरदृष्टी कोकणवासिय सोडून अन्य सर्वांना आहे. म्हणून आज परप्रांतीय, मुंबईतील मोठे भांडवलदार, कोकणातील जमीन, फळबाग, मत्स्यव्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा घेत आहेत. त्यासाठी ते वाट्टेल तेवढी किंमत देत आहेत. हा व्यवहार लाखो, करोडो रूपयांचा होत आहे आणि कोकणवासिय पैशाच्या आशेने वडिलोपार्जित आपली जमीन विकत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे.

ज्याप्रमाणे मुंबई मराठी माणसांची होती. पण तिथे आज परप्रांतीयच आपल्याला सर्व क्षेत्रात वरचढ झालेला दिसत आहे आणि मराठी माणसांच्या मुंबईत मराठी माणूस त्यांच्या पुढे नोकरीसाठी उभा आहे. अशाचप्रकारे कोकणात परिस्थिती असून परप्रांतीयांनी विकत घेतलेल्या आमच्याच जमिनीत पोट भरण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे. हे प्रत्येक कोकणवासियांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

भविष्यात कोकणचा विकास होणार आहे हे निश्चित. पण त्या कोकणात कोकणी माणूस हवा की नको ? आज सर्वच बाबतीत कोकणी माणूस मागे आहे आणि कोकणी माणसाचा उद्या विकास होणार आहे. गरीब कोकणवासियांचा विकास होणे महत्वाचे आहे; परंतु कोकणात मोठमोठे प्रकल्प उभे राहतील, अनेक प्रकारे मोठे संशोधन होऊन हरितक्रांती होईल, फलोद्यान, मत्स्यपालन व्यवसायास जोर येईल. पण यात कोकणी माणसाचा सहभाग नसणार. कारण आज मोठ्या प्रमाणात दूरदृष्टी ठेवून जमिनी भांडवलदारांकडून घेतल्या जात आहेत आणि कोकणवासियांशिवाय झालेला विकास हा कोकणचा विकास ठरू शकेल काय ? असा आमचा प्रश्न आहे.

यासाठी सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनी, राजकीय पक्षांनी, वर्तमानपत्रांनी मोठ्या प्रमाणात कोकणवासियांना जागृत करणे गरजेचे असून कोकणातील एक इंच सुध्दा जमीन विकता कामा नये! असा प्रचार करणे महत्वाचे असून तळागाळातील लोकांना हे समजले पाहिजे. नाहीतर कोकणचे भविष्य अतिशय वाईट आहे.

कोकणातील जमिनी विकण्यासाठी काही राजकीय पुढारी, नेते, समाज कार्यकर्ते एजंटगिरी करत असताना आपल्याला दिसत आहे. ही दुर्दैवाची बाब आहे.
कोकण भविष्यात यशस्वी होणारा आहे व जगाच्या नकाशावर कोकणचे स्थान निश्चित होणार आहे. आणि अशा कोकणातील माणसांनी वर्तमानकाळ खडतर असला तरी कोकणातील जमिनी विकता कामा नयेत. आपल्या हातानेच आपण वाईट भविष्य घडवत आहोत. याची जाण प्रत्येक कोकणवासियांनी ठेवावी असे आमचे स्पष्ट मत आहे.

– नरेंद्र रा. हडकर

You cannot copy content of this page