मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई (मोहन सावंत):- मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीमध्ये माजी महापौरांनी प्रवेश केल्यामुळे पक्षाला अधिक बळकटी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्मला सामंत-प्रभावळकर यांचा पक्ष प्रवेश झाला.

निर्मला सामंत यांच्या प्रवेशाने पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत अधिक बळकटी मिळेल असा, विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला. त्यावेळी पक्षाच्या अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या मान्यतेने निर्मला सामंत यांची मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार विद्या चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, अर्बन सेल प्रदेश सेक्रेटरी सुरेश पाटील, माजी नगरसेविका अल्पना पेंटर आदी मान्यवर उपस्थित होते.