मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद ठेवा! सिंधुदुर्ग काँग्रेसची आक्रमक मागणी
कणकवली:- मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अद्याप अपूर्ण असताना ओसरगाव येथे टोलवसुली सुरू करण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली करू नये, तसेच ओसरगाव येथील टोलनाका जिल्ह्याच्या सीमेवर स्थलांतरित करावा, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली-कुडाळ-सावंतवाडी-बांदा मार्ग गोव्याला जोडला जातो. या महामार्गाचे काम अद्याप अनेक ठिकाणी अपूर्ण असून काही भागात रस्त्याची दुरवस्था असल्याचा दावा सिंधुदुर्ग काँग्रेसने केला आहे. अशा परिस्थितीत वाहनचालकांकडून टोलवसुली सुरू करणे अन्यायकारक असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
ओसरगाव येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलनाका उभारला असून लवकरच टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी टोल व्यवस्थापन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. टोलवसुली सुरू करण्याचे कारण विचारले असता संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता केवळ ‘ट्रायल’ असल्याचे सांगितल्याचा दावा काँग्रेसने केला. यानंतर १८ ऑगस्ट रोजी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला पूर्वसूचना देत ओसरगाव टोल कार्यालयात जाऊन टोलवसुलीबाबत चर्चा केली. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार महामार्गावरील अनेक ठिकाणी अद्याप कामे अपूर्ण असून काही भागांत वाहतूक व्यवस्थेची गैरसोय होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अरविंद मोंडकर, आतिष उर्फ भाई जेठे, प्रकाश जैतापकर, देवानंद लुडबे, बाळू मेस्त्री, जेम्स फर्नांडिस, महेश परब, सरदार ताजर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिष्टमंडळाने पोलीस प्रशासन तसेच टोल व्यवस्थापनाला निवेदनही दिले.
दरम्यान, टोल व्यवस्थापनाने सध्या टोल सुरू करणार नसल्याचे तोंडी सांगितले होते; मात्र त्यानंतर टोलवसुली सुरू झाल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. टोल व्यवस्थापनाने लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर आणि उपाध्यक्ष आतिष उर्फ भाई जेठे यांनी केली. महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोलवसुली न करण्याच्या मागणीवर काँग्रेस ठाम असून, प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे आता वाहनचालक आणि जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.










