अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार यादीत नाव नोंदणीचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : जिल्ह्यातील 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांनी व अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसलेल्या सर्व पात्र नागरीकांनी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विहित नमुन्यातील अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासह आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत भारत निवडणुक आयोगाने दिनांक 1 जून 2023 ते दिनाक 16 ऑक्टोंबर 2023 पर्यंत पूर्व पुनरिक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच अंतिम मतदार यादी दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध होणार आहे. दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र होणार आहेत. विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अथवा आपण अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसेल अशा नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदवता येणार आहे.

नागरीकांनी आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी https:/ceoelection.maharashtra.gov.in/search या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा Voter Helpline App या मोबाईल अँप चा वापर करावा. तसेच, यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेली मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे दिनांक 21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023 या दरम्यान घरोघरी भेटी देणार आहेत. यावेळी मतदार नोंदणी न झालेले पात्र नागरीक संभाव्य मतदार, मयत कायमस्वरूपी स्थलांतरीत व अस्पष्ट फोटो असणारे मतदार यांची पडताळणी करून नमुना अर्ज 6 किंवा नमुना अर्ज 7 किंवा नमुना अर्ज 8BLO app द्वारे भरणा करून मतदारयादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी तसेच मतदार यादीचे अद्ययावतीकरण करणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय सहायक (BLA) यांना नियुक्तीबाबत आवाहन यापूर्वीच करण्यात आलेले आहे. SSR 2024 च्या कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत व तालुका स्तरावरील मतदान मदत केंद्र येथे नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज स्विकारले जातील. तसेच ऑनलाईन माध्यमातून मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी किंवा आपल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपणास Voter Helpline App (Mobile App). https://voterportal.ecl.gov.in संकेतस्थळाला भेट देता येईल.

You cannot copy content of this page