अनिता पाध्ये यांच्या ‘प्यार जिंदगी है’ पुस्तकाचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न!
मुंबई:- जेष्ठ सिने पत्रकार व लोकप्रिय लेखिका अनिता पाध्ये यांच्या ‘प्यार जिंदगी है’ या नव्या मराठी पुस्तचे प्रकाशन मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ‘व्हॅलेन्टाईन्स डे’चे औचित्य साधून अनौपचारिक पद्धतीने करण्यात आले. या विशेष सोहळ्याला सौ. शर्मिला राज ठाकरे, मनसेचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर तसेच लोकप्रिय संगीतकार जतिन पंडीत (जतिन-ललित), `एबीपी माझा’चे वरिष्ठ संपादक श्री. राजीव खांडेकर, बाॅम्बे, रंगीला, हम दिल दे चुके सनम, हिरोपंती २ आदि चित्रपटांचे सुप्रसिद्ध गीतकार श्री.मेहबूब आलम कोतवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनिता पाध्ये यांच्या ‘प्यार जिंदगी है’ या पुस्तकाविषयी बोलताना म्हणाले, “अनिता पाध्ये यांची पुस्तके मी वाचली आहेत. त्यांचं लिखाण अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीतलं असल्याने पुस्तक संपूर्ण वाचल्याशिवाय ठेवलं जात नाही. हे पुस्तकही त्याच दर्जाचं असेल, मी वाचल्यानंतर त्यावर माझा अभिप्राय देईन, या पुस्तकासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा”
लेखिका अनिता पाध्ये म्हणाल्या की, ‘राज ठाकरे यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. त्यांच्या शुभहस्ते प्रकाशित झालेल्या माझ्या सर्व पुस्तकांना लोकाश्रय मिळविला आहे. त्यांच्याकडून माझ्या साहित्यकृतींचे प्रकाशन व्हावे; ही माझी कायम इच्छा असते. आज ते प्रचंड व्यस्त असूनही हा सोहळा ‘शिवतीर्थ’वर करण्यासाठी मला परवानगी देऊन माझ्या ‘प्यार जिंदगी है’ पुस्तकाचा आणि माझ्या लेखनकलेचा सन्मान केला आहे.
‘प्यार जिंदगी है’ या पुस्तकात १२ लोकप्रिय हिंदी रोमॅन्टिक चित्रपटांचा निर्मिती प्रवास असल्याने व्हॅलेंटाइन डे चे औचित्य साधून पुस्तकाचा अनौपचारिक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी दिलवाले दुल्हनिया ले जायंगे मधील एक गाणे संगीतकार जतीन यांचे चिरंजीव राहुल यांनी गाऊन सर्वांची वाहवा मिळविली.
चित्रपटांशी नाळ जोडलेल्या भारतीय प्रेक्षकांना रोमॅन्टिक चित्रपट फार जवळचे आहेत. ज्यांचं प्रेम सफल झालेलं असतं ते तर रोमॅन्टिक चित्रपटांमधील नायक-नायिकांशी, रुपेरी पडद्यावरील त्यांच्या प्रेमाची आपल्या प्रेमाशी साधर्म्य शोधत असतात. तर ज्यांचं प्रेम विफल झालं असतं; असे प्रेक्षक प्रेमपटातील सफल प्रेम पाहून आपल्या दु:खी मनावर फुंकर घालत असतात. अनिता पाध्ये यांचे नवं मराठी पुस्तक ‘प्यार जिंदगी है’ मधील चित्रपटांच्या सुरस कथाप्रवास गुंतून जातील.
‘देवदास’, ‘आराधना’, ‘बाॅबी’, ‘एक दूजे के लिए’, ‘तेरे घर के सामने’, ‘कभी कभी’, ‘अनुपमा’, ‘छोटी सी बात’, ‘आशिकी’, ‘कयामत से कयामत तक’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘हम दिल दे चुके सनम’ आदी १२ लोकप्रिय हिंदी चित्रपटांचा निर्मिती प्रवास, या चित्रपटांची वैशिष्ट्य, सामाजिक मूल्य, हे चित्रपट बनत असताना घडलेल्या अनेक खऱ्या आणि रंजक घटना ‘प्यार जिंदगी है’ मध्ये वाचायला मिळतील. ३२७ पाने आणि दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्रे व रेखाचित्रांमुळे हे आणखी मौल्यवान झाले आहे.