कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची व विधवांची नोंदणी होणार

वारस नोंदणीसाठी विधवा तसेच पालक गमावलेल्या मुलांची गावनिहाय यादी द्यावी !

– निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांबाबत तसेच विधवांचे वारस नोंदणीसाठी गाव निहाय, तालुका निहाय यादी द्यावी. तहसिलदारांच्या माध्यमातून वारस नोंद केली जाईल, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केली.

            कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव डी.बी. म्हालटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता बढे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन काळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना शिरदावडे, महिला अत्याचार निवारण कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे आदी उपस्थित होते.

            जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी आढावा दिला. जिल्ह्यामध्ये एक पालक मयत बालके 233  असून दोन्ही पालक मयत बालके 14 असे एकूण 247 बालके आहेत. 568 विधवा असून 250 गृहभेटी पूर्ण झाल्या आहेत. अनाथ प्रमाणपत्रासाठी 14 प्रस्ताव उपआयुक्तालयाकडे सादर करण्यात आले आहेत. या पैकी 8 प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत संबंधित बालकांची पोस्टात खाती उघडण्यात येत आहेत.

            निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड म्हणाले, अगंणवाडी सेविका, पर्यावेक्षिका यांनी गृह भेटी देऊन विधवांबाबतच्या केलेल्या कार्यवाहीचा अहवाल द्यावा. बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी प्राधान्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विविध लाभ देण्याबाबत तहसिलदार कार्यालयाकडे पाठपुरावा करावा. पालक गमावलेल्या बालक आणि विधवा यांना सर्व प्रकारचे शासकीय लाभ देण्यासाठी प्रत्येक विभागाने प्राथम्याने कार्यवाही करावी. यासारखे पुण्याचे काम दुसरे नाही, असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page