जोगेश्वरी (प.) बेहरामबाग रोडवर प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे कायमची वाहतूक कोंडी!

एस. व्ही. रोड सिंग्नल ते काजूपाडा सिंग्नल दरम्यान बेहरामबाग रोडवरील अनधिकृत दुकानदार, फेरीवाले, अनधिकृत पार्किंग व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्याची जनतेकडून मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी):- महानगरीत अनेक रस्त्यांवर पादचाऱ्यांनी कुठून चालावे आणि वाहने कुठून चालवावी? असे प्रश्न नेहमीच मुंबईकरांना सतावत असतात. अनेक रस्ते आणि फुटपाथ दुकानदार-फेरीवाले अडवितात; तसेच अनधिकृत पार्किंग करून वाहन चालक बिनधास्त राहतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना विनाकारण प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं. ह्या समस्येकडे वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस, आरटीओ आणि महानगरपालिका प्रशासन नेहमीच `अर्थपूर्ण’ तडजोडीने मूग गिळून गप्प बसण्यात धन्यता मानते. ह्याची अनेक उदाहरणे मुंबईत पाहावयास मिळतात. अशीच समस्या वर्षानुवर्षे जोगेश्वरी पश्चिम येथील बेहरामबाग रोडवर पाहावयास मिळते. एस. व्ही. रोड सिंग्नलपासून बेहरामबाग रोड सुरु होतो तो अगदी काजूपाडा सिंग्नल पर्यंत!

प्रशासनाने खालील लिंकवरील व्हिडीओ पाहिल्यास सदर रोडवर वाहतूक कोंडी का होते? ह्याचे वास्तव चित्रण पाहावयास मिळेल.

दुकानदार फुटपाथवर आणि फेरीवाले रस्त्यावर:-
ह्या बेहरामबाग रस्त्यावर दोन्ही बाजूला दुकानदारांनी आपली दुकाने फुटपाथवर थाटली आहेत. तर काही ठिकाणी फुटपाथवर अनधिकृत दुकाने मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहेत. त्यामुळे शेकडो फेरीवाले वाहनांसाठी असणारा रस्ता बिनधास्त अडवितात. दुकानदार फुटपाथवर आणि फेरीवाले रस्त्यावर अशी परिस्थिती नेहमीच पाहावयास मिळते. त्यामुळे ह्या रस्तावर नेहमीची `ट्रॅफिक जाम’ होते. ह्या रस्त्यावरून पादचाऱ्यांनी चालायचे कसे आणि वाहने चालवायची कशी? हा प्रश्न सर्वांना पडतो. हा एक हजार मीटर (एक किमी) रस्ता बसने पार पाडायचा असल्यास अर्धा ते पाऊण तास लागतो.

नियमांचे उल्लंघन करणारी अवैध रिक्षा वाहतूक:-
त्यामध्ये परवाना नसलेल्या शेकडो ऑटो रिक्षा शेअरिंगने प्रवाशांची ने-आण करीत असतात. ते ऑटो रिक्षा वाहकही उलट दिशेने रिक्षा चालवित असतात. शिवसाई मंदिराकडे आणि बेहरामबागच्या नाक्यावर रस्ता अडवून रिक्षा पार्किंग करतात. शिवसाई मंदिर (काजूपाडा) ते जोगेश्वरी स्टेशन दरम्यान वाहन चालविण्याचा परवाना नसताना, पासिंग न केलेल्या रिक्षा, फिटनेस नसलेल्या रिक्षा शेअरिंगने प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात करीत असतात.

महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष:-
अधिकृत दुकानाच्या बाहेर एखादी खुर्ची, झाडाची कुंडी किंवा दुकानाचे बोर्ड लावल्यावर कारवाई करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाची करडी नजर बेहरामबाग रोडवर का जात नाही? अनधिकृत दुकानदार, बेजबाबदार फेरीवाले यांच्यावर एक दोन वर्षाने दोन तीन तासाची कारवाई करून वर्षानुवर्षे दुर्लक्ष का करण्यात येते? असे संतप्त सवाल येथील जनता विचारात असते. पण महानगरपालिका प्रशासन अशा बेकायदेशीर गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानते; ह्याचा `अर्थ’ लोकांना सहजपणे समजून येतो.

आरटीओ खात्याचे अस्तित्वच नाही:-
नियमांचे उल्लंघन करणारी अवैध रिक्षा वाहतूक ह्या रस्त्यावरून होत असते. मात्र आरटीओ प्रशासन ह्याकडे कधीच लक्ष देत नाही. वर्षातून कधीतरी दिखाऊ कारवाई करायची आणि सोपस्कार पूर्ण करायचे; असे धोरण असल्याने जीविताला धोका निर्माण करणारी अवैध प्रवासी वाहतूक सर्रास होते. ह्या ठिकाणी आरटीओ प्रशासनाने नियमितपणे कारवाई करून जनतेला दिलासा द्यावा; अशी मागणी सातत्याने होत असते.

वाहतूक पोलिसांचा आशीर्वाद:-
ह्या रस्त्यावर अनेक ठिकाणी दुकानदारांनी, अनधिकृत दुकानदारांनी आणि काही फेरीवाल्यांनी दुचाकी वाहनांची कायमस्वरूपी पार्किंग करून ठेवली आहेत. आपल्या दुकानासमोर जागा मोकळी ठेवण्यासाठी व्यावसायिकांच्या ह्या युक्तीने नेहमीच ट्राफिक जाम होते. मात्र वाहतूक पोलीस मात्र वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अशा वाहनांवर कारवाई का करीत नाही? ज्याअर्थी दोषींवर कारवाई होत नाही त्याअर्थी वाहतूक पोलिसांचा `अर्थपूर्ण’ आशीर्वाद दोषींना मिळालेला असतो का? असा सवाल निर्माण होतो.

स्थानिक पोलिसांकडून कारवाई नाही:-
खरे तर एकाच रस्त्यावर अशाप्रकारे नेहमीच लोकांना त्रासाला सामोरं जावे लागत असताना स्थानिक पोलीसही दुर्लक्ष करत जणूकाही दोषींना पाठीशी घालत असतात. ह्या रस्त्यावर महात्मा गांधी स्कुललगत पोलीस चौकी असूनही त्या चौकीला लागून किमान २०० मीटर परिसरात जरी नियमांची अंमलबजावणी केली तरी काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होऊ शकते. पण स्थानिक पोलीस दरदिवशी ह्या रस्त्यावर सायंकाळी विशेषतः रविवारी (आठवडा बाजाराचा दिवस) चारचाकी वाहन घेऊन प्रत्येक दुकानासमोर थांबत थांबत का जातात? हे समजायला मुंबईकर जनता काही दूधखुळी नाही. स्थानिक पोलिसांनी ही समस्या गंभीरतेने समजून घेऊन त्वरित कारवाई करावी; अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीकडे बोलताना केली आहे.

बेहरामबाग रोडवर प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे कायमची वाहतूक कोंडी होते. त्यातून अनेक छोटे मोठे अपघात होत असतात. अशा परिस्थितीत जर आपत्कालीन संकट आल्यास कोण जबाबदार असेल? हा महत्वाचा प्रश्न आहे. ह्यासंदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्ते संघटीत होत असून जर प्रशासनाने उचित कारवाई न केल्यास न्यायालयात जाऊन दाद मागण्याची तयारी ते करीत आहेत.

(संबंधित यंत्रणेला ट्विटरच्या माध्यमातून सदर बातमी पाठविली आहे. त्याची खाली लिंक दिली आहे.)