असलदे सोसायटीची बिनविरोध निवडणूक- राजकीय पक्षांचा पराभव?

कणकवली (प्रतिनिधी):- तालुक्यातील असलदे गावात पाच वर्षांपूर्वी झालेली सोसायटीची निवडणूक अद्यापही स्मरणात असताना यावेळी मात्र सोसायटीची बिनविरोध निवडणूक झाली असून राजकीय पक्षांचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

असलदे सोसायटीच्या १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. गावाचे राजकीय वातावरण खेळीमेळीचे राहिले. असे चित्र उभं करण्यात गावातील राजकीय पुढारी यशस्वी ठरले. सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याने असलदे गावात शिवसेना- भाजप हे प्रमुख पक्ष हरले. पक्षाच्या जिल्हापातळीवरील नेत्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. राजकीय चढाओढ करणारे गावातील राजकीय पुढारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध कशी काय करू शकतात? ही सोसायटी आता शिवसेनेच्या ताब्यात आहे की भाजपच्या? ह्या प्रश्नांची उत्तरं आज उद्या मिळतीलच. पण आजतरी असलदेमध्ये शिवसेनेचा आणि भाजपचा पराभव झाला; असं ग्रामस्थांचे म्हणणं आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न शिवसेना व भाजप पक्षाच्या जिल्हापातळीवरील नेत्यांनी केला; तर आपले कार्यकर्ते पक्षाशी कसे वागतात? हेही सहजपणे लक्षात येईल.

शिवसेनेचा एक नेता गावामध्ये येतो आणि निवडणूक बिनविरोध होते. भारतीय जनता पार्टीला नेमकं कोणतं गाजर दाखविण्यात आलं? कुठलाही पक्ष सोसायटीचे अध्यक्षपद आणि ग्रामपंचायतीचे सरपंचपद सोडणार नाही. असं असताना भारतीय जनता पार्टीने सहजासहजी सोसायटीचे अध्यक्षपद कसं सोडलं? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. थोड्याच दिवसांनी जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. ती निवडणूकसुद्धा असलदे गावाचा आदर्श समोर ठेऊन बिनविरोध करावी; असंही एका जाणकाराने आपलं मत नोंदविलं.

You cannot copy content of this page