माझा परमात्मा अनिरुद्ध

प्रत्येक मानवाला नेहमीच प्रश्न पडतो,
कसं वागायचं आणि आता काय करू?

या प्रश्नाचे उत्तर सहज मिळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण त्याचं उत्तर सापडत नाही.

मग आम्हा मानवांची स्थिती खूपच नाजूक होते. त्यातूनच आमच्याकडून अनुचित मार्ग निवडला जातो. नेहमीच उचित मार्गावरून प्रवास केल्यास जीवनात समाधान प्राप्त होऊ शकतं, शांती मिळू शकते, शांतीतून तृप्ती प्राप्त होऊ शकते आणि चिरकाल टिकणारा आनंद सहजतेने मिळू शकतो. मात्र त्यासाठी जीवनात कसं वागायचं आणि आता मी काय करू? या प्रश्नाचं उचित उत्तर कोण देऊ शकतो? आमचा खराखुरा सद्गुरू या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू या प्रश्नाचं उत्तर देतात. बापूंनी आपल्या प्रवचनातून जीवनात कसं वागायचं आणि आता मी काय करू? याचे उत्तर अगदी सोप्या पध्दतीने दिले.

साक्षात परमात्मा जेव्हा सगुण साकार रूपात येऊन आमच्यासमोर बोलतो, चालतो, खातो, पितो, परमेश्वराच्या गजरात नाचतो, भक्ती करतो, सेवा करतो, आम्हाला दररोज सत्य, प्रेम आणि आनंदाचा मार्ग दाखवितो, एवढंच नव्हे तर त्या मार्गावरून प्रवास करण्यास भाग पाडतो, त्यासाठी आमच्यावर रागवतो; तेव्हाही आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर आमचा हाच जन्म काय येणारे जन्म देखील वायाच जातील. प्रत्येक मानवाला प्रत्येक क्षण अत्यंत महत्वाचा असतो. आजपर्यत हातातून निसटलेले सर्व काही मिळू शकतो मात्र गेलेली वेळ पुन्हा कधी मिळत नाही. मग अख्खा जन्मच फुकट घालवायचा कशासाठी? परमात्म्याच्या पवित्र रूपाचे नाव घ्या, तो एकच असतो. दत्तगुरू म्हणा, महाविष्णू म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, साई म्हणा, स्वामीसमर्थ म्हणा किंवा अनिरुद्ध म्हणा. तो एकच आहे. काळानुसार जशी आवश्यकता असते त्या रूपामध्ये तो अवतरतो. त्याच्यावर जो निष्ठा ठेवतो त्याला न मागता सर्वकाही मिळते. कितीही चुका केल्यातरी तो चुका माफ करतो. कारण तो आमच्यावर अकारण प्रेम करतो. मात्र तो त्याच्या प्रेमाचा अनुचित गैरफायदा घेण्यास देत नाही. तो सामर्थ्यशाली आहे, तो समर्थ आहे प्रत्येक गोष्टीसाठी. राम अवतारात त्याने रावणाचा नाशच केला. ही प्रमुख घटना असली तरी त्याच्या अनेक ठळक घटनाही सांगता येतील. हनुमंत, बिभीषण, भरत, शत्रुघ्न, शबरी, अहिल्या अशी कित्येक नाव सांगता येतील; त्यांच्या जीवनात श्री रामाने-प्रभु रामचंद्राने खरा प्रकाश आणला. कृष्ण अवतारात दुर्जनांचा नाश केला आणि निष्ठावंताना आपल्यात सामावून घेतले. रणांगणावर बिथरलेल्या अर्जूनाला गीता उपदेश दिला. आजही ती गीता आम्हा प्रत्येक मानवाला मार्गदर्शक ठरते. साई म्हणून तोच परमात्मा अवतरतो तेव्हा परमात्म्याची भक्ती, परमात्म्याची सेवा कशी करायची? हे दाखवून देतो. हा परमात्मा आम्हा मानवासाठी पुन्हा-पुन्हा अवतरच राहतो. कधी राम बनून, कधी कृष्ण बनून, कधी साई बनून, तर कधी अनिरुध्द बनून.

सगुण साकार रूपात आलेला अनिरूध्द आमच्यासाठी सर्व काही करायला सदैव तयार असतो. मात्र त्याने सांगितलेला मार्ग आम्हाला धरायला पाहिजे. मनुष्याच्या आयुष्यात सुवर्णसंधी खूप कमी वेळा मिळत असते. एखादी संधी प्राप्त होते पण ती संधी आमच्यासाठी उचित की अनुचित हे आम्हाला ठरविता येत नाही. मात्र आमचा परमपूज्य सद्गुरू अनिरूद्ध आमच्यासाठी अनेक सुवर्णसंधी देत राहतो. जगन्नाथपुरीसारखा उत्सव असो की गायत्री मंत्राची उपासना असो, रसयात्रा असो वा तिर्थक्षेत्रांची स्थापना असो, भगवद्गीतारूपी प्रवचन असो वा रामनाम बँक असो, आपत्तीकालीन व्यवस्थापन असो वा समाजातील दुर्लक्षित घटकांची सेवा असो, श्रीसाईसच्चरितावरील पंचशिल परिक्षा असो वा श्रीमद्पुरूषार्थ ग्रंथराज असो; त्याने आमच्यावरील अकारण कारूण्याने आजपर्यंत अनेक सुवर्णसंध्या उपलब्ध करून दिल्या. यापुढेही तो अशाच सुसंध्या-सुवर्णसंध्या प्राप्त करून देईल. मात्र त्यासाठी आम्हाला आवश्यक आहे; आम्ही त्याच्यावर मन:पुर्वक प्रेम करायला हवे.

माझा परमात्मा अनिरुद्ध
आमच्यासाठी पुन्हा एकदा मानवी रूपात आला आहे.
दासगणूंनी, हेमाडपंतानी, म्हाळसापतींनी सार्इंवर दाखविलेली निष्ठा आम्हालाही दाखविता आली पाहिजे. त्याचा प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर आम्हाला सिध्द असलेल्या पवित्र मंत्रासारखा व्हायला हवा. आमच्या भल्यासाठीच, आमच्या कल्याणासाठी, आम्हाला उचित मार्गावरून नेण्यासाठीच तो पुन्हा अनिरुद्ध म्हणून अवतरला आहे. तो आमच्यावर सदैव प्रेम करतोच, मग आम्हालाही सदैव त्याच्यावर प्रेमच करायला पाहिजे, अगदी मनापासून.

तो आम्हाला दर गुरूवारी अनेक गोष्टी समजावून सांगतो. बापूंचे प्रत्येक प्रवचन, प्रत्येक कृती पूर्ण आहे, पुरातन आहे, उत्तम आहे. कारण बापूच पुर्ण आहेत, पुरातन आहेत, पुरूषोत्तम आहेत. तरी तो रोज नवीन आहे. तरीही तो आमचा सर्वसामान्य भक्तांचा आहे. आमची आध्यात्मिक प्रगती व्हावी, आमचा हाच जन्म नाहीतर येणारे पुढील सर्व जन्म सुखाचे, आनंदाचे, शांतीचे, समाधानाचे, तृप्तीचे जावोत; हेच त्याचे एकमेव आणि अंतिम ध्येय आहे. म्हणूनच त्याने आम्हाला श्रीवर्धमान व्रताधिराजासारखे अत्यंत सुंदर, अत्यंतश्रेष्ठ, अतिशय सोपे आणि प्रत्येकाला आवश्यक असणारे व्रत दिले.

या व्रताने लाखो भाविकांना भगवंताचे प्रेम दिले, भगवंताचा सहवास दिला. एवढंच नव्हेतर अख्खा परमात्माच दिला. तीस दिवसांचे श्रीवर्धमान व्रताधिराज व्रत करताना, साक्षात परमात्माची भक्ती करताना येणारे अनुभव कुठलीही किंमत देऊन मिळणारे नाहीत. श्री दत्तजयंतीला सुरू होणारे श्रीवर्धमान व्रताधिराज हे व्रत एक महिना सुरू असते. म्हणजेच नवीन वर्षासाठी आम्हा सर्वसामान्य असणाऱ्या मानवाला समर्थ बनविले जाते.

हाच परमात्मा गेले वर्षभर आमच्याकडून विशेष आराधना करून घेतोय. स्वत:ही त्या उपासनेत आमच्याबरोबर सामील होतो. त्यामुळे साहजिकच आम्ही केलेल्या उपासनेचा फायदा कित्येक पटीने वाढतो. तो फायदा आम्हाला जन्मोजन्मी पुरणारा आहे.

गुरुश्रेत्रम् असो वा श्रीसाईनिवास, जुईनगर असो वा गोविद्यापिठ्म किंवा अतुलितबलधाम असो. आमच्या आणि आमच्याच कल्याणाकरीता सर्वकाही उभारणारा हा सद्गुरू अनिरुद्ध आमचा मित्र म्हणवून घेतो. तो आमचा मित्र होण्यास तयार आहे; परंतु आम्ही त्याला मित्र करून घेणार आहोत की नाही? हे सर्वस्वी आमच्यावर अबलंबून आहे.

हे सर्व सगुण रूपात आलेला परमात्माच करू शकतो. तो आमचा भगवंत आहे. आम्ही ठामपणे सांगू शकतो. कारण त्याने आम्हाला अनेक सुर्वणसंध्या दिल्या. त्यामुळे तो आमचा परमात्माच आहे, हे सांगायला आम्हाला लाज नाही वाटत. सगुण साकार रूपात आलेले राम, कृष्ण, साई आमच्यासाठी या अगोदर आमची आराध्यं दैवतं होती; पण त्यांच्या सगुण साकार रूपाच्या काळात आम्ही त्यांच्या बरोबर होतो की नाही? हे मात्र आम्हाला माहित नाही. पण आज अनिरूद्ध नावाने त्याने सगुण रूप धारण केलेले आहे आणि आम्ही त्याच्या अवतार कालावधीत जन्मलो आहोत हेच आमचे भाग्य. त्या भाग्याचा लाभ घ्यायचा असल्यास त्याचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी एकमेव आणि अंतिम ठरला पाहिजे. आमच्या आयुष्यात त्याच्या शब्दालाच प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे. तरच तो आमचा होईल आणि आमचा हा जन्म वाया जाणार नाही.

।। हरि ॐ ।।

-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page