‘बेटी पढाओ बेटी बचाओ’-महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांचा सहभाग

‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग मुंबईसह १५ जिल्ह्यांचा सहभाग

नवी दिल्ली: देशात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ कार्यक्रमांतर्गत नव्याने समावेश करण्यात आलेल्या देशातील २४४ जिल्हयांसाठी ४ मे २०१८ रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यात महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांचा समावेश आहे.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ कार्यक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २४४ जिल्ह्यांसाठी दिल्लीत एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी या परिषदेच्या मुख्य अतिथी तर केंद्रीय महिला व बालकल्याण राज्यमंत्री डॉ.विरेंद्र कुमार प्रमुख अतिथी असतील. या मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव हे ‘बेटी पढाओ बेटी बचाव” कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती देतील. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही मुलींचे आरोग्य व शिक्षणाबाबत शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करतील. या परिषदेत विविध राज्यांचे महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, राज्य समन्वयक, जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील सातारा, धुळे, नांदेड,अकोला, मुंबई उपनगर, मुंबई शहर, वर्धा, सिंधुदुर्ग, यवतमाळ, ठाणे, नागपूर, रायगड, अमरावती, रत्नागिरी आणि नंदुरबार या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी २०१५ मध्ये ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत देशात आतापर्यंत १६१ जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असून राज्यातील १६ जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या अंतर्गत बीड, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना, हिंगोली, सोलापूर, पुणे, परभणी, नाशिक आणि लातूर जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील झुनझुन येथे यावर्षी जागतिक महिला दिनी घोषणा करत ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ कार्यक्रमाचा विस्तार करून देशातील ६४० जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने देशातील २४४ जिल्ह्यांची निवड केली. या जिल्ह्यांमध्ये ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शुक्रवार ४ मे २०१८ रोजी दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरीत २३५ जिल्ह्यांमध्ये प्रसारामाध्यमे व अन्य माध्यमांद्वारे प्रचार मोहिम आखून हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. (सौजन्य-‘महान्यूज’)

You cannot copy content of this page