क्षा. म. समाजाच्या सर्वांगिण प्रगतीची मुहूर्तमेढ!

समाज माझा, मी समाजाचा!- लेखांक १० वा

 क्षा. म. समाजाच्या सर्वांगिण प्रगतीची मुहूर्तमेढ!

‘शिरोडकर बिझनेस ग्रुप’ला शुभेच्छा!

।। हरि ॐ ।।

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे आद्यदैवत डॉ. रामचंद्र शिरोडकर यांनी सर्वच क्षेत्रात मागासलेल्या क्षा. म. समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून उचित दिशा दिली. क्षा. म. समाज संस्थेचा पाया रचला जो एवढा मजबूत आहे की त्या पायावरच क्षा. म. समाज ताठ मानेने आजही उभा आहे. त्यानंतर एच. डी गांवकर यांनी समाजासाठी दिलेले योगदान समाजासाठी नेहमीच दिपस्तंभाप्रमाणे तळपत राहिल. हा आमचा इतिहास. ह्या इतिहासातील घटना; आमच्यासाठी आदर्शच असल्या पाहिजेत. तोच आदर्श घेऊन मागील पंधरा वीस वर्षे वाटचाल झाली नाही; हे खेदाने म्हणावे लागेल. परंतु श्री. मोहन लोकेगांवकर यांनी क्षा. म. समाजाला ‘इतर मागासवर्गीय` जातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केलेले यशस्वी प्रयास समाजातील अनेक विद्यार्थ्यांना निरंतर आधार देणार आहेत. समाजासाठी आपण आपल्या जागेवरून काहीतरी कार्य करू शकतो; हे श्री. मोहन लोकेगावकरांच्या कार्यातून शिकता येते. नवनवीन संकल्पना तयार करून त्यातून समाजाच्या भल्यासाठी कार्य करण्याची जिद्द आपण बाळगळी पाहिजे. हाच खरा शिरोडकरांचा आदर्श!

समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आर्थिक सुबत्ता आणि शैक्षणिक विकास महत्वाचा. डॉक्टरांनी सुद्धा दोन्ही गोष्टी एकाचवेळी करण्याचा प्रारंभ करून समाजाला आकार दिला. त्यामुळे मिठबांवसारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक संस्था उभी राहिली. त्यातून झालेल्या शैक्षणिक विकास आमच्या समाजबांधवांसाठी हितकारक ठरला. आज आमचे अनेक समाजबांधव-समाजभगिनी उच्चविद्याविभूषित आहेत. शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा, सिनेमा, राजकारण, खाजगी-सरकारी प्रशासन, उद्योगधंदे, व्यवसाय वगैरे क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. इंजिनियर, डॉक्टर, वकील, संशोधक, कंपन्यांचे मालक, संचालक, व्यवस्थापक अशी सर्वोच्च पद भुषविणारे तसेच शासकिय-निमशासकिय खाजगी संस्थांमध्ये उच्चपदांवर कार्य करणाऱ्या अनेक मान्यवर व्यक्ती आहेत. त्यांच्या कार्याकडे बघून क्षा. स. समाजाचे क्षात्र अर्थात तेज दशदिशांना प्रकाशित झालेलं दिसतं.

अशाचप्रकारचे क्षा. म. समाजामध्ये स्वत:चा (बिझनेस) व्यवसाय करणारे अनेकजण आहेत. त्यांनी आपआपल्या क्षेत्रात कौशल्य दाखवून यशाचे शिखर गाठले आहे. अशा मान्यवरांना एकत्र आणण्याचा सत्यसंकल्प चार्टड अकाऊंटड असणारे श्री. राम गावडे, श्री. दिनेश धोपटे, श्री. उल्हास फाटक, श्री. प्रसाद परब, श्री. रवी गावडे, श्री. संदिप लोके, डॉ. प्रमोद लोकेगावकर आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी मिळून केला. त्यातूनच `शिरोडकर बिझनेस ग्रुप’ तयार झाला व ह्या ग्रुपचा येत्या ८ एप्रिल २०१८ रोजी `थेट-भेट’ सोहळा संपन्न होणार आहे. अशा कार्यक्रमातून समाजबांधव असणाऱ्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय अधिक गतीशिल करणे, व्यवसाय सर्वांगाने विकसित करणे शक्य होणार आहे. त्याचा आनंद आहेच. परंतु `समाज माझा, मी समाजाचा!’ ह्या लेखमालेतून आम्हाला व्यावसायिक समाजबंधूंना-भगिनींना शुभेच्छा द्यायच्या आहेत; त्यासाठी हा लेखन प्रपंच!

`क्षात्रकुलोत्पन मराठा समाज’ असं नामकरण करून डॉ. शिरेडकरांनी `गावडे-गावडा’ समाजाला एक मान मिळवून दिला. नुसतं नामकरण झालं म्हणून कार्य सिद्धीस गेलं असं म्हणता येणार नाही. तर त्या नामकरणास अनुसरून डॉ. शिरोडकरांनी क्षा. म. समाजाची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून शिक्षण संस्था उभारली तर आर्थिक विकास व्हावा म्हणून पतपेढीची स्थापना केली. म्हणजेच शैक्षणिक प्रगती बरोबर आर्थिक उन्नतीसुद्धा प्रगतीसाठी आवश्यक असते.

आर्थिक उन्नती साधण्यासाठी नोकरी आणि व्यवसाय असे दोन पर्याय उपलब्ध असतात. आपल्या समाजाची मानसिकता व्यवसायासाठी पुरक नव्हती. पण आता व्यवसायातही आपल्या समाजबांधवांनी उत्तुंग यश संपादित केले आहे. अनेक उद्योगधंदे, कंपन्या, कारखाने, सेवाकेंद्र वगैरेच्या माध्यमातून समाजबांधव प्रगती करीत आहेत. परंतु माझा समाजबांधव नेमका कोणता व्यवसाय करतो? हे आपणास माहिती नसते. त्यामुळे व्यवसायिक समाजबांधवांना गरज असूनही सहभागी करून घेता येत नाही किंवा त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होत नाही. उदा. एखादा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी अनेक व्यावसायिकांची मदत घ्यावी लागते. समाजबांधव व्यावसायिकांचे सहकार्य घेतल्याने आपणास हक्काचा, विश्वासाचा व्यावसायिक ग्रुप मिळू शकतो. त्यामुळे दोन्ही बाजूंचा झाला तर फायदाच होईल. समाजामधील अनेकजण व्यवसायामध्ये अपयशी झाले असतील किंवा ज्यांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे; त्यांनाही ह्या ग्रुपतर्फे मार्गदर्शन मिळण्याची सोय व्हायला हवी.

एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ

ह्या व्यावसायिक प्रगतीसाठी सुवर्णसंधी ज्यांनी आपल्यासमोर आणून ठेवली आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन करता आले पाहिजे. प्रत्येकाने आपआपल्या जागेवरून ओरड-बोबांबोब-आरोप न करत बसता समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे आणि असे कार्य श्री. राम गावडे, श्री. दिनेश धोपटे, श्री. उल्हास फाटक, श्री. प्रसाद परब, श्री. रवी गावडे, श्री. संदिप लोके, डॉ. प्रमोद लोकेगावकर  यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या ह्या कार्यास आम्ही समाजबांधवांनी सहकार्य करायला पाहिजे. कारण भविष्यामध्ये हाच `व्यावसायिक ग्रुप’ समाजबांधवानां व्यवसाय करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणार आहे आणि समाजबांधव व्यवसाय करण्याच्या मानसिकतेमध्ये जाणार आहे.

खरोखरच अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. कारण नवीन व्यवसाय करणं सोप्प नसतं, तो व्यवसाय चालविणे कठीण असतं आणि तो व्यवसाय यशस्वी करणं आपल्याला शक्य नसतं. कारण व्यावसायिक वातावरण, योग्य संकल्पना-अनुभव ह्याची कमतरता असते. पण आता `शिरोडकर बिझनेस ग्रुप’ मार्फत ही कमतरता भासणार नाही.

`शिरोडकर बिझनेस ग्रुप’च्या सदस्यांनी स्वत:चा व्यवसाय करता करता क्षा. म. समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्याचा शुभारंभ करावा; अशी आमची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा ‘शिरोडकर बिझनेस ग्रुप’ची निर्मिती करणारे थेटभेट घडवून आणणारे आणि भविष्यात समाजाच्या भल्यासाठी कार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन व थेटभेट कार्यक्रमाला येणाऱ्यांचे स्वागत!
नाथसंविध्!

(क्रमश:)
-नरेंद्र राजाराम हडकर

You cannot copy content of this page