सद्गुरूंवरील श्रद्धाच सर्वांगीण विकास घडविते! -श्रीस्वामी राम

‘श्रीस्वामी राम’ हे आध्यात्मिक सदगुरु आपल्या गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीस वर्षे हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात वावरले. आध्यात्मिक अनुभूती अनुभवली. हिमालयातील भौगोलिक रचना आणि निसर्गाची अद्भुतता अभ्यासलीच नव्हे तर त्यांच्याशी मैत्री केली. त्यांच्या `हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात’ ह्या ग्रंथामध्ये त्यांनी आपले अद्भूत अनुभवांची शिदोरी सर्वांसाठी खुली केली आहे. त्याबद्दल जसे जमेल तसे लिखाण करण्याचा मानस आहे. परंतु त्यांनी आपल्या गुरुदेवांबद्दल जे काही सांगितले आहे ते आपण वाचू…

१) काही वेळा असा योग जुळून येतो की, प्रथम भेटीतच गुरु आणि शिष्य दोघांची हृदय परस्परांना सन्मुख होतात आणि उत्स्फूर्तपणे जुळून जातात.
२) केवळ एका दृष्टीक्षेपात हे घडू शकतं.
३) नंतर कृती वा वाणी यांचा आधार न घेता दोघांचा संवाद सुरु होतो.
४) माझ्या मनात उमटणारा प्रत्येक तरंग त्यांना कळत असे. कधी कधी मला वाटायचं की ध्यानाला बसूच नये. ते त्यांना न सांगताच कळे आणि ते हसू लागत. मी विचारी, `‘का हसता?’’ मग ते म्हणत, `‘तुला ध्यान करायचं नाहीये, होय की नाही?’’
५) गुरुदेव माझी वाणी, कृती यावर केवळ संस्कार करत नव्हते तर माझ्या भावना, माझी विचार करण्याची पद्धत यांनाही वळण देत होते, प्रगल्भ करत होते; हे मला चांगलंच कळत होतं.
६) मी मनात वाईट विचार येऊ देत नसे. पण तो आला आणि त्यांना कळला तरी ते माझ्यावर रागावत नसत. त्यांनी माझ्या विचारांचा ताबा कधीच घेतला नाही.
७) पण मी कशा दिशेने विचार करीत आहे, तो योग्य का अयोग्य? याची जाणीव ते मला अवश्य करुन देत.
८) शिक्षक हे मुलावर नेहमी प्रेम करतात. खरा शिक्षक मुलगा कितीही हूड किंवा चुकीचं वागणारा असला तरी त्याच्यावर रागावत नाही, त्याला सुचना देत नाही. उलट तो ऋजुतेनं त्याला सुधारायला मदत करतो. मुलगा कितीही व्रात्य असला तरी खरा शिक्षक त्याच्यावर प्रेमच करतो. आई जशी हळुवार आणि दक्षतेनं मुलाला वाढविते तसा खरा शिक्षक आत्मीयतेनं मुलाचं संगोपन करतो.
९) आई किंवा वडील मुलाला काय देऊ शकतात? हे मी नीट सांगू शकणार नाही. पण माझ्या गुरुदेवांनी मला सर्व काही दिलं आणि माझ्याकडून त्यांनी कसलीही अपेक्षा केली नाही. माझ्या जवळही त्यांना द्यायला काहीच नव्हतं. त्यांनी मला शिकवलं, मोठं केलं, माझ्यासाठी सर्व काही केलं. पण मी मात्र त्यांच्यासाठी काहीही करु शकलो नाही.
१०) गुरुदेवांना माझ्याकडून काहीही नको होतं. माझं त्यांच्यावर नि:स्सिम प्रेम होतं. खऱ्या आध्यात्मिक व्यक्तींना कोणाकडून काही नकोच असतं. पण त्या मात्र आपल्याला सर्व काही देत असतात.
११) खरा मार्गदर्शक अत्यंत नि:स्वार्थी असतो. आपल्या शिष्यांवर तो वडिलांहून अधिक प्रेम करतो. वडील मुलाला केवळ अर्थार्जनाचं साधन देतात. जगात कसं वागायचं असतं? ते शिकवितात, वाढवितात. पण आध्यात्मिक पिता म्हणजे गुरु; इतर कुणीही जे देऊ शकत नाही ते देतात. केवळ आध्यात्मिक परंपरामध्येच अशा प्रकारचं नातं पाहायला मिळतं.
१२) आई-वडील मुलांना जन्म देतात. त्याचं शिक्षण करतात. जमीनजुमला-संपत्ती त्यांच्या नावाने ठेवतात. पण गुरुदेव हे त्यांना ईश्वरतत्वाची जी प्रत्यक्ष अनुभूती असते ती शिष्याला देतात. भौतिक संपत्ती जशी वारसा हक्कानं पित्याकडून मुलाला मिळते तशी योगिक संप्रदायामध्ये ही प्रत्यक्ष अनुभूती गुरुदेव शिष्यांमध्ये संक्रमित करतात.
१३) गुरुदेव शिष्यांना जे प्रेम देतात ते मानवी प्रेम नव्हे. मनाने ते प्रेम समजणार नाही. त्यासाठी अंत:करणच हवं. आध्यात्मिक परंपरांमध्ये गुरु शिष्याला जे देतात त्यामुळे त्याच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन होतं. ते परमानंदानं ओसंडून जातं.

सद्गुरुंवर संपूर्णपणे श्रद्धा असल्यावर आपल्या जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी ह्याच जन्मात देण्याची किमया त्यांच्याकडून सहजपणे घडते. आपल्यावर प्रेम करणाऱ्या शिष्याचे, भक्तांचे, मित्राचे म्हणजेच श्रद्धावानाचे जीवन सर्वांगिण सुंदर करताना संपूर्ण विश्वाची रचना सुद्धा अनुकूल करण्याचं सामर्थ्य सद्गुरु तत्वामध्ये आदिमाता जगदंबेच्या कृपेने असतेच. आमची फाटकी झोळीही तो शिवून देण्यास तयार असतो. कारण त्या झोळीतच आम्ही त्याचं प्रेम घेऊ शकतो. पण आम्ही ती झोळी स्वत:ही शिवत नाही आणि सद्गुरुंनाही शिवायला देत नाही. असं आम्ही करता कामा नये म्हणूनच तो श्री स्वामी समर्थ म्हणून येतो व अभयदान देतो. श्री सार्ईनाथ म्हणून येतो व कृपा करतो. श्री अनिरुद्ध म्हणून येतो व मनाला सामर्थ्य देतो. म्हणूनच सद्गुरुंचं वर्णन भारतीय वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये मोठ्या आदराने, श्रद्धेने, निष्ठेने केले जातं…

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः।
गुरु साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥

-नरेंद्रसिंह हडकर

You cannot copy content of this page