भक्तीचा श्रीरामोत्सव निरंतर प्रवाहित राहू दे!

||हरि ॐ|| ||श्रीराम|| ||अंबज्ञ||

आज पौष शुक्ल पक्ष द्वादशी विक्रम संवत २०८० अर्थात सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी नक्षत्र मृगशीर्ष आणि ब्रह्मा योग ह्याचा संयोग असून दुपारी १२:११ ते दुपारी १२:५३ दरम्यान अभिजीत मुहूर्त आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांच्या शुभ पवित्र मुहूर्तावर अयोध्येतील श्री रामजन्मभूमीत नव्याने निर्माण होत असलेल्या भव्य दिव्य मंदिरात `श्रीराम’ प्राणप्रतिष्ठीत होणार आहेत.

गेल्या ५०० वर्षाच्या संघर्षानंतर-वादविवादानंतर सनातन वैदिक धर्मियांसाठी श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे पुनर्निर्माण सुरु झाले आहे आणि आज श्रीरामल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. त्याचा आनंदोत्सव भक्तिमय वातावरणात आपण साजरा केला पाहिजे. कारण सनातन वैदिक धर्मातील प्रत्येकाच्या आयुष्यातील ही एकमेव वेळ असणार आहे जी पुन्हा येणार नाही. आज पुन्हा एकदा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आपल्या जीवनात भक्कमपणे कोरला जाणार आहे. हा श्रीराम अर्थात अखंड ब्रह्माण्डाचे चैतन्य! श्रीराम म्हणजे सच्चिदानंद! श्रीराम म्हणजे सर्व सदगुण! श्रीराम म्हणजे तेज! श्रीराम म्हणजे मानवी जीवनच नाहीतर मानवी जीवनासह संपूर्ण निसर्ग जीवनाचे सर्वांगिण सुंदर विकासाचा स्रोत! ह्या श्रीरामाचे आमच्या जीवनातील अस्तित्व आम्हाला माहित आहे. ह्या भारतभूमीशी जोडणारा प्रत्येकजण ह्या श्रीरामाचे आणि श्रीराम नामाचे माहात्म्य जाणतो. ते आमच्या थोर ऋषीमुनींनी, संतांनी आम्हाला अनेक अभंगातून, ग्रंथातून, कीर्तनातून सहजपणे वर्षानुवर्षे सांगितले आहे.

ह्या सर्वाचा विचार करता आताचे गलिच्छ राजकारण, स्वार्थी आरोप-प्रत्यारोप, देशाला आणि समाज जीवनाला घातक ठरणारी कुवृत्ती, बाजारूपणा काही क्षणांसाठी-दिवसांसाठी नक्कीच बाजूला करून किमान आजतरी श्रीरामाच्या भक्तिभाव चैतन्यात जल्लोष करूयात! ज्या व्यक्ती किंवा संघटना श्रीरामाचा, श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना भक्ती सोहळ्याचा उपयोग आपल्या कुठल्याही स्वार्थासाठी करतील त्यांना त्यांची जबर किंमत मोजावीच लागेल. जे कोणी असे करीत असेल ते खऱ्या अर्थाने रावणमार्गीय होत. विद्वान रावणाने कितीही हुशारी केली तरी चिरंतर टिकत नाही. कारण रावण साधूच्या वेशात असो वा भक्ताच्या रूपात; त्याची कुवृत्ती त्याच्या नाशास कारणीभूत ठरतेच! देवाच्या नावाने बाजार मांडणे सोपे असते; पण त्याचे होणारे दुष्परिणाम मात्र कुळाचा नाश घडविणारे असतात. म्हणूनच किमान आजच्या दिवशी कशाचाही विचार न करता फक्त आणि फक्त `श्रीराम’च हा एकमेव विषय आमच्या जीवनात असायला हवा! हा आनंद आपण लुटायचा आहे. इतर गोष्टींचा साधकबाधक विचार करायला आणि आपला मतप्रवाह तयार करायला अख्ख जीवन पडलंय! श्रीरामाचा आदर्श जोपासताना इतर धर्मियांचा आणि सार्वभौम भारत देश म्हणून संविधानाचा सन्मान प्रत्येकाला राखताच आला पाहिजे. श्रीराम भक्ती उन्मादामध्ये, अहंकारामध्ये, द्वेषामध्ये आणि देशाच्या अखंडतेला बाधा आणणाऱ्या विचारांमध्ये परावर्तित होता कामा नये! ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. हीच आमचा परमात्मा श्रीरामाची शिकवण आहे. ती जपता आली पाहिजे. हेच खरे रामराज्य!

आज होणाऱ्या सच्चिदानंद उत्सवाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! श्रीराम प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, शांती, आनंद, प्रेम, यश आणि सदृढ आरोग्यासह दीर्घायुष्य देवो; ही श्रीराम चरणी प्रार्थना! जय श्रीराम!

||नाथसंविध्|| ||नाथसंविध्|| ||नाथसंविध्||

माझा `राम’… आत्माराम, साईराम अनिरुद्धराम…!

स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध रामाचे ‘रामराज्य’!

You cannot copy content of this page